मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Wednesday, November 4, 2009

4/ 'त्या' नागपूरी स्त्रियांच्या सोबतीसाठी

'त्या' नागपूरी स्त्रियांच्या सोबतीसाठी
मटा दि. ???
नागपूर मधे दिवसा ढवळया भर कोर्टात अक्कू यादव नावाच्या बलात्काराच्या आरोपीला तिथे जमलेल्या स्त्रियांनी ठार केले याची खूप चर्चा मिडिया ने केली. पण प्रबुद्ध समाजाने केली नाही. मिडिया सुद्धा- सतत नव्या घटनांमागे। दुसरा दिवस उजाडला- दुस-या घटना घडल्या आणि ही न्यूज मागे पडली. आता त्या खुनाच्या केस मधे अडकलेल्या स्त्रियांना इथून पुढचा प्रवास एकटाच करायचा आहे. त्यांना सोबत म्हणून एक गोष्ट आणि एक कायदा !

गांवाकडचा एक शेतकरी एकदा चांगल्याच आर्थिक अडचणीत सापडला. निरुपाय म्हणून त्याने आपला एकमेव हृष्ट-पुष्ट बैल विकायला काढला. ब-याच अंतरावर एक मोठे गांव होते तिथे मोठया बाजारांत बैलाला चांगली किंमत मिळेल म्हणून घेऊन गेला. बाजाराची गर्दी पाहून तो भांबावला, हे त्याच्या चेह-यावरून उघड दिसत होते.
तेवढयांत एक धटिंगण आला आणि बैलाची दोरी हिसकावून आपल्या हातात घेतली. शेतक-याने विचारले- हे तू कांय चालवलेस? धटिंगण म्हणतो - कांही नाही, बैल विकायला घेऊन चाललो आहे. शेतकरी म्हणाला- अरे, पण बैल माझा आहे. धटिंगण म्हणतो, वा रे वा, माझा बैल लुबाडू पाहतोस कांय ?

वाद वाढला तशी गर्दी गोळा झाली. बैल शेतक-याचाच असणार अशी ब-याच लोकांची खात्री होती पण करणार कांय? धटिंगणाच्या दाव्याला खोडणार कसे?

तेवढयांत गर्दीतला एक माणूस पुढे आला आणि आपल्या डोईवरचे पागोटे सोडून बैलाच्या चेह-यावर पांघरले. मग तो धटिंगणाला म्हणाला- कांय रे, बैल तुझा ना, मग सांग पाहू- तुझ्या बैलाचा कोणता डोळा जखमी झालाय्‌- उजवा की डावा ? धटिंगण म्हणाला उजवा, पण - अं.. मला नेमका आठवत नाही - बहुतेक डावा. त्या माणसाने शेतक-याला विचारले - तू सांग रे, कोणता डोळा जखमी आहे? शेतकरी म्हणाला - दोन्हीं डोळे नीट नेटके आहेत - कुठलीच जखम झालेली नाही. बैलाच झाकलेल तोंड उघडल- जखम नव्हती. तत्काळ निवाडा झाला. लोक म्हणाले- पहा, एका हुशार माणसामुळे किती पट्कन आणि कसा योग्य न्याय मिळाला.

पण शहर कोतवालाला हे पटेना. त्याने आपल्या रॅक वरून सगळी कायद्याची पुस्तक काढून पालथी घातली. लोक म्हणतात न्याय झाला ! अरे, पण झालाच कसा? कोतवालीत वर्दी नाही, एफायार नाही, तर मग न्याय कसा होणार? ते कांही नाही. त्याने शेतक-याला हटकले - आधी वर्दी दे. ब-याच बाताबाती नंतर शेतकरी म्हणाला, अरे, पण त्या हुशार माणसाने न्याय केलेला आहे ! कोतवाल म्हणतो - नाही, तो सरकारने नेमलेला न्यायाधीश होता कां? तो तर गर्दीतला एक सामान्य माणूस होता. बाजाराच्या एरिया मधे त्याची ज्युरिसडिक्शन होती कां? शेतक-याला हे इंग्रजी शब्द आणि सरकारी नेमणूकीचा संबंध कळेना. पण वाद नको म्हणून तो म्हणाला- बरं देतो वर्दी, कोतवाल म्हणतो - इथे नाही, चौकीवर येऊन दे.

शेतकरी चोकीवर गेला. तिथल्या कान्स्टेबल ने सांगितले- ठाणेदार गांवात चौकशीला गेलेत. थांबावे लागेल. शेतकरी थांबला......... थांबला............। नंतर एफायार नोंदणे व कोर्टात जाणे हे करतांना इतरांचे जे होते तेच त्या शेतक-याचे झाले.

तात्पर्य कांय, की गर्दीतला एखादा सामान्य माणूस देखील प्रसंगी अत्यंत योग्य न्याय करू शकतो. पण
अशा सर्वांना दूर ठेऊन फक्त पुस्तकाबरहुकूम निकाल द्यायचा झाला तर न्यायाची पायमल्ली होऊ शकते.

आता एक गंभीर कायदा. त्याचे नांव इंडियन एव्हिडंस ऍक्ट. तिथे चित्र कांय दिसते? न्यायदानाचे मुख्य पुस्तक तरी बायकांची बाजू गेते कां? निदान तटस्थ - स्त्री पुरुषाबाबत सारखा दृष्टिकोण दाखवते कां ? की तिथेही स्त्री वर अन्याय आहे? होय्‌ न्यायदानाच्या या पुस्तकातच स्त्री वर अन्याय आहे.

समजा एका माणसावर तीन वेळा बलात्काराचा आरोप होऊन प्रत्येक वेळा तो पुराव्याअभावी सुटला आहे त्या नंतर चौथ्या वेळी त्याला पुन्हा त्याच आरोपाखाली न्यायालयांत आणले आहे
समजा फिर्यादी पक्षाने कोर्टापुढे मुद्दा मांडला - याच्यावर तीन वेळा असा आरोप झाला आहे - त्याचे जुने केसपेपर्स पहा, तो सुटला असेल, पण त्याची कार्यपद्धति दिसून येईल, म्हणून हे केसपेपर्स पहा. या वेळी याने हा गुन्हा केला असण्याची दाट शक्यता लक्षांत घ्या - वगैरे ! तर इंडियन एव्हिडंस ऍक्ट चे कलम ५४ दाखवून आरोपीचा वकील सांगेल- आरोपी चे पूर्व चरित्र तपासायचे नाही. फक्त चालू गुन्ह्याबाबत बोला.

या नियमामागचे तत्व कितीही उदात्त असेल - मला फक्त बलात्काराच्या आरोपासंबंधात त्याचा परिणाम कांय होतो एवढाच मुद्दा मांडायचा आहे, कारण बलात्काराचा आरोपी फक्त पुरूष असतो.

आता दुस-या एका कमी उदात्त तत्त्वामुळे कांय होते पाहू या. त्याच इंडियन एव्हिडंस ऍक्ट चे कलम १५५ (४) सांगते की जर एखाद्या स्त्री ने कुण्या पुरूषावर बलात्काराचा आरोप केला असेल. तर अशा स्त्रीचे पूर्व चरित्र संशयास्पद होते हे सिद्ध केल्यास तिने दिलेला साक्षी पुरा अग्राह्य मानला जाऊ शकतो

म्हणूनच कुठलीही स्त्री बलात्काराच्या केस मधे साक्ष देण्यासाठी उभी राहिली कि सर्वांत आधी तिच्या पूर्वचरित्राचे धिंडवडे निघतात. बलात्कार होत असतांना ती आवडीने मिटक्या मारत होती असे म्हणायला देखील आरापीचे वकील मागे पुढे पहात नाहीत आणि न्यायाधीश त्यांना अडवू शकत नाहीत. तिला एवढे अपमान आणि लांछनास्पद प्रश्न विचारले जातात की हतबल होऊन रडण्यापलीकडे ती कांही करू शकत नाही. मग समोर असलेल्या चौकशीवरून तिचे लक्ष उडते. तिने दिलेली साक्ष अग्राह्य ठरवायला सगळे मोकळे होतात.

मला या १५५ (४) कलमामधील प्रोसिक्यूट्रिक्स हा शब्द देखील अन्यायकारक आणि दूषित वाटतो. संपूर्ण एव्हिडंस ऍक्ट वाचा. गुन्ह्याच्या सर्व केसेस मधे राज्य सरकार आणि फक्त राज्य सरकारच फिर्यादी असते ज्याच्या घरी चोरी झाली, जो अपघातात जखमी झाला, ज्याला मारहाण झाली ते सर्व जण कोर्टापुढे येतात ते फक्त फिर्यादी पक्षाचे साक्षीदार म्हणून. फिर्यादी असते ते सरकार. अपवाद मात्र बलात्काराचा आरोप करणारी स्त्री. एव्हिडंस ऍक्ट मधे तिचे वर्णन प्रोसिक्यूट्रिक्स असे आहे. जणू कांही आरोप सिद्ध करायची जबाबदारी फक्त तिचीच आहे. आणि ते सुद्धा आधी सीतामाई सारखे अग्निदिव्य करून मगच.

कदाचित हा शब्द फक्त सिम्बॉलिक म्हणून आला असेल. पण शेवटी त्या सिम्बॉलिक शब्दातूनच स्त्री विरूद्ध मनोभूमिका तयार होते.

ज्या न्याय व्यवस्थेत आरोपीच्या पिंज-यात ५४ व्या कलमाचे सुरक्षा कवच मिळालेला पुरूष आणि फिर्यादीच्या पिंज-यात सरकार ऐवजी बलात्कारित स्त्री - आणि तिच्या पूर्वचरित्राचे पूर्ण धिंडवडे काढण्याची मुक्त परवानगी आरोपी पक्षाला आहे, त्या न्याय व्यवस्थेसमोर 'आम्हीच न्याय केला' अस म्हणत कांही, गर्दीतल्या, चेहरा मोहरा नसणा-या, ज्युरिसडिक्शन नसलेल्या स्त्रियां उभ्या ठाकल्या आहेत. त्यांची 'न्यूज' करून मिडिया आपल्या कर्तव्यातून मोकळी झालेली आहे. प्रबुद्ध समाज डोळ्‌यावर कातडे घेऊन निद्रादेवीची आराधना करीत आहे.
-------------------------------------------------------------------
लीना महेंदले, ई १८, बापू धाम, सेंट मार्टीन मार्ग, नई दिल्ली ती १३.९.०४ फोन नं०-२६१९८७९९

No comments:

Post a Comment