मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Sunday, June 2, 2024

6 जबलपूर मधील शालेय जीवन - लेखमाला मिळून साऱ्याजणी

 

लेखमालेतील लेख क्र 6

words 1200

लीना मेहेंदळे 9869039054

leena.mehendale@gmail.com


जबलपूर मधील शालेय जीवन


माझे आजोबा, वडील व मी स्वतः धरणगावकर, म्हणजे आमचा जन्म तिथे झालेला. आजोबा पंचक्रोशीत हुशार नावाजलेले व त्यांच्या काळातील व्हर्नाक्यूलर फायनल ही मानाची परीक्षा पास होऊन काही काळ तिथल्याच शाळेत गणित शिक्षक म्हणून वावरले. त्यांच्या हृद्य आठवणी पुन्हा कधीतरी. वडिलांचे शिक्षण धरणगाव, अमळनेर, पुणे, नाशिक, लोणावळा, मुंबई असे झाले होते. संस्कृत, मराठी व तत्त्वज्ञान या विषयांत एमए आणि वेदांत फिलॉसफीवर पीएचडी. आई देवरुखची. तिचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण देवरुखला झाले. लग्नानंतर नागपूर येथील एसएनडीटी विद्यापीठातून प्रायव्हेट परीक्षा देत तिने बीएपर्यंतच्या परीक्षा पूर्ण केल्या. वडिलांना सुरुवातीला नोकरीसाठी बरेच भटकावे लागले, त्यामुळे मला शाळेत घातले नव्हते. आई व आजोबा माझा अभ्यास घेत – म्हणजे अक्षरलेखन, पाढे, तोंडी गणितं, आणि वर्तमानपत्राचे ढोबळ वाचन.


मी सात वर्षाची असताना 1957 च्या आरंभी वडिलांना जबलपूरच्या हितकारणी कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरी लागली. आम्ही सर्व म्हणजे नाना (आजोबा), आई - दादा, मी, पाठची दोन भावंडं छाया, सतीश, आणि धाकटया आतेची मुलगी मंगल असे आम्ही सर्व जबलपुरला आलो. कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. बाजपेयी त्यांच्या स्वत:च्या मोठया घरांत एकटेच रहात - तिथलाच खालचा मजला आम्ही भाडयाने घेतला. शिवाय त्यांचे जेवणही आईने बनवायचे असेही ठरले. तेंव्हा पहिल्यांदा आम्ही कच्ची रसोई, पक्की रसोई हा प्रकार पाहिला. आम्ही ब्राह्मण आणि डॉ.बाजपेयी हे ही ब्राह्मण- म्हणून तर ते आईच्या हातचा स्वैंपाक खाऊ शकत होते. पण त्याच्या मते ते अधिक उच्च ब्राह्मण होते - कांदा-लसूण न खाणारे - कान्यकुब्ज (कन्नौजी) ब्राह्मण. त्यामुळे आईला त्यांच्याकरता ``पक्की रसाई`` बनवावी लागे - म्हणजे कांय तर स्पैंपाकात कुठेही पाणी वापरायचे नाही- त्या ऐवजी दूध वापरायचे. भात शिजवायल दूध, कणीक भिजवायला पण दूध. भाजी तेलांत नाही तर तुपावर करायची. पण आई ती सर्व पथ्य सांभाळत असे. अशा प्रकारे घरांत दोन वृद्घ माणसं आणि चार मुलं पण आईने मला कधीच घरातल्या कामाला लावलं नाही, मी स्वत: करीन तेवढेच. मला पण गोष्टीची पुस्तकं आणि बाहेरचे खेळ यातून मधेच आठवण होई - मग मी कांहीतरी काम करून आपण आईला मदत केल्याचे समाधान मानत असे.


घर लागल्यानंतर लगेचच दादा मला जवळच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या मराठी शाळेत घेऊन गेले. त्या काळच्या प्रथेप्रमाणे हेडमास्तरांनी काही तोंडी प्रश्न विचारून माझी पात्रता ठरवली व तिसरीत प्रवेश देत आहोत असे सांगितले. कोणालातरी बोलावून मला तिसरीच्या वर्गात पाठवले. तो दिवस मला खूप स्पष्टपणे आठवतो. मी पाटी पेन्सिल घेऊन तिसरीच्या वर्गात आले. तिथे गणिताचा तास चालू होता. तोंडी गणितांचा. सगळयांनी पाटी जमीनीवर उलटी ठेऊन उभं रहायच - मास्तर सांगतील ते गणित तोंडी सोडवायच - बसा म्हटल की पटकन पाटीवर उत्तर लिहून पुन्हा लगेच उभं रहायच. जो उभ रहाण्याला उशीर करेल त्याला ओरडा. अशी वीस उत्तंर मी लिहिली. परीक्षा किंवा पाटीवर अनुक्रमपूर्वक उत्तर लिहिण्याची शिस्त हे सर्व मला नवीन होत. माझा अनुक्रम चुकला आणि, पन्नास पैकी फक्त सदतीस मार्क पाहून मला रडू कोसळलं. घरी कधीही माझं उत्तर चुकलेलं नव्हत आणि इथे ही नामुष्की ! तेवढयांत मास्तरांनी जाहीर केल - आजच्या परीक्षेत सर्वात जास्त मार्क आहेत सदतीस - कोणाचे मार्क आहेत, त्याने पुढे यावं! मी रडतच पुढे गेले. मास्तर म्हणाले - रडतेस कांय ? सर्वात जास्त बरोबर तुझीच उत्तरं आहेत.


मी म्हटले हो, पण माझी सगळी गणितं बरोबर आहेत, मला 50 पैकी 50 मार्क मिळायला हवेत. मास्तरांनी माझी पाटी पुन्हा तपासली आणि त्यांच्या लक्षात आलं की खरोखरीच माझी सर्व उत्तर बरोबर होती पण अशा परीक्षेची सवय नसल्याने त्यांचे अनुक्रम उलट सुलट लिहिले गेल्याने ती उत्तरे चूक वाटत होती. मास्तरांनी मला हा तपशील सांगितला व पुन्हा अशी चूक करू नकोस, आज तुझी मार्क एवढेच राहतील, पण हुशार आहेस असं बोलून दाखवल. घरी आल्यावर नानांनी हे ऐकल आणि तेंव्हापासून तोंडी गणिताऐवजी मोठी आणि पाटीवर सोडवायची गणित करून घेऊ लागले - हेतू हा की लेखी परीक्षांमधे मी मागे राहू नये.


त्या पहिल्याच दिवशी शाळा संपताना मराठीच्या बाईंनी एक शुद्धलेखनाची वही हातात दिली. तिच्या पहिल्या पानावर पहिल्या ओळीत एक वाक्य लिहिलं होतं - तेच वाक्य सबंध पानभर लिहून आणायला सांगितलं. त्याकाळी लिहायला पेन नसे. शाईची दौत आणि एका बोरुला अडकवलेली नीब मिळत असे. शाईच्या दौतीत नीब बुडवून अक्षरे लिहायची आणि नीबची शाई कोरडी झाली की पुन्हा दौतीत बुडवून लिहायचे. मला हे सगळंच नवीन होतं. त्यामुळे वहीवर शाईचे भरपूर डाग, लेखन शुद्ध पण अक्षर गचाळ असे ते वाक्य आमच्या चांगलंच स्मरणात आहे. गाडी फलट्यावर येऊन थांबली हे ते वाक्य. फलाट म्हणजे प्लॅटफॉर्म हा मराठी अनुवाद मला त्यादिवशी कळला. आमच्या घराच्या मागे अगदी जवळ मदनमहाल रेल्वे स्टेशन होते. तिकडे बोट दाखवून फलाट-फलाट म्हणत आणि फलाट शब्दावर उड्या मारत आम्ही चारी भावंडं भरपूर हसलो होतो.


अक्षर चांगल दिसाव यासाठी एक युक्ति आहे - अस म्हणू­न बाईं­नी पहिल्या दिवशीच एक युक्ती सांगितली होती - अक्षरांच्या सर्व उभ्या रेघा काटेकोर उभ्या आणि आडव्या रेघा अगदी काटेकोर आडव्या काढायच्या - मग अक्षर आपोआप छान दिसतं. पण ही युक्ति शिकायला ­तशी सोपी ­नाही. काटेकोर उभ्या आणि आडव्या रेघा काढता येण्यासाठी हाताला ते वळण ­नीट बसवावं लागतं.


पुढे इतर ब-याच व्यक्तींची हस्ताक्षरं बघून कळल की ज्या व्यक्ती तिरक्या रेघा काढ­तात, त्यापैकी कांहींचं अक्षर छा­न दिसत, कारण त्यांच्या रेघा तिरक्या असल्या ­तरीही आपापसांत समांतर असतात. पण ज्यांच्या रेघा समांतर रहात नाहीत, त्यांच अक्षर चांगलं दिसत ­नाही. पण बाईं­नी युक्ती सांगितल्यामुळे त्यातलं शास्त्र कळलं, एक वेगळी सौंदर्यबुद्घी आली आणी तेंव्हापासू­न चांगल्या हस्ताक्षराचं मला फार आकर्षण आहे.


त्याच बाईंनी आम्हाला पुस्तक कसं धरावं, कसं वाचावं, हे ही शिकवलं. मोठ्याने इतरां­ना वाचून दाखवायचे असेल तर वाक्य रचनेप्रमाणे कुठे किती थांबायचं, वाचता वाचता अनावश्यक भाग गाळत कस वाचायचं, पुस्तक बाजूला ठेऊन एखदी गोष्ट सांगायची असेल ­तेंव्हा त्या योष्टी­तील किंवा धडयातील खास खास उल्लेखनीय जागा कशा ­न विसरता उद्घृत करायच्या वगैरे. पुढे कॉलेजात एका शिक्षकां­नी रॅपिड रीडीग कस करायच, त्यासाठी पुस्तक आडव डावीकडून उजवीकडे अस ­न वाचता वरू­न खाली, आणि तरीही प्रत्येक रेघेतील महत्वाचे मुद्दे डोळ्यांनी टिपत वाचन कसं करतात ते शिकवल. या अशा बऱ्याच कौशल्याच्या बाबी आहेत - त्यांना मी युक्तीच म्हणते - त्या हल्ली शाळा कॉलेजात फारशा शिकवल्या जात ­नाहीत.


आजोबांनी मला गणिताची एक युक्ती शिकवली होती. साधारण पणे पाच-सात आकडयांची बेरीज करता­ना आपण आधी ­ते आकडे एकाखाली एक आणि एकम् खाली एकम् असे ­नीट रचून घेतो. पण ­आजोबांनी मला आडवे लिहिलेले आंकडे असले तरीही त्यांची ­न चुकता बेरीज करणयाची सवय लावली होती. शिवाय एकाच वेळी कांही आकडे बेरजेचे व काही वजा घालवायचे असतील ­तरी तेही तिथल्या तिथेच करायला शिकवले.


आई­ने पाढे शिकवातां­ना युक्ती केली होती. नेहमीच्या पद्धती­ने पाढे पाठ करू­न घेतले होतेच. पण छोटया छोटया कामांच्या वेळी विचारायची - तिना आठे? पाच साते? ­सहा चोक? धरणगांवी विहिरीवर धुणी धुतां­ना तिने माझे पाढे असे पक्के करू­न घेतले होते..


मी पण मुलांसाठी ही युक्ती वापरली. आमच्या घरा­त भिंतीवर 9 खणांचे चौको­न चिकटवू­न ठेवले आहेत. प्रत्येक खणात 3x8, 5x7, 6x2 असे मांडून ठेवलेत. दोन ­ते दहाच्या पाढ्यांसाठी सात चौको­न आणि अकरा ­ते वीस साठी आठ चौको­. मुलां­नी रोज दो­न्ही गटातील एका-एका चौको­नातील उत्तरे धडाधड सांगून दाखवली पाहिजेत.


जबलपुरच्या शाळेत लवकरच माझी गणना हुशार विद्यार्थिनी म्हणून होऊ लागली. शाळेचे मुख्याध्यापक दाणी सर, त्यांनी एक चांगली पद्धत शाळेत वापरली होती. त्याकाळी शिक्षकांची वानवा असे. पहिली व दुसरीच्या वर्गाना शिकवण्यासाठी दाणी सर चौथी व पाचवीचे हुशार विद्यार्थी पाठवत असत. दुपारची शाळा सहावी ते अकरावी या वर्गांसाठी होती. तिथे दाणी सर दहावी अकरावीच्या मुलांना सहावी व सातवीच्या वर्गांवर शिकवण्यासाठी पाठवत. अशावेळी थोडा वेळ का होईना, त्या त्या वर्गात स्वतः मागे बसत. नंतर कधीतरी बोलावून आमच्या शिकवण्यात काय सुधारणा हवी, कुठे छान केले ते सांगत असत.

मला नेहमीच सांगायला अभिमान वाटतो की अगदी चौथी इयत्तेत असल्यापासून मी शिक्षक म्हणून काम केलेले आहे. असे कितीतरी शिक्षक दाणी सरांनी घडवले आहेत. त्यांच्या या फॉर्मूल्याची मी भक्त आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेला या पद्धतीचा खूप उपयोग होऊ शकतो.


------------------------------------00000000000000000000000000----------------------------------------





























No comments:

Post a Comment