मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Sunday, June 2, 2024

4 माझी भाषात्मक जडण घडण - लेखमाला मिळून साऱ्याजणी

 

लेखमालेतील लेख क्र 4


लीना मेहेंदळे 9869039054

leena.mehendale@gmail.com

(सुमारे 1300 शब्द)

माझी भाषात्मक जडण घडण


माझा जन्म धरणगाव या एका सी क्लास मुन्सिपलिटी असलेल्या गावात झाला, म्हणजे म्हटलं तर अगदी ग्रामीण भागही नाही, पण म्हटलं तर पुणे-मुंबई-जळगाव इतकं मोठं शहरही नाही. तिथे एक चांगली बाजारपेठ होती. विणकर समाजाचं मोठ्या संख्येने वास्तव्य असल्यामुळे लुगडी सतरंज्या इत्यादी हाताने विणलेल्या पण सौंदर्यपूर्ण कापडांचे उत्पादन तिथे होत असे. आजूबाजूच्या बऱ्याच खेडेगावातून तिथे विक्रीसाठी शेतकरी आपापला शेतमाल घेऊन येत असत. इथे आठवडा बाजार होताच शिवाय दररोजच्या बाजारासाठी सुद्धा एक विशिष्ट जागा मुक्रर केली होती. तिथे अगदी सिमेंटचे चौकोन, दुकानांचे व्यवस्थित गाळे म्हणजे एक आखीव रेखीव मार्केट यार्ड असल्यासारखच इत्यादी रचना होती.

आमच घरातील भाषा मराठी असली तरी खेडोपाडची जी मंडळी गावात किंवा घरी येत असत त्यांची संपर्क भाषा अहिराणी कानावर पडून शिकली गेली. आजोबांची लाकडाची वखार होती त्या व्यापारा निमित्त त्यांना भारतात बरेच लांब लांब फिरावे लागत असे. त्यांना हिंदी गुजराती उत्तम प्रकारे बोलता येत अस. त्यांच्यामुळे वडिलांना देखील या भाषांची गोडी लागलेली होती. वडिलांचे शिक्षण नाशिक पुणे मुंबई असे झालेले होते. विषय होते, संस्कृत मराठी व तत्वज्ञान. त्यामुळे संस्कृत सोबतच त्यांना मराठी व इंग्लिश देखील उत्तम अवगत होत्या.

मी सात वर्षाची असताना वडिलांना जबलपूर येथील हितकारिणी कॉलेजमध्ये संस्कृत प्रोफेसरची नोकरी मिळाली व आम्ही मध्य प्रदेशात आलो. जबलपूर मध्ये मराठी व हिंदी भाषिक लोकसंख्या जवळ जवळ 50 -50 टक्के अशा होत्या. तिथे माझी शाळा मराठीच होती पण आजूबाजूच्या वातावरणांत हिंदी सहजपणे येऊ लागली. माझ्या वयाच्या नवव्या वर्षी वडिलांना मिथिला संस्कृत रिसर्च इन्स्टिट्यूट दरभंगा या उत्तर बिहार मधील व नेपाळच्या बॉर्डरवर असलेल्या मोठ्या शहरात सरकारी नोकरी मिळाली व आम्ही तिकडे रवाना झालो. इथे जनभाषा हिंदी व मैथिली. शाळे मोठ्या प्रमाणावर बंगाली मुली देखील होत्या. त्यामुळे आम्हाला हिंदी सोबत मैथिली व बंगाली भाषा देखील शिकायला मिळाली. शाळेच्या पुस्तकांमध्ये मैथिल कवी विद्यापती, बंगाली कवी रवींद्रनाथ, अवधी भाषेचे कवी तुलसीदास, व्रजभाषेचे कवि सूरदास अशांच्या कविता असल्यामुळे आईने कविता पाठ करायची सवय लावल्यामुळे त्या भाषा देखील व्यवस्थित समजू लागल्या.

कधीतरी आमच्या घरी पहिला ट्रान्झिस्टर विकत घेतला गेला तेव्हा आईला नेपाळी बातम्या ऐकायची गोडी लागली आणि आमच्या कानावर नेपाळी देखील पडू लागली. वडिलांच्या इन्स्टिट्यूट मधील बरेच प्रोफेसर आपापसात बोलताना सहजगत्या अस्खलितपणे संस्कृत भाषेचा वापर करीत असत त्यामुळे बोलचालीची संस्कृत देखील कानावर पडत राहिल. अशा प्रकारे माझ्या भाषाज्ञानाचा विस्तार होत गेला


आम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दरभंगा ते धरणगाव असा सुमारे दोन हजार किलोमीटर पेक्षा अधिक अंतराचा रेल्वेने प्रवास करून सुट्टीसाठी धरणगाव येथे येत असू. त्यावेळ चुलत भावंडांची शाळेची पुस्तके वाचून काढणे हा आवडता छंद असल्यामुळे किती एक मराठी कविता देखील तोंडपाठ असत. आणखी महत्वाची बाब अशी की रेल्वे प्रवासात बिहार मधील मोकामा हे जंक्शन सोडल्यानंतर पुढे उत्तर प्रदेश मधील प्रयाग, मुगलसराय अशी मोठी स्टेशन घेत, पुढे जबलपूर इटारसी अशी मध्य प्रदेशातील स्टेशने नंतर भुसावळ जळगाव धरणगाव अस महाराष्ट्रातील प्रवास होत असे. या सर्व मोठ्या स्टेशन्सवर जी भाषा ऐकायला मिळत असे ती मूळ हिंदीरूपीच असली तरी एकमेकींपेक्षा थोडी तरी वेगळी असायची. हळूहळू मला बोलणाऱ्याच्या भाषेवरून तो तो जिल्हा किंवा प्रांत कोणता असेल हे ओळखायची सवय लागली. अगदी नेपाळीतही काठमांडूची नेपाळी व पोखरा या पश्चिमी जिल्ह्याची वेगळी नेपाळी मला कानांना जाणवते. अशा पंचक्रोशीवार बदलत्या रूपांचा उत्तम वापर करणारे गोनीदा हे मराठीतील माझे आदर्श आहेत. असो.

आता सीन बदलून मसूरीच्या लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये येऊ या. मी आयएएसच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशिक्षणासाठी इथे आले. माझी 1974 ची बॅच. जुलैपासून सुरुवातीचे चार महिने यूपीएससी पास झालेल्या सर्व प्रकारच्या सर्विसेस मधील सर्व म्हणजे सुमारे 1200 मुलं एकत्रपणे मसुरीला ट्रेनिंग साठी बोलवली जात असत. दिवाळी सुट्टीनंतर त्यांना त्यांच्या त्यांच्या सर्विस प्रमाणे त्यांच्या स्पेशलिस्ट अकॅडमी मध्ये पाठवले जात असे. उदाहरणार्थ पोलीस सर्विस साठी हैदराबादला, इन्कम टॅक्स साठी नागपूरला, फॉरेन सर्व्हिस साठी दिल्लीला, फॉरेस्टसाठी देहरादूनला. वगैरे. पुढील सहा महिने शिल्लक राहात फक्त आयएएस प्रशिक्षणार्थी.

अकादमीचे डायरेक्टर श्री राजेश्वर प्रसाद अतिशय कर्मठ होते. एकेकाळी त्यांनी लालबहादूर शास्त्रीचे सोबत काम केलेले होते, व त्या आठवणी नेहमी सांगत. सर्व प्रशिक्षणार्थी मंडळींना भारत, इथले उत्सव परंपरा यांची नेमकी जाणीव व्हावी, हा देखील ट्रेनिंगचा एक भाग होता. डायरेक्टर स्वतः या गोष्टीकडे जास्ती उत्साहाने लक्ष देत. मसूरीला पोचल्यानंतर लगेचच येणार मोठा उत्सव म्हणजे 15 ऑगस्ट. या दिवशीच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक राज्यातील मंडळींनी त्यांच्या त्यांच्या भाषेतील राष्ट्रगीत म्हणाव अस ठरल आणि प्रत्येकाला कोणत्या तरी एका भाषेसाठी आपले नाव नोंदवा असे सांगण्यात आले.

मी माझ्या शिक्षकांना सांगितले मला मराठी हिंदी बंगाली तीनही भाषा उत्तम येतात आणि मला सगळीकडे गायचे संधी मिळाली पाहिजे. ते म्हणाले नाही, एक भाषा निवड आणि मी तर म्हणेन की मराठी भाषा येणारी मुल नाहीतच त्यामुळे तू मराठी गटातच सामील हो, तयारीपण तूच करून घे. आम्ही श्री सावरकरांचे जयोस्तुते श्रीममंगले हे गाणे निवडले, पण इतर आवडती हिंदी व बंगाली राष्ट्रगीते म्हणण्याची संधि उगीचच बुडाली असे वाटत राहिले.

त्यानंतर एकदा ट्रेनिंगचा भाग म्हणून एक मॉक जनगणना घेण्यास सांगण्यात आले. त्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या भाषेचे नाव नोंदवायचे होते व त्यासाठी एकच बॉक्स होता. मला हे पुन्हा खटवलं. एखाद्या भाषेतील मुलं जास्त असतील किंवा कमी असतील त्यावरून काही बरावाईट निष्कर्ष काढ नये हे खरं. परंतु मला मात्र कुठेतरी त्या संख्याशक्तीची जाणीव झाली असं म्हणता येईल. आणि मला असं प्रश्न पडला की मला जर उत्तम मराठीसोबत बंगाली व हिंदी याही भाषा येतात तर तिन्ही भाषांचे संख्याबळ दाखवण्यासाठी माझ्या या ज्ञानाचा फायदा का नाही करून द्यायचा? यासाठी त्या त्या भाषेतील विद्यार्थ्यांची गणना होत असताना हे गणित वेगळ्या प्रकारे मांडायला हवं. तुमची भाषा कोणती याचं उत्तर मिळवताना तुम्हाला एकच भाषा येते व तुम्ही फक्त तिचाच उल्लेख करणार असं गृहीत धरलेलं होतं. त्याऐवजी तुम्हाला किती भाषा येतात आणि त्या कोणत्या असा प्रश्न विचारला असता तर माझ्या भाषाज्ञानाचा उपयोग जसा मराठी भाषेचे संख्याबळ वाढवण्यासाठी होतो तसंच हिंदी बंगालीसाठीही झाला असता अशी कल्पना मनात येऊन गेली. आपल्याकडील खऱ्या जनगणनेतही अजून असा प्रश्न विचारला जात नाही. फक्त आता तुम्ही 3 भाषा नोंदवू शकता ज्यामधे दुसऱ्या क्रमांकावर इंग्रजीची आणि तिसरीवर झालीच तर हिंदीची नोंद होते. मग कधीतरी मी विकिपीडिया सारख्या प्लॅटफॉर्मवर डोकावते. त्यामधे जगातील तीन मोठ्या लोकसंख्येच्या भाषा दिल्या असतात. इंग्लिश बोलणाऱ्यांची संख्या 150 कोटी, चिनी-मंडारिन भाषेची लोकसंख्या 110 कोटी आणि हिंदी भाषेची लोकसंख्या फक्त 60 कोटी दाखवली जाते. तेव्हा आपण भारतीय म्हणून या स्टॅटिस्टिक्सचे पितळ उघड करू शकत नाही याची खंत जाणवते. कारण इंग्लिश बोलणाऱ्या 150 कोटी मधे भारत-पाक-बांङ्गलादेश मिळून 55 कोटी, ज्यांची घोषित राष्ट्रभाषा इंग्लिश आहे असे 4 देश मिळून 55 कोटी आणि जगातील इतर सर्व देश मिळून 40 कोटी अशी फोड आहे. याउलट भारताच्या एकूण 150 कोटीपैकी ज्यांची मातृभाषा मराठी मल्याळी बंगाली कानडी इ इ आहे ती सगळी मंडळी बाजूला झाल्यानंतर जी उर्वरित जनता, तिची भाषा हिंदी असा हिशोब केला जातो आणि दुसऱ्या भाषेसाठी इंग्रजी हे उत्तर असल्याने त्याचा वैश्विक लाभ इंग्रजी भाषेला मिळतो. थोडक्यात ज्यांना इतर भारतीय भाषा येतात त्यांना हिंदी येत नाही असे स्टॅटिस्टिक्स आपल्याकडे ऑफिशियली गोळा केले जाते. त्यांना हिंदी येत असली तरी वैश्विक स्तरावर भाषेचा मोठेपणा नोंदवताना त्याची दखल घेतली जाणार नाही असे जे पाश्चिमात्य निकष आहेत ते तसेच स्वीकारल्यामुळे, निव्वळ हिंदीच नाही तरी सर्वच भारतीय भाषांचे नुकसान होते. याच कारणाने संस्कृतची तर दखलच घेतली जात नाही आणि सिब्बल सारखे एकेकाळचे शिक्षणमंत्री त्यांच्या काळात संस्कृतला मृत भाषा म्हणून घोषित करून मोकळे होतात. ज्या भाषेची वर्णमाला, लिपी व व्याकरण इतर भारतीय भाषांना मार्गदर्शन करते तिला मृत भाषा का होऊ द्यायची. इथे मी क ला काना का, क ला एक मात्रा के या पद्धतीच्या अर्थाने लिपी शब्द वापरला आहे, बाकी देवनागरीची कॅलिग्राफी बंगाली किंवा कन्नडपेक्षा वेगळी आहे एवढाच त्या लिप्यांमधील फरक आहे.

जगाच्या पाठीवर हिंदी बोलणारे, किमान हिंदी समजून संवाद करू शकणारे माझ्या मते शंभर कोटीच्या वर तरी आहे. सर्वसामान्य मराठी गुजराती राजस्थानी मारवाडी या मंडळींना हिंदीतील व्यवहार फारसे कष्ट न घेता करता येण्याइतपत हिंदी नक्कीच येते. इतर भाषिकांमधेही अशी मोठी लोकसंख्या आहे. तरी देखील वैश्विक पातळीवर जो एडवांटेज इंग्लिश किंवा मंडारीन या भाषांना मिळतो तो तितक्या प्रमाणात हिंदीला मिळत नाही व त्यासाठी भारतीय म्हणून आपण आग्रही राहत नाही याची मला खंत वाटते. म्हणूनच जनगणना करताना तुमची मातृभाषा कोणती असा प्रश्न विचारण्याऐवजी तुम्हाला येणाऱ्या भारतीय भाषा कोणकोणत्या असे विचारले, त्यातील प्रिण्याची पातळी 80 टक्केपेक्षा अधिक, 40 ते 80 टक्के आणि 40% खालील अशी वर्गवारी करून जर भारतीय जनगणना केली तर त्याचा मोठा लाभ सर्वच भाषांना मिळेल. त्या शिकण्याकडे लोकांचा कल वाढेल व भारतीय भाषांची एकात्मता त्यातून पुन्हा एकदा झळाळेल. ते झाले तरच भारतीय भाषा टिकतील व वाढतील आणि न झाले तर भाषाज्ञानापाठोपाठ संस्कृतीचा लोपही झपाट्याने होईल. आपण त्या दृष्टीने प्रयत्नशील असावे, भारतीय भाषांमधील शाळा टिकवाव्या, संगणक व आर्टिफिशियल इंटेलिजन्समधे भारतीय भाषांना योग्य स्थान मिळवून द्यावे असा मोठा कर्तव्यपथ आपल्यासमोर वाट पहात आहे.

-----------------------------------0000000000000000------------------------

No comments:

Post a Comment