मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Saturday, October 13, 2012

yyy अर्थशास्त्र --आदित्यचे प्रश्न १-२१

यातील प्रश्न १७ पर्यंत आज तपासले -- २४-०८-२०१८ आता १३-१०-२०१२ नंतरच्या पोस्ट एकदा डोळ्याखाली घालून काढून टाकणे. प्रश्न १८ ते २१ म्हणजेच पानसंख्या २१ ते २८. ते तपासणे

।।श्री।।

।अर्थशास्त्र।

प्रश्न 1 – पैसा म्हणजे काय ?

उत्तर 1 – आपल्याला दिसतो त्या स्वरूपातला पैसा म्हणजे नाणी, नोटा, किंवा आता आधुनिक पद्धतीत असलेली क्रेडिट कार्ड.

पण खरं तर या नोटा म्हणजे निव्वळ कागद. मग त्यांचा नेमका वापर का आणि कसा करयचा असतो ?

समजा आपल्या जवळ एक वस्तू आहे उदा. चॉकलेट पण आपल्याला हवा आहे पेरू.
मग ज्याच्याकडे पेरू आहे त्याच्याबरोबर आपण अदलाबदली करून, त्याला चॉकलेट देऊन,
त्याचा पेरू घेऊ शकतो

या अदलाबदली ऐवजी सगळ्यांना सोईची एखादी स्टॅण्डर्ड गोष्ट म्हणजे पैसा. खूप जुन्या काळांत "भात " हे अशी स्टॅण्डर्ड गोष्ट मानले जाई. मग "गाई" आल्या. मग खूप पुढे मातीची नाणी आली, त्यानंतर सोनं, चांदी, तांब्याची नाणी. मग नोटा आल्या.

थोडक्यांत काय, तर माझ्याकडे असलेली वस्तू मी दुस-याला दिली, त्यांचाकडून वस्तू न घेता पैसे घेतले. हे पैसे मला खाता-पिता येणार नाहीत पण साठवून ठेवता येतील – लागेल तेंव्हा लागेल ती वस्तू विकत घेण्यासाठी.

जर जगांत विकत घेण्यालायक वस्तूच नसत्या, तर पैशांना काही महत्व नसते. आपल्याला वस्तू विकत घ्यायची आहे म्हणून आपण पैशांचा वापर करतो.

प्रश्न 2 नोकरीत राखीव जागा कशासाठी ?

उत्तर2 – नोकरीत राखीव जागा कशासाठी ठेवाव्या याचे उत्तर खूपदा सांगून झाले. तरी ऐक. नोकरीसाठी काही ठराविक पात्रता ठरवली जाते -- ती असेल तर नोकरी मिळेल. पण आपल्या समाजांत शेकडो-हजारो वर्ष मागासलेल्या जाती-जमातीच्या लोकांना शिक्षणाची संधि मिळाली नव्हती. अजूनही त्यांच्यांत फारसे शिक्षण नाही. मग त्यांना पात्रतेच्या जोरावर नोकरी कशी मिळणार

नोकरी नाही म्हणून आर्थिक प्रगति नाही, ती नाही म्हणून शिक्षण नाही आणि ते नाही म्हणून नोकरी नाही. असं दुष्टचक्र चालूच रहाणार. ते थांबवायचं असेल तर बाहेरून काही प्रयत्न करावा लागतो. असाच एक प्रयत्न म्हणजे राखीव जागा. त्यामुळे पात्रता कमी असली तरी एकदा नोकरी मिळाली की पुढे उन्नतीचा मार्ग खुला होतो.
----------------------------------------------------------------------------------
प्रश्न ३ पण त्याने कामाची गुणवत्ता (क्वालिटी) खराब होत नाही कां?

हो आणि नाही. कामाची गुणवत्ता  खराब होऊ नये यासाठी काही पथ्य पाळावी लागतात.
एखाद्या कामावर दहा माणसं काम करत असतील  -- त्यातल्या एखाद्याच्या कामाची गुणवत्ता चांगली नसेल, तर इतर माणसं आपल्या कामामार्फत त्याचं काम सांभाळून घेऊ शकतात. कारण माणूस आणि मशीन यांच्यात फरक आहे. मशीन असं सांभाळून घेऊ शकणार नाही -- माणसं घेऊ शकतात..

सुमारे दहा टक्के माणसांनाच सांभाळून घ्यायचं असेल तर इतर नव्वद माणसं तेवढं करू शकतात. पण हे प्रमाण दहा टक्क्या पेक्षा वाढत गेलं की इतरांवरचा बोझा एवढा वाढतो की त्यातून त्याचंमनोधैर्य ही संपणार आणि कामाची गुणवत्ताही वाईट होत जाणार. म्हणूनच पथ्य पाळलं पाहिजे हेच त्याचं खरं उत्तर. 

एक पथ्य म्हणजे असे प्रमाण दहा टक्के मर्यादित ठेवणे किंवा दुसरे म्हणजे लोकांना सतत प्रशिक्षण देत राहून त्यांची गुणवत्ता वाढवणे. 
-----------------------------------------------------------------------------
प्रश्न ४ 
अपंगांसाठी राखीवजागा ठेवतात. त्यांना काम कस जमेल?

अपंगांना कांही गोष्टी आपल्या सारख्या जमणार नाहीत- पण काहीच जमणार नाही अस थोडेच आहे. मुख्य प्रश्न आहे आत्मविश्वासाचा. तो असेल तर खूप कांही करता येतं. 
पण या बद्दल एखाद उदाहरण कुठे मिळेल कां ?
हो. अमेरिकेत एक कंपनी आहे अेबिलिटी- इन्कारपोरेटेड. या कंपनीचा प्रमुख हेनरी विस्कार्डी ज्यूनियर. दोन्ही पायांनी अधू होता.  कंपनीतील एकूण एक माणूस अपंगआहे. अपंगांनाच इथे घेतले जाईल असा कंपनीचा नियमच आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन, त्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो. ही कंपनी अमेरीकेतील श्रीमंत पाचशे कंपन्यांपैकी एक आहे. 
इथे तर शंभर टक्के अपंगांसाठी राखीव असा प्रकार असूनही तो प्रयोग यशस्वी झाला आहे. पण सर्वसाधारणपणे दहा टक्के राखीव  हे गणित कुठेही यशस्वी होण्यासारखे आहे.


-------------------------------------------------------------------------------------------
5
प्रश्न ५:- अर्थशास्त्र म्हणजे काय?

उत्तर- अर्थ म्हणजे पैसा. पण असा मर्यादित अर्थ घेऊन उपयोगी नाही. कुठलीही गोष्ट ज्याची आपल्याला तत्काळ गरज नसते, पण पुढे गरज लागणार असते, तिला आपण साठवून ठेवतो. ही संचयाची प्रवृत्ति माणसाशिवाय इतर प्रण्यांमध्येही असतेच. मुंग्या,खा, मधमाशा, असे कित्येक प्राणी साठवण करीत असतात.

मग ही साठवण केलेली वस्तू योग्य रितीने वापरणे ही सुध्दा एक वेगळी कला आहे- वेगळ विज्ञान आहे. ते शिकून त्याप्रमाणे साठवणीतील वस्तू वापराव्या लागतात. परिश्रम मेहनत करावी लागते. त्या वस्तू वापरून काही उद्योग करायचे असतात - हे सगळ ओघाने आल.

थोडक्यांत आपल्या गरजांसाठीआपल्याकडे असणाऱ्या वस्तूंचा हवा त्या प्रमाणांत  वापर करून झाल्यानंतर उरलेली वस्तू वापरून काही तरी नवीन निर्माण करण , त्याची गरज असेल तिथे ते पोचवण, त्याचा मोबदला घेण, या सगळ्याच तंत्र म्हणजे अर्थशास्त्र - पण व्यक्तिगत.

याच प्रकारे, समाजपुरुषाचे अर्थशास्त्र म्हणजे  वरील कारणांसाठी एका समाजाचे दुसऱ्या समाजाबरोबर

आलेले संबंध. असा समाजांचा विचार करतांना व्यक्तिपरक साधनांचा विचार न करता पूर्ण समाजाच्या संसाधनांचा  विचार करावा लागतो.

6
प्रश्न ६- बँकांचा व्यवहार कसा चालतो?

उत्तर- आपण जे पैसे साठवतो, ते जर आपल्याला लगेच गरजेचे नसतील तर ते आपल्याकडे जमवून ठेवण्यात विशेष अर्थ नसतो. पैशाच्या सुरक्षिततेची काळजी तर असतेच, शिवाय तो पैसा वापराविना पडून रहाणे- हे ही निरर्थक किंवा अपव्ययकारी म्हणून आपण आणि अशी शेकडो माणसे हा पैसा बँकेत ठेवतात. बँकेकडे असे कोट्यावधी रूपये गोळा होतात. त्यातून बँक इतरांना कर्ज देते व त्यावर व्याज वसूल करते: आपण जर बँकेत पैसे साठवले तर बँक आपल्याला व्याज देते.

पण ही सर्व उल्लाढल करायची तर त्यासाठी माणस हवीत- त्यांना पगार, त्यांच्यासाठी इमारत इत्यदि सर्व खर्च - आला  शिवाय ज्या बँकेने एवढी उलाढाल करायची तिला कांही नफा पण व्हायला हवा. म्हणूनच साठवणीवर बँक जे व्याज देते त्याचा दर कमी असतो आणि जेव्हां इतरांना कर्जा देते तेंव्हा त्यांच्यावर लावलेला व्याजाचा दर जास्त असतो.

याच तत्वावर चिट फंड , भिशी, अल्पबचत गट इत्यादि सारख्या छोट्या संस्थांचे उद्योग पण चालतात. या संस्था म्हणजे छोट्या स्वरूपातल्या बँकाच असतात.




7
प्रश्न७- औद्योगिक क्रांती म्हणजे कांय ती कशी आली? त्याचे वैशिष्ट्य कांय?

उत्तर- याच उत्तर आपण अस समजून घेऊ या किआपल्याकडे बलुतेदारप्रथा होती. ही मंडळी वेगवेगळ्या वस्तू निर्माण करतांना एक एक करून करत. पण औद्योगिक क्रान्तिमुळे असा बदल झाला की माणसाच्या खूपशा वस्तू  यंत्रावर तयार होऊ लागल्या. त्यामुळे त्यांच्यात सारखेपणा आला.  शिवाय बॅच प्रोडक्शन होऊ लागले - म्हणजे एकाच वेळी एका पेक्षा जास्त वस्तू तयार करणे. अगदी सोप उदाहरण घेऊ या- चमच्यांच्या फॅक्टरीच . तिथे एका बाजूने लोखंडी पोलादाचा पत्रा हळू हळू सरकत पूढे जात असतो. वरून एक दाव देणारं मशीन येऊन त्याच्यावर स्थिरावत आणि चमच्याच्या आकाराची मुशी पत्र्यावर ठेवली जाऊन दाब पडतो. एक चमचा बनतो - मशीन वर जाते, पुन्हा खाली येते तो पर्यंत पत्रा पुढे सरकरलेला असतो- पुन्हा दूसरा चमचा तयार होतो- लोखंडी पत्र्याची लांबी संपेपर्यंत ही प्रक्रिया चालू असते. म्हणजे एकाच पत्र्यातून दहा- वीस चमचे कापून व दाब देऊन आणि आकार देऊन बाहेर काढले जातात. मग ही प्रक्रिया  संपते ती पुन्हा दुसरा पत्रा  बसवेपर्यंत.
अशा तऱ्हेने एकाच सारखे, दहा- वीस चमचे एकत्र तयार होतात. अशा तऱ्हेचे उत्पादन औद्योगिक क्रान्ति नंतर सुरू झाले.


औद्योगिक क्रान्तिने अजून एक घडले. आधी मेहनतीची सगळी काम माणसाला स्वतःला किंवा जनावरांच्या मदतीने करावी लागत. मग अचानक एकदा जेम्स वॉटला वाफेच्या शक्तिचा शोध लागला. त्याने तीच शक्ती उत्पादनासाठी वापरायची सोय कशी करता येईल याबद्दल बराच विचार, बरेच प्रयत्न, बरेच शोध केले आणि पहाता- पहाता लोक वाफेच्या शक्तीचा वापर ज्या-त्या गोष्टीसाठी करू लागले. इथूनच मशीनं बनवायला चालना मिळाली. आगेच्या शोधासारखाच हा वाफेच्या शक्तीचा शोधही महत्वपूर्ण होता यात शंका नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न ८
बलुतेदारी ची प्रथा कशी होती? कुठून आली- आणि आता तिची अवस्था कांय आहे?

उत्तर- माणसाने खाण्यासाठी लागणारं अन्न शेतात पिकवायची कला शिकून घेतली. शेती सुरू झाली. पण माणसाला त्याशिवाय इतरही गरजा असतात. उदाहरणार्थ कापड हव, कपडे हवेत, मातीची, कांचेची, तांबा-पितळ-लोखंडाची भांडी हवीत, इत्यादि. या वस्तूंची निर्मिती कशी करावी ही कला पण माणसाने शिकून घेतली. मग कांही व्यक्ति शेती न करता या गोष्टी तयार करू लागल्या. प्रत्येक गांवात लोकांच्या अशा गरजा पुरवण्यासाठी कुंभार, लोहार, न्हावी, शिंपी, चर्मकार, माळी, विणकर अशा विविध विद्या जाणणारी, त्या त्या उद्योगातली तज्ज्ञ माणसे हवी असत. त्यांना मानाने गांवात बोलावून घेतले जाई, व गावात वसवण्यांत येई. यांच्या कामांची गरज वर्षभर असते, पण शेतकऱ्याकडे दररोज पीक निघत नसते.  त्यामुळे शेतात पीक निघाले की मगच यांना वार्षिक मेहनताना एकत्रच दिला जाई. यांनाच बलुतेदार म्हटले गेले. 

यांनी निर्माण केलेल्या वस्तूंबाबत एक लक्षांत ठेवावे लागेल- कुंभाराच उदाहरण घेऊ या -- त्याच प्रत्येक मडकं वेगवेगळं घडवाव लागत. प्रत्येकाला घडवतांना हाताने आकार द्यावा लागतो. म्हणजेच दोन मडकी अगदी हुबेहूब सारखी नसणार, तसेच तो कुंभार एकाच वेळी दहा- बारा मडकी तयार करू शकत नाही. एक-एक करूनच करणार असतो. यामुळे कामांना वेळ लागायचा. 
औद्योगिक क्रान्तिनंतर ही परिस्थिती बदलली. कित्येक वस्तू एकापाठोपाठ एक, सुबक, सुंदर, एकाच मापाच्या अशा तयार होऊ लागल्या. मग बलुतेदारांवर वाईट दिवस येऊ लागले.  

------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न ९ 
सर्वसाधारण समजूत अशी आहे की अर्थशास्त्र हा विषय औद्योगिक  क्रान्तिनंतरच महत्वाला आला. हे कितपत खरं आहे?

उत्तर-       थोडफार खर आहे पण अगदी खरं नाही. अर्थशास्त्राचा पाया रचला गेला तो आधी समाजव्यवस्थेतून आणि नंतर राज्यव्यवस्थेतून. औद्योगिक  क्रान्ति नंतर आलेली उत्पादन व्यवस्था हा तिसरा टप्पा आहे. म्हणून जेंव्हा आपण समाजशास्त्र शिकतो तेंव्हा त्यातही अर्थशास्त्र शिकावे लागते. 
        उत्पादन व्यवस्था बदलली तशी समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था पण बदलत गेली. त्यांचा प्रभाव अर्थकारणावर कसा झाला हे ही शिकावे लागेल. त्यामुळे हे तीनही एकमेकांशी निगडीत आहेत.
-------------------------------------------------------------------
प्रश्न १०
समाजरचना आणि अर्थव्यवस्थेचा संबंध कसा तयार झाला?

उत्तर-     जीवशास्त्रीय व्याख्येप्रमाणे प्रत्येक सजीव प्राणि स्वतःचे रक्षण करीत स्वतःचा वंश वाढवण्याचे प्रयत्न करीत असतो. वंशवृध्दिचा एक उपाय म्हणजे आपण मिळवलेले ज्ञान किंवा वस्तू पुढच्या पिढीकडे सुपूर्द करणे. थोडक्यांत आपल्या वंशजांवर प्रेम करणे,  त्यांचे कल्याण चिंतिणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ति असते. यामधूनच परिवार ही संकल्पना उदयाला आली. परिवारातील सदस्यांचे रक्षण करणे, त्यांच्यासाठी कांहीतरी संचित ठेवणे, हे जसे नैसर्गिक तसेच त्या संचिताचे रक्षण करण्याची काळजी देखील नैसर्गिक. या रक्षणासाठी जास्त मनुष्याबळ पाहिजे. तसेच त्या जास्त माणसांच्या गटामधे जास्त चांगला सलोखा पाहिजे. यातून टोळी किंवा जाति जन्माला आल्या. जाति अंतर्गत सलोखा टिकून राहण्यासाठी शिस्त पाहिजे, तसेच प्रेमही पाहिजे- म्हणून नियम आले. ते नियम असे असावेत ज्यामधून जातीमधील सलोखा, ज्ञान हे सर्व वाढीला लागतील.
    जशी परिवार, जाती, अशी व्याप्ति वाढली, तशीच ती पुढे गांवापर्यंत वाढली. सुरवातीला एकाच जातीच्या लोकांनी आपल गांव वसवल. पण त्या गांवाला पूरक व पोषक अशा इतर उद्योगधंद्यांची गरज पडली तसे त्याही लोकांना आणून गांवात वसवल. 
   सलोखा टिकून रहाण्यासाठी जे नियम करण्यांत आले त्यांत ओघानेच खरेपणा हा महत्वाचा नियम बनला- त्याचबरोबर मैत्री, करुणा, चोरी न करणे, दान, ज्ञानाची लालसा ठेवणे, इत्यादि सर्व गुण आवश्यक असल्याने तेच नियम बनले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न ११
समाजव्यवहारात खरेपणाला इतके महत्व कां आहे?

उत्तर-    थोडसं भूतकाळात, किंवा वैदिक काळात जाऊ या. देवासुरसंग्राम संपून पृथ्वीवर माणसांचे राज्य आले- किंवा अस म्हणू या की राज्य ही संकल्पना पृथ्वीवर आली. असा एक खूप खूप जुना राजवंश म्हणजे रघुवंश. त्यांची खूणच सांगितली जायची- “प्राण जाई पर वचन न जाई।”  त्याही आधीच्या काळात सत्याची सर्वत्र प्रतिष्ठा केलेली होती- स्वर्गाच्या पलीकडे कांय आहे आणि मृत्यूच्या पलीकडे कांय आहे हा प्रश्न नचिकेताने यमाला विचारला होता - त्याला यमाने दिलेले उत्तर होते- सत्य. पण सत्य म्हणजे तरी नेमके कांय?
याचे उत्तर ईशावस्योपनिषदाने दिले आहे. जे तुझ्या मेहनतीचे नाही ते तू घ्यायचे नाहीस - त्याचा मोह करायचा नाही हे सत्य. आणि असे सत्यच जगांत टिकते- अनृत म्हणजे खोटेपणा टिकत नाही- सत्यमेव जयते- नानृतम्। अस उपनिषदात सांगितल आहे. यावरून तुझ्या लक्षांत येईल की मेहनत आणि श्रम, त्यांची महत्ता, त्यांच्याशी निगडित अर्थशास्त्रीय व्यवहार या सर्वांचा “सत्य” या संकल्पनेशी किती पायाभूत संबंध आहे.
ईशावास्योपनिषदात म्हटल आहे -- 
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहित मुखं - तत्त्वम् पूषन् अपावृणु, सत्यधर्माय दृष्टये।  
कवि म्हणतो- सत्य हे जणू एका सोन्याच झाकण असलेल्या भांड्यात दडवून ठेवल आहे- हे सूर्या, तू ते सोनेरी झाकण उघड आणि मला सत्यधर्माच दर्शन घडवून आण !
    सत्याचे स्थान स्वर्ग किंवा मृत्यूच्या देखील वर अशासाठी की लोभ, मोह यातून माणसाची बुद्धि अविवेकी बनते, मग तिला खरं-खोट कळेनास होत- मन विकारी बनत आणि माणूस खरेपणापासून दूर जातो. हा विकार किंवा स्वतः न मिळवलेल्या वस्तूची आकांक्षा सोडली की माणूस “सत्यव्रती” होतो. मग त्याच्या हातून चांगली कामे घडतात- तो लोकांना चांगल्या मार्गावर नेतो. तो समाजाला घडवतो.

प्रश्न १२
वाफेच्या शक्तीचा शोध लागला- माणूस आपली कामे वाफेकडून करून घेऊ लागला. 
पण त्याने नेमकी औद्योगिक क्रान्ति कशी आली?

उत्तर-     बरोबर आहे- नुसत्या वाफेच्या उपयोगातून औद्योगिक क्रान्ति आली नाही. पण झाले कांय की एकदा आपण वाफ बनवली की तिच्यांत खूप शक्ति असते - ती वाया दवडायची नाही म्हणून अजून जास्ती काम हाती घेतली पाहिजेत.
    आपण वाफेकडून काम करून घेतो ते तरी कसे? तर त्या वाफेवर एक पिस्टन पुढे मागे फिरते. पुढे जातांना ते काम करते. अस काम त्याच्या प्रत्येक फेरीत करून घेता आल पाहिजे.
    म्हणून अशा तऱ्हेची यंत्र बनवली जी त्या पिस्टनच्या प्रत्येक फेरीमधे कांहीतरी काम करू शकतील. त्याचप्रमाणे असे कल्पनाशील लोकही तयार झाले -  जे अशी मशीन्स तयार करू शकतील.  मग मशीन्स द्वारेच मशीन्स बनवायला सुरुवात झाली. त्यामुळे दोन किंवा कित्येक मशीन्स मधे सारखेपणा टिकवता आला - मग त्यांची हुकमी विक्री करण्यासाठी गॅरंटी देता येऊ लागली.  त्यांचे स्पेअर पार्टस्- त्यातून बनलेल्या वस्तू या मधे पण सारखेपणा आला- त्यांना अदलून- बदलून वापरण सोप झाल. थोडक्यांत उत्पादनाचे प्रमाण खूप मोठ्या पातळीवर नेले गेले. अशा तऱ्हेने मशीन्स मुळे औद्योगिक क्रान्ति आली.

---------------------------------------------------------------------------------------
प्रश्न १३
आपण म्हणतो- पैसा खेळता ठेवला पाहिजे किंवा लक्ष्मी चंचल असते. याचा नेमका अर्थ कांय?

उत्तर-     आपण पैसा कमावतो तो पुढे मागे उपयोगी पडेल या एकाच कारणासाठी नाही कमावत. त्या पुढे जाऊन अशा साठलेल्या पैशांचा वापर करून कांही तरी नवीन काम केले- त्यातून चांगला नफा कमावला की अजून पैसा कमावला जातो. थोडक्यांत हाती आलेला  पैसा कुठल्यातरी चांगल्या कामाला लावला तर पैसा वाढत जातो पण साठवून ठेवला तर तो निष्प्रभ होऊ लागतो. म्हणून आपल्याकडे आलेल्या पैशातून पुढचा व्यापार हाती घेणे महत्वाचे असते.

------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न १४
एखाद्या कंपनीत शेअरहोल्डर असणे म्हणजे कांय?

उत्तर-     हा महत्वाचा मुद्दा आहे. अस समज की एका माणसाला नवीन व्यापार करण्यासाठी दहा हजार रुपये हवेत- पण त्याच्याकडे सातच हजार आहेत- तू त्याला तीन हजार दिलेस- त्याचा धंदा सुरू झाला. समजा त्याला या धंद्यामुळे महिन्याला बाराशे रुपयांचा फायदा मिळू लागला.  आता तुझ्यापुढे दोन पर्याय आहेत- एक तर त्याने तुझ्याकडून घेतलेले पैसे व्याजासह परत करावेत. पण दुसरा मार्ग असा की त्याला मिळत असलेल्या फायद्याचा तीस टक्के भाग त्याने तुला द्यायचा. अर्थात काम तो करतो- त्यामुळे किती फायदा झाला हे गणित करण्यापूर्वी त्याचा मेहनताना बाजूला काढला गेला पाहिजे.
    पण अशा तऱ्हेने त्याने दहा बारा जणांकडून पैसे गोळा करून काम सुरु केले असेल - मग ते काम म्हणजे फॅक्टरी असेल, व्यापार असेल,  बँक असेल- तर त्याच्या नफ्यामधून प्रत्येकाला त्याचा लाभांश
द्यायला हवा. त्यापैकी टक्केवारी अनुसार फायद्यातील  लाभांश घेणाऱ्यांना शेयरहोल्डर म्हटले जाते.


-------------------------------------------------------------------------------------
प्रश्न १५
मल्टिप्लायर इफेक्ट म्हणजे कांय?

उत्तर-    समज मला पगारापोटी जी रकम मिळाली त्यातले शंभर रुपये देऊन मी एक पुस्तक घेतले. पुस्तक विक्रेत्याने पैसे भाजीसाठी वापरले. भाजीवाल्याने मुलीची फी भरली- शाळेत प्रिंसिपलने ते पैसे शिपायाला पगारापोटी दिले --
    थोडक्यांत एखाद्या माणसाला मिळालेला पैसा एका हातातून दुसरीकडे फिरत जातो- दरवेळी त्या पैशांमुळे तेवढ्या रकमेचा व्यवहार होत रहातो. त्या पोटी जी एकूण कामे प्रत्यक्ष झालेली असतात त्यांची किंमत त्या शंभर रुपयांपेक्षा किती तरी जास्त असते. कुणीतरी कपाटात ठेऊन देईपर्यंत त्या पैशामुळे व्यापाराला चालना मिळतच असते. थोडक्यात पहिल्यांदा वापरलेल्या शंभर रुपयांपोटी शंभर-शंभर रुपये किंमतीची कितीतरी कामें झालेली असतात. यालाच मल्टीप्लायर इफेक्ट म्हणतात. 
जेंव्हा दोन व्यक्ति अदलाबदलीच्या व्यवहारांतून आपापली गरज भागवत असतात तेंव्हा हा इफेक्ट दिसू शकत नाही. मात्र चलनी  नोटांमार्फत व्यवहार झाल्याने असा इफेक्ट होतांना दिसतो. 

---------------------------------------------------------------------------------------------
16
प्रश्न १६:- लॉटरी मधे एखाद्याला खूप मोठे बक्षिस मिळते- ते पैसे कुठून येतात?

उत्तर-     लॉटरी मधे कांय करतात की लाखो रुपयाची तिकिट छापून ती विकतात- तेवढे पैसे सरकारला मिळतात- त्यातून तिकिट छपाईचा खर्च तसेच ती तिकिट ठिकठिकाणी पोचवणे, त्यांची विक्री इत्यादि खर्च सरकारला करावा लागतो. तिकिट घेणारे लाखो लोक असतात. प्रत्येकाने तिकिटावर लावलेले पैसे थोडे थोडेच असतात. मग त्यापैकी खूप थोड्या लोकांना मोठी बक्षीस दिली जातात. पण बक्षिसांवर द्यावी लागणारी एकूण रक्कम सरकारला मिळणाऱ्या रकमेपेक्षा बरीच कमी असते.
    आता यात ज्यांना लॉटरी लागली नाही त्यांचे कांय ? तर त्यांचे पैसे वाया गेले - प्रत्येकाचे वाया गेलेले पैसे थोडे असतात आणि “भाग्य तपासून तर पाहू या” ही चटक, अनिवार होते. त्यामुळे खूप लोक लॉटरीकडे वळतात. मात्र नैतिकतेचा किंवा खरेपणाचा विचार केला तर हे चूकच आहे.
    अस असूनही सरकार लॉटरी का चालवते ? कारण पूर्वी मटका हा प्रकार चालायचा- अजूनही थोड्या प्रमाणांत चालतो. त्यांत उतरलेली  माणसे मटक्यातील जीत-हार इत्यादि सर्वकाही योजना आखून घडवून आणायचे. त्यांत मिळणारा सर्व फायदा त्यांच्या खिशांत जायचा. माणसाला बिन मेहनतीचा फटाफट मिळणारा पैसा हवाहवासा वाटतो. त्या लोभापायी खूप लोक मटका चालवत आणि त्याहून कित्येक पट लोक मटका लावत. हा सगळा प्रकार लोकांना आळशी, ऐदी व कर्तृत्वहीन करणारा असतो.   म्हणून सरकारनेच हा धंदा हाती घेतला- आता निदान हा पैसा सरकारी तिजोरीत जातो आणि त्यांतून लोक कल्याणाच्या कांही योजना हाती घेतल्या जातात. त्यामुळे ज्यांना लॉटरी लागत नाही ते आपल समाधान करून घेऊ शकतात की चला - त्यांचा पैसा देशाच्या कांही तरी कामी लागला.

-----------------------------------------------------------------------------------------
१७
प्रश्न १७ सध्या खाण्यापिण्याच्या खूप गोष्टी पॅकबंद मिळतात  त्यांच्या सोई- गैरसोई गुण दोष काय?

बरोबर प्रश्न। माणसाला खूपदा तयार पदार्थांची गरज असते कारण पदार्थ तयार करत बसायला वेळ नसतो. आपण पोहे, भाजलेले चणे, दाणे, पापड, खाकरा, चकली असे पदार्थ तयार खाद्य म्हणून वापरतोच ना।

पण जस जस लोकांचा जीवन गतिमान होऊ लागल तस तस त्याची तयार वस्तुंची गरज वाढू लागली. मग तयार लोणची, तयार साॅस, तयार मसाले, तयार नूडल्स, तयार पिझ्झा, तयार जूस - जाम - जेली, अशा गरजा वाढत गेल्या. त्या बनवणाऱ्या कंपन्या अस्तित्वात आल्या. मग एक प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे ब्रॅण्डचा. समज एक कंपनी गणेश या नावाने नूडल्स करत आहे. त्यांचे २०० ग्रामचे पाकिटआहे. मी ते घरी नेऊन कापणार व उकळत्या पाण्यात सोडून दोन मिनिटांत माझा नाश्ता तयार करणार . 

पण त्याची चव कशी असेल ? मी चार दिवसांपूर्वी जे पाकिट आणल होत तशीच चव आजही असेल का? किंवा मी दुसऱ्या शहरात जाऊन तिथेही गणेश नूडल्स पाकिट घेतल तरी त्याचीही चव तशीच असेल का?
जर चव तशीच असल्याची गॅरंटी असेल तर एक फायदा होतो. मी ती वस्तू विकत घेत असताना मला तिच्याबद्दल थोडी कल्पना किंवा थोडी खात्री असते.  यालाच स्टॅण्डर्डायझेशन असे म्हणतात. गॅरंटी टिकवण्यासाठी उत्पादक कंपनीला प्रयत्न करावे लागतात. दरवेळी चव सारखीच ठेवण्यासाठी त्या उत्पादनात प्रत्येक गोष्ट एका ठरावीक प्रमाणातच टाकावी लागते. अशा प्रकारे त्या पदार्थाचा एक फॉर्म्यूला तयार झाला.  तो फॉर्म्यूला इतरांना कळू द्यायचा नाही, गुप्त ठेवायचा. याचीही काळजी घ्यावी लागते. या सर्व प्रक्रियेला ब्रॅण्डिंग असे म्हणतात.

पण अशा स्टॅण्डर्डायझेशन एक तोटाहीअसतो. कधीही खा, तीच चव -- याचा कंटाळा येऊ लागतो. सुरवातीला छान चविष्ट वाटणारा पदार्थ त्याच त्या चवीमुळे  नकोसा होतो. चेन होटेल मधेही हाच प्रकार होतो. यावर उपाय असा की एकच पदार्थ बनवणाऱ्या पण  गावागावांचे वैशिष्ट्ये जपणाऱ्या अशा वेगवेगळ्या कंपन्या असतील तर हा कंटाळा कमी होऊ शकतो. 

पण अशी गावा-गावांचे वैशिष्ट्ये सांगणारे खाद्य पदार्थ विक्रीला उभे करण्याचे तंत्र अजून आपल्या कडे मोठ्या प्रमाणावर नाही. फक्त एकाद्या फूड फेस्टीवलमधे आपल्याला विविध चवींचे प्रकार चाखायला मिळू शकतात -- उदा, कोल्हापूरी, खानदेंशी, मालवणी, गोंय,  वगैरे. 

या बाबतीत एक संवेदनशील लेखक श्री जालिंदर कांबळे यांनी मला एक मजेची गोष्ट सांगिलली. भारतातील एकूण सर्व पोटजातिंची यादी केली तर या सुमारे २५००० च्या आसपास भरतील. हा अभिशाप का मानायचा ? या प्रत्येक पोटजातीचे कुळदैवत वेगवेगळ्या डोंगरशिखरावर तरी किंवा नदीघाटावर तरी आहे. म्हणजेच तेवढ्या डोंगरशिखरांचे आणि नदीतीरांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या त्या पोटजातीला देऊन निसर्गरक्षणाचा बंदोबस्त केला गेला होता. प्रत्येक कुळदैवतेचा नैवेद्य वेगळा -- म्हणजेच तेवढ्या पाककृतींचे संरक्षण करण्याची व्यवस्था तयार झाली.  हजारो वर्षे आपला निसर्ग व खाद्यसंस्कृति टिकवून ठेवण्याची ही पद्धत आपला समृद्ध वारसा नाही का ? आणि आजच्या छोट्या झालेल्या जगात तर याचे महत्व खूप आहे कारण हे विविध खाद्यपदार्थ त्यांच्या विशिष्ट चवींचा दाखला देऊन निर्यात केले तर किती मोठी बाजारपेठ आपण काबीज करू शकतो.

कंटाळ्याच्या मुद्द्यावर परत येऊ या. कंटाळा हा जसा खाद्यपदार्थांच्या बाबतीत येऊ शकतो तसाच तो इतरही बाबतीत येऊ शकतो. उदा. एकाच धर्तीचे कपडे किंवा एकाच  प्र्कारची ग्रीटींग कार्ड्स. 

थोडक्यात स्टॅण्डर्डायझेशनचे खूप फायदे आहेत. मात्र त्यात कंटाळा हा मोठा धोक्याचा तोटा आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------
काहीतरी वेगळे पण घ्यावे असे
रयतवारी आणि जमीनदारी या दोन पद्धतींमधे दुष्काळ इत्यादी प्रसंग  सूट कशी आणी किती द्यावी या मुद्यांचा उहापोह महत्वाचा आहे. रयतवारी  व्यवस्थेत शेतकरी राजाला थेट जबाबदार असे आणी टॅक्स गोळा करणारे राज्याचे पगारदार नोकर असत. सन् १००० पासून पुढे भारतावर मोगल, तुर्क इत्यादी जी परकीय आक्रमणे झाली, त्यांत त्यांनी इथून  फक्त  संपत्ति लुटून नेण्याचे धोरण न ठेवता इथेच राज्य करण्याचे धोरण ठेवले. त्याही राजांना कारभार चालवण्यासाठी लागणारा पैसा (टॅक्स) हा शेतकऱ्याकडून येणार होता. पण या नव्या, परमुलकातून आलेल्या राजांनी टॅक्स गोळा करण्यासाठी नवीन पद्धत आणली. ती होती ठेकेदारीची पद्धत. त्यांनी जमीनदार या नावाचा एक ठेकेदार वर्ग निर्माण केला. जमीनदाराला राजाने एखाद्या मोठ्या भूभागाची जमीनदारी द्यायची, त्या बदल्यात त्याने राजाला दर वर्षी एक ठराविक रकम अदा करायची. तेवढी केली की त्याने ती रकम शेतकऱ्याकडून वसूल करावी. तो अधिकार त्याचा झाला . मग तो शेतकऱ्यावर जो काही जुलूम करेल त्याची तक्रार राजाकडे होऊ शकत नसे व हे परकीय राजेही त्या तक्रारींच्या भानगडीत पडत नसत.
                                  --------------------------------------------------------------
प्रश्न १८ 
बँकांच्या खर्च व मिळकतीच्या बाबींचा मेळ कसा घातला जातो. 
उत्तर- बँकेच्या खर्चात चार गोष्टींचा समावेश होतो. पहिले म्हणजे ऑफिस चालविण्याचा खर्च, माणसांचे पगार इत्यादी . दुसरा म्हणजे ज्या ठेवी बँकांकडे येतात त्यावर द्यावे लागणारे व्याज . तिसरी बाब म्हणजे रिझर्व्ह  बँकेच्या नियमाप्रमाणे बँकांना त्यांच्याकडे काही पैसा गंगाजळी म्हणजे रिझर्व्ह म्हणून ठेवावा लागतो. चौथा म्हणजे वसूल न झालेले वा न होऊ  शकणारे कर्ज. चौथ्या गोष्टीला नाॅन परफॉरमिंग असेट म्हणतात.
या चारही प्रकारचे खर्च भरून काढताना बँक ज्यांना कर्ज देते त्यांच्याकडून मिळणारे व्याज हे  बँकेचे एकमेव उत्पन्न असते. या शिवाय बँकेकडे ठेवी घेतांना जे पैसे बँकेकडे ठेवले जातात ते पैसे बँकेकडे खेळते भांडवल म्हणून वापरता येते कारण ते  लगेच परत करायचे नसतात. यातलाच काही पैसा बँक कर्ज म्हणून देते व उरलेला पैसा गंगाजळी म्हणून दाखवते. बँककडे असलेले ठेवींवर जेव्हा १० टक्के व्याज दिले जाते तेव्हा बँकेकडून कर्ज घेणाऱ्याला १८ ते २० टक्के व्याजाचा दर लावतात. या फरकातूनच बँकेच्या खर्चाची  जुळवणी होते.
-------------------------------------------------------------------------------------
 प्रश्न १९ 
खाजगी सावकारांचा धंदाही याच तऱ्हेने चालतो का 
होय. तत्व हेच  पण दोन तीन फरक आहेत.  खाजगी सावकर छोट्या प्रमाणावर वावरतो. त्याची उलाढाल देशभरांत होत नसते. तो वसूली बाबत जास्त कटेकोर असतो. त्याच्याकडे येणाऱ्या ठेवी  कमी असतात, म्हणजेच सुरुवातीला त्याचाच पैसा या धंद्यात लागलेला असतो. म्हणून त्याचे व्याजाचे  दर जास्त असतात. त्याला लागणारे तारणही मोठे असते. आपल्या देशात खाजगी सावकरी हा गुन्हा ठरवलेला आहे व ------------ अॅक्टखाली खाजगी सावकराविरुद्ध कारवाई होऊ शकते .
                                     --------------------------------------------------------
प्रश्न २० 
तारण म्हणजे काय
बँका किंवा खाजगी सावकर जेंव्हा कुणाला कर्ज देतात त्यावेळी कर्जाची परतफेड खात्रीपूर्वक होईल असेही त्यांना बघावे लागते. यातही कर्ज घेणाऱ्याकडील काही वस्तू तारण म्हणून लिहून घेतली जाते- उदाहरणार्थ जमीन किंवा  सोन्या-चांदीचे दागिने , किंवा उद्योगाची मशीनरी इत्यादी. ती व्यक्ती कर्ज फेडू शकली नाही तर तारण म्हणून ठेवलेली वस्तू जप्त होते, म्हणजेच ती बँकेच्या ताब्याची होते व ती विकून बँकेला जो पैसा मिळेल तो कर्ज वसूली म्हणून दाखवला जाते.
-----------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न- 
बँकांना बरीच विशेषणे लावलेली दिसतात. तर बँका किती प्रकारच्या असतात.
आपल्या देशांत राष्ट्रीयकृत बँका, नाॅन-नॅशनलाइज्ड बँका, कोऑपरेटिव्ह बँका, लॅण्ड डेव्हलपमेंट बँका , हाउसिंग फायनान्स बँका , इन्फ्रास्ट्र्क्चर फायनान्स बँका अशा विविध प्रकारच्या बँका विविध सेक्टर्सना पुढे आणण्यासाठी आहेत. त्यांचे कायदे वेगवेगळे आहेत.
         -----------------------------------------------------------------------                       

प्रश्न २१ -  (पान २८)
कंपनी म्हणजे काय. कंपनी या संकल्पनेची सुरुवात व फिलॉसफी काय 
NOT WRITTEN BEYOND THIS
---------------------------------------------------------------------------------------------------
हे सर्व आज तपासले -- २४-०८-२०१८
 -------------------------------------------------------------------------------------------------------

















No comments:

Post a Comment