लेखमालेतील लेख क्र 3
प्रशासनातील आरंभिक धडे
लीना मेहेंदळे 9869039054
मी भाप्रसे (भारतीय प्रशासन सेवा) मधे आले आणि प्रशिक्षणासाठी संभाजीनगर (तेंव्हाचा औरंगाबाद) जिल्हा अलॉट झाला. तिथले आमचे कमिशनर श्री कपूर हे खूपच अनुभवी आणि एकूण फादर फिगर असेच होते. पहिल्या दिवशी त्यांच्या सोबत फक्त नमस्कार इत्यादीच झाले. त्यानंतर आठवड्याभरातच त्यांनी मला बोलावून घेतले आणि माझी पूर्ण माहिती घेतली. घरी कोण आहेत, परिवार कसा आहे, आई वडील कसे आहेत, सासरे कसे आहेत, पती कसे-कुठे आहेत इत्यादी. माझी माहिती ऐकून ते थोडे विचारात पडले. मला विचारले की तू इथे महाराष्ट्रात आणि तुझे पती कलकत्त्याला हे कसं चालणार मी म्हटलं की सर त्यांच्या फिलिप्स कंपनीने त्यांना पुण्यात ट्रान्सफर देऊ असं ठरवलेलं आहे आणि एका महिन्यात त्यांची पुण्याला बदली देखील होईल. यावर ते अजून विचारात पडले आणि मला म्हणाले की हे पहा, तुमचे प्रोबेशन औरंगाबाद डिव्हिजन मध्ये होत आहे तर सध्याचे नियमाप्रमाणे असिस्टंट कलेक्टरची दोन वर्षे देखील तुमचे पोस्टिंग औरंगाबाद डिव्हिजन मध्ये होणार. अशावेळी पती पुण्यात असताना तुमचे वैवाहिक जीवन नीट पद्धतीने आरंभ होऊ शकणार नाही. तुम्ही असं करा की प्रोबेशन काळीच तुमची ट्रान्सफर पुणे डिव्हिजन मध्ये व्हावी असा एक अर्ज लिहून द्या. पुढल्या आठवड्यातच मुख्य सचिव इथे येणार आहेत. त्यांना अर्ज द्या व विनंती करा. पुणे डिव्हिजन मध्ये ट्रान्सफर झाली तर निदान पुढील तीन वर्ष तुम्हाला तुमच्या पतीसोबत एकत्र राहता येईल. पुढे जेंव्हा पुढची ट्रान्सफर होईल तेंव्हाच तेंव्हा बघितले जाईल.
असा सल्ला अनुभवातून आणि आपल्या अधिकाऱ्यांसाठी विचार करण्यातूनच येतो. ते म्हणाले तसे पुढल्या आठवड्यात मुख्य सचिव श्री साठे औरंगाबादला आले. मी त्यांना भेटले आणि ही सर्व बाब त्यांच्या कानावर घातली. माझ्या बाजूने अजून एक गोष्ट सांगितली की सध्या पुणे जिल्ह्यात श्रीमती सुषमा शर्मा या प्रोबेशनवर आहेत. मध्यप्रदेश काडरमधील सुधीर नाथ यांच्याशी त्यांचा विवाह ठरलेला आहे. त्यानंतर, म्हणजे येत्या 3-4 महिन्यातच त्या बदली घेऊन मध्यप्रदेश काडरला जातील. त्यामुळे येत्या तीन-चार महिन्यासाठी त्यांचे प्रशिक्षण पुण्यामध्ये आहे किंवा औरंगाबाद मध्ये याने त्यांना काही फरक पडत नाही. मला मात्र आज पुण्याला बदली मिळाली तर पुढील तीन वर्ष मला त्याचा पुष्कळ लाभ होणार आहे. श्री साठे म्हणाले की हा तर्क मला पसंत आहे. अन्यथा सुषमाची असुविधा करून तुमच्या सुविधेचा विचार करणे हे मला पसंत पडले नसते. पण आता हरकत नाही, तुम्ही पुण्याला जायची तयारी करा. लवकरच ऑर्डर येतील.
अशा प्रकारे दोन महिन्यातच मी औरंगाबादहून बदली घेऊन पुणे जिल्ह्यात माझ्या प्रशिक्षणासाठी आले देखील. सुषमा देखील मोठ्या मनाची आहे. या घटनेबद्दल कधीही कुठल्याही प्रसंगी तिने खळखळ किंवा तक्रार केली नाही. तिने सुद्धा हे अगदी स्पोर्टिंगली घेतलं.
माझ्यासाठी पुणे अगदीच नवीन शहर होते. माझा जन्म जरी धरणगाव जिल्हा जळगाव इथला असला तरी माझं प्राथमिक शिक्षण जबलपूर येथे व त्यापुढील सर्व शिक्षण बिहार मध्ये दरभंगा येथे बीएससी पर्यंत आणि पुढे एमएससी साठी पटना असे झालेले होते. आम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत धरणगाव येथे येत असू. त्यावेळी नातेवाईकांना भेटणे, महाराष्ट्रात थोडीफार भटकंती इत्यादि करत असताना आमचा प्रवास जास्तीत जास्त खानदेश किंवा मुंबई किंवा आईचे माहेर असलेले कोकणातील देवरुख गाव अशा ठिकाणी सीमित होता. आईची बहुतेक सगळी भावंड मुंबईत होती. त्यामुळे आमच्या सुट्टीतील काही भाग मुंबईत घालवला जात असे. पुणे मात्र मला नितांत अपरिचित होते. पुन्हा औरंगाबादच्या तुलनेने हे बरंच मोठं शहर आणि इथे बहुतेक रोजच मंत्र्यांच्या फेऱ्या चालू असायच्या. त्यामुळे प्रोबेशनरी असिस्टंट कलेक्टर सारख्या एका ज्युनिअरकडे लक्ष देणे हे जसं औरंगाबादला सहजपणे घडत होतं तसं पुणे येथे घडत नव्हतं. सुमारे महिन्यानंतर मला सरकारी घर अलॉट झाले व लौकरच प्रकाशरावांना पुणे येथे बदली मिळून श्री कपूर यांनी सांगितल्याप्रमाणे एकूण सर्व रुटीन सुरळित सुरू झाली.
पुण्याला श्री सुब्रमण्यम हे कलेक्टर होते व जसा दोन कुणाही दोन व्यक्तींच्या स्वभावात फरक असेल त्याचप्रमाणे त्यांचा स्वभावही श्री भागवतांच्या स्वभावापेक्षा भिन्न असा होता. पण ते अत्यंत अभ्यासू आणि कर्मठ असे कलेक्टर होते. ओशो हे त्यांचे आवडते फ्रेंड फिलॉसफर गाईड असं म्हणूया. त्यांच्याबरोबर टूरला जाताना ते बहुतेक वेळी ओशोंच्या कॅसेट ऐकत असत. मला वैयक्तिक रित्या ओशो फारसे आवडत नसले तरी त्यांचे विचार मात्र श्री सुब्रमण्यम यांच्यामुळे मला परिचयाचे झाले.
श्री सुब्रमण्यम यांची कामाची स्टाईल कशी होती त्याची एक झलक - एक दिवस त्यांच्या कार्यालयात ते टपाल बघत होते आणि मीही तिथेच बसून होते. त्यांनी एक कागद माझ्याकडे दिला आणि म्हणाले हा अर्ज वाचून ठेव. पाच मिनिटांनी मला विचारले - या अर्जातील लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट कोणती? मी म्हटले या अर्जदाराची जमीन सरकारने अधिग्रहण केलेली आहे आणि त्याला जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नाही असे त्याला वाटते, सबब कलेक्टरांनी त्याला मिळालेल्या मोबदल्याबाबत पुनर्विचार करावा अशा अर्थाचा याचा अर्ज आहे. ते हसले आणि म्हणाले नो, नो. ह्या अर्जात काय लक्षात ठेवायचं तर त्या माणसाचं नाव आणि गाव. मी अचंबित व थोडी निराशही झाले कारण मला व्यक्तींची नावे, चेहरे तसेच रस्ते या बाबी अजिबात लक्षात रहात नाहीत. त्यांनी पुढे सांगितले - आपण जेव्हा टूरसाठी एखाद्या गावी जात असतो त्यावेळी गावकऱ्यांना आपण सांगू शकतो की हा तुमच्या गावातील अमुक अमुक चार जणांचे अर्ज माझ्याकडे प्राप्त झालेले आहे त्यामुळे त्यांचे नाव गाव लक्षात ठेवणे याला जास्ती महत्त्व असते. या सल्ल्याची प्रचीतीही मी घेतली. त्यांच्याबरोबर टूरला असताना मी खूपदा असे बघितले की गावी पोचल्यावर ते म्हणत – हां, तुमच्या गावातून अमुक अमुक चार व्यक्तींचे अर्ज प्राप्त झाले आहेत, आणि गावकरी एकदम खुश की साहेबांनी आपल्याला नावानिशी लक्षात ठेवलेले आहे. खरेतर ती चार नावे त्यांच्या पीएने एका कागदावर लिहून दिलेली असत. पण ही एक उत्तम कार्यपद्धती होती यांत शंका नाही.
मी माझी वेगळी स्टाईल निर्माण केली. मी गावी गेले असता माझ्यासमोर एखादा अर्जदार आला आणि म्हणाला की माझी जमीन सरकारने अधिग्रहण केलेली आहे व त्याचा योग्य मोबदला मिळालेला नाही, की मला लगेच आठवायचे की यांचा अर्ज आला होता, त्याची छाननी केली होती व जी जमीन अधिग्रहण केलेली आहे तेथील आजूबाजूच्या जमिनींना इतका-इतका मोबदला मिळालेला आहे इत्यादी. किंवा, तुमच्या शेताच्या बांधावर दोन कडुलिंबाची झाडे होती त्यापैकी एक तुमच्या शेजाऱ्यांनी तोडले अशी तुमची तक्रार होती. मग लोकांना पटायचं की या अधिकाऱ्याला आपले नाव लक्षात नसले तरी आपले काम मात्र लक्षात आहे. त्यामुळे ते समाधानी होत व मलाही बरं वाटत असे. माझ्या या सवयीचा मी असा फायदा करून घेतला की माझ्याकडे आलेेल्या तक्रारीेंचे सॉर्टिंग माझ्या मनात आपोआप होत असे. बांधावरचे झाड शेजाऱ्यांनी तोडले अशी एखाद्याची तक्रार आली की मी माझ्या क्लार्कला सांगत असे की पहा आपल्याकडे आतापर्यंत अशाच प्रकारच्या अमुक इतक्या तक्रारी आहेत, त्या सगळ्या एकत्र आणा, आणि त्या सर्वांवर आपण एकत्र एकाच पद्धतीने निकाल देऊ. याला मी एकगठ्ठा पद्धत म्हणत असे आणि पुढे वेळोवेळी मी ही पद्धत वापरली. खूप नंतर सेटलमेंट कमिशनर असताना निवृत्तिनंतर पेन्शन रखडलेल्या केसेस आणि सस्पेंड झालेल्या कर्मचाऱ्यांना अधिकृत भत्ता वेळेवर मिळणे इत्यादि प्रकारे एकगठ्ठा पद्धतीने कार्यालयीन कामे सुकर करण्याचे बरेच प्रयोग केले. त्याबद्दल वेगळे लिहावे लागेल. आता संगणकांमुळे ही पद्धत अधिकच प्रभावी होऊ शकते.
त्याकाळी हवेली सब-डिव्हिजन-ऑफिसचे कार्यालय हे पुणे कलेक्टर ऑफिसच्या आवारातच होते. तिथे खानोलकर नावाचे एक अतिशय शिस्तप्रिय व सचोटीचे डेप्युटी कलेक्टर श्रेणीचे अधिकारी होते. कलेक्टरांनी त्यांना सांगून टाकले की आपल्या प्रोबेशनर्सना चांगल्या रीतीने प्रशिक्षण देण्याची जबाबदारी तुमची. मी दररोज ऑफिसला आल्यानंतर कलेक्टरकडे पाच मिनिटे हजेरी लाऊन त्यांनी काही महत्वाचे आहे थांबा असे सांगितले तरच त्यांच्याकडे बसत असे. अन्यथा सबडिविजन ऑफिसमध्ये जाऊन बसत असे. खानोलकर सिस्टम एक्सपर्ट होते असे म्हणता येईल. जमीन संबंधी कामे, विशेषतः जमीनीचे कायदे कानून, केसेसचे हिअरिंग, ऑफिसची इतर प्रशासकीय कामे, गांव-भेटी, रेशन दुकान तपासणी, तलाठ्याचे दप्तर तपासणी, तालुक्यातील सब-ट्रेझरीची तपासणी आदि सर्व कामे त्यांच्याकडून शिकली. त्या ऑफिसमधे चहापणाच्या वेळेला इतरही डेप्युटी कलेक्टर श्रेणीचे अधिकारी येत असत आणि मग बऱ्याच गप्पा विशेष करून महसुली कामे कशी होतात ही चर्चा होत असे. त्यातून माझे खरे प्रशिक्षण झाले. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे व्हिलेज ऑडिट. आताच्या अधिकाऱ्यांना कदाचित हे माहीतही नसेल की पूर्वी संपूर्ण गावाचे सर्व रेकॉर्ड हे वेगवेगळ्या 22 रजिस्टर मध्ये लिहून ठेवले असायचे व त्या रजिस्टरांचा हिशोब अगदी पक्का व एकमेकांना पूरक तसेच एकमेकांची पडताळणी करून देणारा असायचा. एखाद्या गावी जाऊन तेथील सर्व 22 रजिस्टरांची एकमेकांच्या सहाय्याने पडताळणी करण्याला ए ऑडिट व काही रजिस्टरांची वरवर तपासणी करण्याला बी ऑडिट म्हणत. विभिन्न महसुली अधिकाऱ्यांनी दरमहा किती गावांचे ए व किती बी ऑडिट केले पाहिजे त्याचे उद्दिष्ट ठरले असे. माझे बालपण ग्रामीण भागातील असल्याने या सर्व गांवकीच्या कामांत माझे प्राविण्य होते. याच विषयावरील परीक्षेत माझ्या बॅचमधे मला सर्वाधिक मार्क पडले होते.
आता महाराष्ट्रांत सर्व गावांचे रेकॉर्ड डिजिटाइझ झाले असून अशा प्रकारच्या ऑडिट्सची फारशी गरज उरलेली नाही. पण अधिकाऱ्यांची तज्ज्ञता हरवल्यामुळे सातबारा, फेरफार नोंदी व रजिस्ट्रेशनचे उतारे इत्यादि समजून जमिनीबाबतचे तंटे सोडवण्याकडे वरिष्ठ महसुली अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे डिजिटायझेशनचा एक मोठा लाभ सामान्य गावकऱ्याला मिळत नाही. डिजिटायझेशन मधे आरंभिक काळातील अडचणी, आताची व्याप्ति व त्याचे फायदे आणि अजूनही शिल्लक राहिलेले कच्चे दुवे यावर एक स्वतंत्र लेख लिहिला जाऊ शकतो. तरी देखील एक बाब नोंदवायला हवी. गांवठाणातील घरांचे सर्वे, त्यांचे नकाशे, मोजमाप, हक्कपत्र, व्हॅल्यूएशन अशा सर्वंकष बाबींचे डिजिटायझेशन करण्याचे काम गेल्या 8-10 वर्षांपूर्वी सर्वप्रथम महाराष्ट्राने हाती घेऊन देशापुढे वाट मोकळी करून दिली. यामुळे गावकऱ्यांच्या ग्रामीण घरावरही बँक कर्ज मिळण्याची सोय झाली. हे काम करण्याचे मोठे श्रेय पुण्याचे या कामावेळचे डिविजनल कमिशनर चोक्कलिंगम यांना जाते.
जसे औरंगाबाद डिविजनचे कमिशनर तसेच पुणे डिविजनचे कमिशनर श्री मोहनी हे ही फादर फिगर असेच होते. माझे जिल्हा प्रशिक्षण पूर्ण करून 3 महिने पुन्हा मसूरीला जायचे होते. त्याचवेळी आमच्याकडे बाळाची चाहूलही होती. मसूरीला जाण्यापूर्वी त्यांना भेटायले गेले असतांना त्यांनी आश्वासन देत म्हटले - काळजी करू नका. मसूरीहून परत आल्यावर पुढील दोन वर्षांसाठी तुमचे पोस्टिंग पुण्यातच राहील अशी काही व्यवस्था करू आपण. हे आश्वासन त्यांनी पूर्ण केले. मॅटर्निटी लीव्ह संपत असतानाच मला दोन ऑर्डरी मिळाल्या. एक होती माझा प्रशिक्षणकाल पूर्ण होऊन आता मी रीतसर भाप्रसे मधे रुजू झाल्याची. दुसरी होती मला हवेली सबडिविजनलाच असिस्टंट कलेक्टर या पदावर पोस्टिंग दिल्याची. त्यामुळे पुढील दोन वर्षे माझ्या दृष्टीने रहाते घर, ऑफिस, स्टाफ यातील काहीच बदलणार नव्हते. फक्त या दरम्यान सुब्रह्मण्यम हे कलेक्टर जाऊन तिथे श्री अफझलपुरकर हे नवे कलेक्टर आले होते. याच काळात पुणे महानगरपालिकेतून वेगळी काढलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे गठन झाले होते. तिथे ऐॅडमिनिस्ट्रेटर या पदावर खानोलकरांची नियुक्ति केली गेली होती. तिथे जाऊन त्यांना एक नवीन घडी बसवायची होती. माझ्या हवेली सबडिविजनच्या ज्यूरिसडिक्शनमधे पिंपरी चिंचवड येत असे त्यामुळे आमचे जाणे येणे चालू राहिले.
याच सुमारास पुण्यामधे फ्रांसिस वाझ या प्रोबेशनरी फॉरेन सर्विस ऑफिसरच्या ट्रेनिंगची जबाबदारी कलेक्टरांनी माझ्यावर सोपवली. डिफेंस अकाऊंट्स सर्विसमधील राधा ही ज्यूनियर ऑफिसर एका वर्किंग वूमन होस्टेलला रहात होती. माझ्या असिस्टंट कलेक्टरच्या पोस्टच्या रुबाबामुळे तिला होस्टेलबाहेर सिनेमा, सायकलिंग, कधी रहायला आमच्या घरी अशी परवानगी मिळत असे. टेलिकॉम खात्यालाही आमच्याप्रमाणेच यूपीएससी परीक्षेमधून आलेला एक ज्यूनियर ऑफिसर महेंद्र होता. त्याच्याही बॉसला महेंद्रने ग्रामीण भाग बघणे किती आवश्यक आहे असे सांगून मी टूरसाठी नेत असे. आम्ही कधी चौघे-तिघे-दोघे असे जात असू. देशभरातील वरिष्ठ प्रशासकीय पातळीसाठी यूपीएससीतर्फे सुमारे वीसएक सर्विसेस मधील नेमणुका केल्या जातात. त्यांच्यामधे होरायझंटल इंटिग्रेशन किती गरजेचे व उपयोगी असते याची जाणीव आम्हाला या एकत्रित फिरण्यामुळे झाली.
मी असिस्टंट कलेक्टर झाले त्या काळी आयएएसची नोकरी पटकविणाऱ्या महिलांची संख्या फार थोडी होती. 1951 मधे भारतातील पहिल्या महिला आयएएस श्रीमती ऐॅना जॉर्ज नोकरीत आल्या, त्यांना मद्रास काडर होते. महाराष्ट्रांत 1955 मधे श्रीमती मालती तांबे वैद्य व 1965 मधे श्रीमती शांता शास्त्री आल्या. 1974 मधे येणाऱ्या मी व शर्वरी गोखले धरून तोपर्यंत फक्त 11 जणी होतो. त्यामुळे त्या काळातील एकूण आह्वाने, काटेकुटे फार वेगळे होते. पण आता ते निघाल्याने आपल्याला महिला अधिकारी जास्त दमदारपणे काम करतांना दिसतात. हे चित्र पोलिस, वनविभाग, इंजीनियर, सैन्य-अधिकारी, उद्योजक, न्यायाधीश असे सर्वत्र दिसते ही फार आश्वासक बाब आहे.
No comments:
Post a Comment