मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Saturday, July 25, 2020

लखनऊ स्टेशनावर मी -जडणघडण


लखनऊ स्टेशनावर मी
लीना मेहेंदळे ९४२२०५५७४०
लखनऊ स्टेशनावरील ती दुपार माझ्या मनावर कायमची कोरलेली आहे. दिवस होता ११ जुलै १९७४. लांबच लांब फलाट, प्रचंड गर्दी, धावणारे लोक. त्यांच्यामधलीच मी एक. लखनऊ दिल्ली गाडी येण्याची वेळ होत आली होती. कुलीला मी म्हणाले होते की बाबा, लेडीज डब्यात बसवून दे. त्याच्या डोक्यावर एक होल्डॉल, दोन सुटकेस आणि एका खांद्यावर लटकलेला थैला. माझ्याकडे पण एक सुटकेस, एक खाण्यापिण्याची थैली आणि एक पर्स. त्याच्याकडे ठेवलेल्या चार सामानाच्या डागात माझ्या पुढच्या पूर्ण वर्षभर मसूरीला राहण्याची व्यवस्था होती- अर्थात कपडे, अंथरूण-पांघरूण, पुस्तके, शूज, दागिने-साजशृंगार वगैरे सर्व.
गाड्या येत असतात - गर्दी पळत असते। कोणीतरी मला सांगतं लखनऊ-दिल्ली गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर येत आहे. गर्दी सोबत मी पण पळत, पायऱ्या चढत-उतरत कशीबशी त्या प्लॅटफॉर्म वर पोहचून लेडीज डबा शोधून त्यात एक खिडकी पकडते. मागे बाकी गर्दीसुद्धा डब्यात घुसत असते. आता माझ्या लक्षात य़ेते की कुली कुठे आहे ते मी बघितलच नाही. आता काय करू- उतरू की बसू. उतरण्यासाठी रस्ता काढत जाईपर्यंत वेळ लागणार होता. पुन्हा पुन्हा खिडकीतून डोकावून पाहत होते. गाडीचा सिग्नल पिवळा झाला मग माझी काळजी वाढली. तेव्हाच लांबून तो येताना दिसला. त्या दिवसात रेल्वेतील खिडक्यांना बार लावलेले नसत त्यामुळे खिडकीतून डोकं बाहेर काढून दूरवर पाहता येत होते. तो दिसला तेव्हा जिवात जीव आला. तो पळत-पळत येत होता. खिडकीतूनच त्याने सामान आत दिले.
म्हणाला- तिकडे पण एक लेडीज डबा होता, मी तुम्हाला म्हणालो होतो कि माझ्या मागेमागेच रहा. मग तुम्ही इकडे का आलात. पॅसेंजरचे सामान मागे राहू नयेे ही आमची जबाबदारी असते - वगैरे। तो त्याच्या प्रौढत्वाचा चांगलाच फायदा घेत होता. मी त्याला पैसे दिले. जेवढे ठरले होते तेवढेच दिले आणि त्यानेही जास्त मागितले नाहीत. गाडी चालू लागली.
पुढचे कितीतरी तास मी ईमानदारी नावाच्या सामाजिक गुणाचा विचार करत राहिले. तो माझे सामान घेऊन कुठे तरी गेला असता किंवा गाडी चालू होईपर्यंत मला शोधू शकला नसता तर. पण जोपर्यंत समाजात ईमानदारी आहे, तोपर्यंत माझ्या अशा छोट्या- मोठ्या चुकांसाठी क्षमा आहे.
जेंव्हा बराच काळ असे समाज-परिशीलन करून झाले तेव्हा मागच्या दहा दिवसांच्या घटनाक्रमाने माझ्या मनाची जागा घेतली आणि मनाने तीच पाने पालटणे सुरु केले.
मे महिन्यात लग्न होऊन मी नवी नवरी बनून कलकत्याला आले होते. यूपीएससीची तोंडी परिक्षा एप्रिल मधे झाली होती आणि निकालाला अवकाश होता. जर निवड झाली तर जुलै मध्ये ट्रेनिंगसाठी मसूरीला जायच होत. माझ लग्न ठरल्यावर लगेच माझ्या सासऱ्यांनी माझी निवड व्हावी म्हणून गुरुवारचे उपवास धरले होते. ही श्रद्धा सुद्धा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि सामर्थ्य भरून ठेवत असते. इकडे माझ्या आईनेही शनिवारच्या उपवासाचे व्रत ठेवले होते. सर्वांचे आशीर्वाद आणि माझ्या मेहनतीचे फळ म्हणूया - जून मध्ये समजले की माझी आय़एएस मध्ये निवड झाली आहे. दूरवर स्थित माझे जन्मगाव धरणगाव. तिथले आमदार तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन महसूलमंत्री श्री मधुकरराव चौधरी यांनी दरभंगा येथे माझ्या वडिलांना अभिनंदनाची तार पत्र पाठवले जे त्यांनी पुढे बरीच वर्षे जपून ठेवले होते.
निकाल आल्यावर मात्र मला पटापट हजारो कामे करायला हवी होती. मी आधी दरभंग्याला आले जिथे माझे आई-वडिल, भाऊ-बहीण, परिचित आणि माझे खूप सामान होते आणि जिथे मी लहाणपणीचेी पंधरा वर्षे घालवली होती. शिवाय पटनाच्या लेडीज हॉस्टेलमध्येही माझे सामान होते. मगध महिला कॉलेजमध्ये माझी लेक्चररची नोकरी होती तिथे औपचारिक पत्र द्यायला हवे होते की मी इथून पुढे येऊ शकणार नाही. पटना युनिव्हर्सिटी मध्ये माझी पीएचडीची नोंदणी होती. त्यांच्याकडून पूर्वसंमत्ती मिळाली होती की आयएएस मध्ये निवड झाली तर एनओसी देतील, ती घ्यायची होती. पटना हॉस्टेलमधून सर्व सामान दरभंग्याला नेऊन पुढच्या एका वर्षाच्या ट्रेनिंगसाठी नवीन प्रकारे सामानाची बांधाबांध करायची होती. थोड्या पैशांची व्यवस्था करायची होती. आणि खूप साऱ्या मित्र-मैत्रिणी-गुरु-परिचितांचा निरोप घ्यायचा होता. दरभंगाच्या सीएम कॉलेजला जाऊन सगळ्या शिक्षकांना आणि खास करून फिजिक्स डिपार्टमेंटच्या प्राध्यापकांना भेटायचे होते. माझ्या श्रेयात त्यांचे शिक्षण प्रोत्साहन याचे विशेष महत्व होते. सीएम कॉलेजमधे शिकून आयएएस मध्ये येणारी मी पहिली स्टूडेण्ट होते.
पण जे काम अटळपणे व्हायला हव होत आणि होत नव्हतं, ज्याच्याशिवाय सर्व काही तसेच राहणार होत, ते होत यूपीएएसीचे पत्र येणे. ते काही येत नव्हत.
दरभंगा शहरात पोस्टिंग असलेले एक सीनियर आयएएस श्री अडिगे माझ्या वडिलांचे मित्र होते. माझ्या आयएएस होण्यासाठी त्यांनीच बऱ्याचदा मला वडिलांना योग्य सल्ला दिला होता. त्यांनी सांगितले दिल्लीमध्ये यूसपीएससीच्या कार्यालयात जाऊन ते पत्र घ्यावे लागेल, नाहीतर निश्चित तारखेला ज्वॉइन केले नाही तर कठीण होईल. त्यामुळे माझा छोटा भाऊ सतीश दिल्लीला गेला आणि मग तार आणि टेलीफोनने त्याने निरोप दिला– दीदीला लवकर पाठवा- १४ जुलै पर्यंत ज्वॉइन व्हायचे आहे. ती जुलैची दुपार होती- थोडासुद्धा वेळ नव्हता. रेल्वेने जायचा रस्ता निश्चित केला- १० तारखेला दरभंगा येथून समस्तीपूर, तिथून लखनऊ पुन्हा गाडी बदलून दिल्ली. आणि १२ ला दिल्लीतून देहरादूनला निघायचे.
दुसऱ्या दिवशी सकाळी माझे वडील मला समस्तीपूरपर्यंत सोडायला आले. एकटीने रेल्वेप्रवास करण्याची ही माझी पहिली वेळ नव्हती. दरभंगा-पटना-मुगलसराय-इटारसी-जळगाव-धरणगाव मार्गावर मी आधी खूप वेळा एकटीने प्रवास केला होता. वडिलांनाही माझ्या क्षमतेवर विश्वास होता की मी स्वतःची काळजी घेऊ शकते. तरी सुद्धा अनेक प्रकारे सूचना देऊन मला लखनऊ गाडीमध्ये बसवले. तिथून वीस तासांचा प्रवास करून मी लखनऊला पोहचले. त्याच प्लॅटफॉर्मच्या सुविधांचा उपयोग करून आंघोळ केली होती. त्या काळी प्रत्येक रेल्वे स्थानकावर सामान्य लोकांना सुद्धा वापरणीय वाटतील अशी स्वच्छ प्रतीक्षालये सुविधा असत. प्रत्येक मोठ्या स्थानकावर रुचकर पुरी-भाजी, पिण्यासाठी शुद्ध पाणी . सुविधा होत्या. त्रास होता तो फक्त खूप सामान असल्यामुळे. पण चला, आता तर गाडी पूर्ण वेगाने दिल्लीकडे झेपावत होती.
पुढील दिवशी दिल्ली स्थानकावर सतीश मला घ्यायला आला होता. यूसपीएससी कडून सर्व जरूरी कागदपत्रे आणि ज्वाइनिंग ऑर्डर घेतले होते. त्याचा शाळेचा मित्र धनंजयचा मोठा भाऊ ज्यांना आम्ही नारायण भैया म्हणत असू, त्यांच्या घरी पोहोचलो. ते केंद्र सरकारच्या राजभाषा विभागात अधिकारी होते. तिथून दरभंगा, कोलकत्ता मुंबईला बातमी पाठवली की आतापर्यंत सर्व ठीकठाक आहे.
संध्याकाळी दिल्लीहून देहरादूनला जाण्यासाठी मसूरी एक्सप्रेसमध्ये बर्थचे रिझर्वेशन सतीशने करुन ठेवले होते, तिथे पोहचलो. सतीश जाऊन वर्तमानपत्र, पाणी, काही फळे इत्यादि घेऊन आला. आता तो काहीतरी बोलणारच, तेवढ्यांत अचानक एक भूकंपासारख झाल. माझ्या सारखेच भरपूर सामान घेऊन तीन महिला आत आल्या आणि माझ्या समोरच्या सीटवर कब्जा केला. त्यांची अखंड चर्चा चालु होती. पुढील प्रवासाच्या हेतुने दिल्या जाणाऱ्या सूचनांचा पाऊस पडत होता. नंतर गाडी सुटण्याची वेळ होत आली म्हणतांना एका तरुणीला गाडीत सोडून दुसरी तरूणी तसेच एक प्रौढ महिला जी नक्कीच त्यांची आई होती, अशा दोघी खाली उतरल्या. पण सूचना चालूच राहिल्या. कसे तरी त्यांना थांबवून मी सहप्रवासी तरूणीला परिचय विचारला आणि कळले की तिलाही मसूरीला जायचे होते- त्याच मसूरी अकॅडमीमध्ये, त्याच आयएएसच्या प्रशिक्षणासाठी. सतीशने सगळ्यांना ऐकवत मला हिंदीत म्हटले- हाँ तर दीदी, आता सर्व आवश्यक सूचना तू ऐकल्या आहेसच, मी सांगण्यासारख काही वेगळ राहिलेल नाही. सगळे हसले आणि रेल्वेने प्रस्थान केले.
मग राजलक्ष्मीसोबत बोलणं सुरू झालं. ती दिल्लीच्या उच्च-मध्यमवर्गीय परिवारातील होती, शुद्ध तमिळ, हिंदी इंग्लिश बोलत होती. तिचे वडील वारलेले असून आईनेच तिला वाढवले होते आणि आयएएसचे स्वप्नही दाखवले होते. आम्ही एकमेकींसोबत आपापले परिवार, अभ्यास, छंद, मित्रमंडळी इत्यादी बद्दल बोलत राहिलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी देहरादूनवरून मसूरीसाठी टॅक्सी पकडली. राजीचा परिचित आणखीन एक प्रशिक्षणार्थी भेटला जो पोस्टल सर्विससाठी निवडला गेला होता. मसूरी अकॅडमीमध्ये पोहचल्यावर आधी रिसेप्शनवर ज्वॉईनिंग रिपोर्ट दिले. अकॅडमीतील लोकांनी आणखी काही कागदांवर स्वाक्षऱ्या करून घेतल्या. त्यांच्यातल्या कोणत्यातरी कागदावर पगार या सदराखाली एका छोट्या रकमेचे वर्णन होते. राजीने मला समजावले की या बेसिक सॅलरीमध्ये डीए इतर अलाउंस इत्यादी मिळून हातात येणारी रक्कम मोठी होते. बरे वाटले की कॉलेजमधील फिजिक्सच्या लेक्चररच्या तुलनेत हा पगार थोडा जास्त होता. या गोष्टींची माहिती मला नाही पण राजीला आहे हे कस. तिने समजावले की मोठ्या शहरात अशी माहिती सर्वांना आपोआप मिळत राहते- पुढेही काही व्यावहारिक मुद्दा असेल तर माझ्याकडून शिकुन घेत जा. हे सोपे होते की कारण योगायोगाने मला आणि राजीला लेडिज हॉस्टेलमध्ये एकच रूम मिळाली होती. मी पुन्हा एकदा समाजातील आधारभूत सज्जनतेचे आभार मानले. अशा प्रकारे आयएएसमधील एका वर्षाची मसूरी ट्रेनिंगची पूर्वतयारी पूर्ण झाली.
---------------------------------------xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx--------------------------

No comments:

Post a Comment