लेखमालेतील लेख क्र 5
words 1472
लीना मेहेंदळे 9869039054
मी आयुर्वेदाकडे कशी वळले
मी अगदी लहान असल्यापासून आमच्या घरी "चांदोबा - लहान मुलांचे मासिक" येत असे. या मासिकाने हजारो मुलांची मन घडवलेली आहेत असं मला वाटतं. एकदा या मासिकात भगवान बुद्धांची पूर्ण जीवनकथा क्रमाक्रमाने प्रकाशित झाली. त्यामध्ये जीवक या एका व्यक्तीचरित्राची ओळख होती. जीवक आपल्या गुरूंकडे आयुर्वेद शिकण्यासाठी राहत असे. तो बरेचदा गुरूंना विचारायचं - गुरुजी माझे शिक्षण पूर्ण झाले असे मला वाटते - तर तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? शेवटी एक दिवस गुरुंनी सांगितले - हे बघ, आपल्या आश्रमापासून दहा कोस परिसरातून अशी वनस्पती शोधून आण जिचे औषधी गुण तुला माहीत नसतील – तीच माझी गुरुदक्षिणा. जीवक अशा वनस्पतीच्या शोधात निघाला. आश्रमा भोवतीचे दहा कोसाचे पूर्ण क्षेत्र त्याने पिंजून काढले आणि शेवटी गुरूंकडे हात हलवत परत आला. म्हणाला - गुरुजी, तुम्हाला गुरुदक्षिणा देण्यासाठी मी समर्थ नाही. कारण मला जिचे गुण माहित नाहीत, अशी एकही वनस्पती सापडली नाही. गुरुजींनी हसून म्हटले, अरे ही तर तुझी व माझी परीक्षा होती. तुला सर्व वनस्पतींची माहिती मी देऊ शकलो आहे ना, याची मला खात्री करायची होती. आता तू जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी अगदी असाध्य रोगांवरही तू उपचार करू शकशील. पुढे भगवान बुद्धांच्या शेवटच्या काळात त्यांना जो काही आजारपणाचा त्रास होत होता त्याचे निवारण करण्यासाठी ते जीवक कडून औषध घेत असत. ही कथा वाचली, तेव्हापासून मला छंद लागला की आपल्या जवळपासच्या वनस्पतींची ओळख करून घ्यायची. म्हणजे जरी त्यांचे मेडिकल गुण कळले नाही तरी निदान त्यांची नावे तरी कळून घेतली पाहिजेत. त्या काळात आणि अजूनही मला शेकडो झाडांची व वनस्पतिंची नावं आणि ओळख मराठी व हिंदीतून माहीत आहेत. त्याकाळी भारतीय भाषा इंग्रजीसमोर एवढ्या अगतिक नव्हत्या की मुलांनी फक्त इंग्रजी भाषेतूनच ज्ञान मिळवलं पाहिजे. त्यामुळे बहुतेकांची इंग्रजी नावे मला माहीत नाहीत, पण त्याने माझे काही अडतही नाही.
हा छंद जडल्यामुळे मोठं होत जाताना मला हळूहळू वनस्पतींचे औषधीय गुणही जाणून घेता आले. पण एखाद्या वनस्पतीचा औषधी गुण माहित असणे आणि प्रत्यक्ष आजार झाल्यावर त्या वनस्पतीचा वापर करून आजार बरा करणे या दोन अतिशय भिन्न गोष्टी आहेत. तरी असा वापर करण्याकडे मी वळले त्याचे कारण इंद्रदेवबाबू झिंदाबाद. आधी त्यांचेच दोन अनुभव इथे मांडत आहे. आम्ही बिहारमध्ये गेल्यानंतर चार सहा महिन्यातच दादांना (वडिलांना) कावीळ झाली. सडकून ताप, पिवळे डोळे, भयंकर थकवा, अशा परिस्थितीत आमच्या फॅमिली डॉक्टरानी त्यांना इंद्रदेवबाबूंकडे नेले. ते आयुर्वेद व होमियोपथीची प्रॅक्टीस करत असत. पण त्यांनी देखील सुरुवातीला स्वतः उपचार न करता दादांना एका कावीळ उतरवणाऱ्या मांत्रिकाकडे नेले. मी स्वतः ही उपचार पद्धती डोळ्यांनी बघू शकले नाही परंतु पुढे दादा सांगत असत. मांत्रिक त्यांच्यासमोर मोठ्या पितळी परातीत पाणी भरून ठेवत असे आणि मंत्रोच्चारासकट त्यांच्या खांद्यावरून हातापर्यंत आणि पाठीवरून खाली तसेच तोंडावरून हात फिरवत असे आणि ते हात परातीच्या पाण्यामध्ये धूत असे. काही वेळानंतर परातीतले पाणी पिवळे पिवळे पडत असे आणि डोळ्यांचा पिवळेपणा व ताप कमी होत असे. हा प्रकार तीन दिवस केल्यानंतर मांत्रिकांनी सांगितले की आता थोडीशी कावीळ उरलेली आहे त्यासाठी आपले डॉक्टर साहेब जो इलाज सांगतील तो करा. दादांचा ताप पूर्णपणे उतरला होता. मग इंद्रदेवबाबूंचे औषध चालू झाले. त्यांनी दादांना पुढील महिनाभर कारल्याचा रस, उसाचा रस आणि लिंबाचा रस घ्यायला लावला व त्यांची कावीळ संपूर्णपणे बरी झाली. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत रोज सकाळी पेलाभर पाण्यात अर्ध लिंबू पिळून ते पाणी पिण्याचा नियम दादांना पाळला.
एकदा दादा छताला लागलेले कोळ्याचे जाळे काढत असताना त्यांच्या हाताने एक कोळी चिरडला गेला. तो त्यांनी साध्या पाण्याने धुवून टाकला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कोपरापासून तर मनगटापर्यंत संपूर्ण हातावर कोळ्याच्या जाळ्यासारखी नक्षी उमटलेली होती. त्यातल्या रेघा अगदी बारीक होत्या पण रंग लाल होता आणि थोडी आग होत होती. दुपार होता होता त्या रेघांची जाडी वाढून आगही जास्त होऊ लागली. भावाने तत्काळ इंद्रदेवबाबूंना बोलवून आणले. त्यांनी दादांच्या हाताची दशा बघितली आणि म्हणाले डॉक्टर साहेब, याचं औषध तर तुमच्या अंगणातच आहे. आमचे दादा डॉक्टरेट असल्याने सर्वजण त्यांना डॉक्टरसाहेब म्हणत. कोणते औषध? अंगणात केळीची झाडं होती. इंद्रदेवबाबूंनी एका झाडाचं एक सोपटं बाजूला केलं आणि जमिनीच्या अगदी लगत बुंध्यात थोडसं पाणी साचलेलं होतं ते चमच्याने एका वाटीत काढून घेतलं. अशीच आठ-दहा सोपटं सोलल्यानंतर वाटीभर पाणी गोळा झालं. त्याच केळीच्या मुळातील माती उकरून त्यां पाण्यांत कालवली आणि त्याचा लेप हातावर उठलेल्या जाळीवर लावून दिला. दादांना चादर लपेटून झोपायला सांगितले. झोपेनंतर यांचा ताप उतरायला हवा, तोपर्यंत मी इथेच थांबतो असं आम्हाला म्हणाले. काही मिनिटातच दादांना झोप लागली. उठले तोपर्यंत आग, लाली व ताप कमी झाले होते. हेच औषध चार दिवस चालू ठेवल्याने हात पूर्ण बरा झाला. अशा कारणाने आम्ही इंद्रदेवबाबूंकडून आयुर्वेद व होमियोपथीची पुस्तकं आणून वाचू लागलो.
होमियोपथीमधे लक्षणांचा व औषधांचा विस्तार खूप आहे. तेवढा अभ्यास कदाचित जमणार नाही, पण त्यामधे बाराक्षार नावाचा मर्यादित बारा औषधांचा एक भाग वेगळा काढून अभ्यासता येतो हे कळल्यावर तेवढा अभ्यास मात्र आम्ही सुरू ठेवला आणि बहुतेक आजारपणावर त्याचाच वापर करतो. आम्ही म्हणजे मी व धाकटा भाऊ.
नववीत असतांना गांधीजींवरील एका धड्यांत गांधींच्या निसर्गोपचाराच्या प्रयोगांबद्दल वाचले. त्यातील मातीचे उपचार, साध्या पाण्याच्या पट्टीचे उपचार हे ही मला त्यांच्या सहज-सोपेपणामुळे भावले. आईच्या आईकडून तिनेही बरीच घरगुती औषधे शिकली होती. खरचटले की झेंडूच्या पानांचा रस, जखम होऊन भरपूर रक्त वहात असेल तर हळद दाबून धरणे, पोटदुखीला ओवा, खोकल्यावर लवंग, पाय मुरगळला तर हळद-बिब्बा-तुरटी हे भारतात सर्वांना माहीत असते. आमच्या घरी त्यांचा वापरही सर्रास होत असे. मोठा आजार असेल तरच डॉक्टर. पुढे माझी धाकटी बहीण रीतसर एमबीबीएस डॉक्टर झाली तेंव्हा तर तिच्या डायग्नोस्टिक स्किल्सचाही लाभ आम्हाला आयता मिळू लागला.
दादा संस्कृत, तत्त्वज्ञान, योग, गीता व ज्योतिष या विषयांत निष्णात होते. ते स्वतः दररोज योगासने, ध्यान आणि जप करीत. आम्हालाही शिकवले होते पण आम्ही यथातथाच. तरीही त्यांच्या ज्ञानाच्या किमान शतांशाने तरी हे विषय मला कळतात. लाभांची प्रचीती तर आम्ही नेहमीच घेत असू. त्यांनी कुंडलीच्या आधारे सांगितलेले भविष्य नेहमीच खरे होताना आम्ही पाहिले. बऱ्याच वर्षानंतर मी विपश्यना ही ध्यान पद्धतीही शिकले. योगासन व ध्यानाबाबत दादा म्हणत – हे बँकेतील रिकरिंग डिपॉझिट सारखे आहे - सातत्याने करत राहिले तर एरवीपेक्षा कितीतरी अधिक व्याज – आणि काही काळानंतर तुम्ही मधे-मधे मोठी रकम काढू शकता. तसेच आसने-ध्यान इत्यादी मूळतः भविष्यकाळातील स्वास्थ्यासाठी असतात. सुरुवात केली आणि चार दिवसात फायदा दिसला अस होत नाही म्हणूनच लोक निरुत्साही होतात. पण आपण जाणीवपूर्वक सातत्य टिकवाव. दादांनी फिजिक्सचीही गोडी लावली होती. त्यात मात्र मी नैपुण्य मिळवल. एकदा मी त्यांना विचारले की फिजिक्स आणि ज्योतिष यांची सांगड कशी घालता. ते म्हणाले - दोन्ही मधे प्रयोग करत रहाणे, तर्कशुद्धता आणि एम्पीरीकल एविडन्स महत्वाचे आहेत. ते मी लक्षात ठेवले.
लग्नानंतर पाहिले की माझे सासरे होमियोपथीचे चांगले जाणकार आहेत. एक नणंद व त्यांचे यजमान रेल्वेत उच्च पदस्थ डॉक्टर. त्यांची तीनही मुलं शाळा नसली की सासूबाईंकडेच येत. त्यांच्या सर्व आजारांना औषध होमियोचे. माझ्याही गरोदरपणांत त्रास न व्हावा म्हणून त्यांची औषधे घेतलीत. त्यांच्याकडील बाराक्षारावरील एक ग्रंथराज माझ्या वाट्याला आला. मुलांच्या लहान वयात मीच बाराक्षाराची औषधे देऊ लागले. आमच्या बागेत तुळस, झेंडू, पारिजात, बेल, ब्राह्मी, गुळवेल, कोरफड, गवती चहा, पुदीना इत्यादी कायम असतात व ते आम्ही प्रतिरोधक व शामक या दोन्हींसाठी वापरतो. जिथे क्रिटिकॅलिटी नसेल तिथे प्रयोग करून पहायचा, काही अडलच तर बहिणीचे ज्ञान मदतीला आहेच हा आमचा साधा नियम. तिचे स्वतःचे मलेरियाचे दर तीन-चार महिन्यांनी होणारे इन्फेक्शन बाराक्षार औषधाने कायमपणे बरे झाले. पण मुळात ती ते घ्यायला कशी तयार झाली तोही एक किस्साच आहे. एका रात्री ती व मी अशा दोघी एकट्याच घरी असताना तिला अचानक शिवरिंग आणि चढता ताप सुरू झाले. त्या दिवसात पुण्यात जक्कल हत्याकांडातील हत्यांमुळे सायंकाळी सातनंतर सगळीकडे चिडीचूप व्हायचे. बाहेर पडायची सोय नाही आणि दुकानेही बंदच असणार. अशा वेळी आम्ही त्या बाराक्षार ग्रंथातील मलेरिया हे प्रकरण वाचून त्याप्रमाणे औषधे घेतली आणि ती लागू पडली. तीच कायम ठेवल्याने तिचा रिकरिंग मलेरियादेखील बरा झाला.
मी नोकरीनिमित्त पुण्यात आले ती आयएएस अशी भारदस्त ओळख घेऊन. त्यामुळे श्री नानल वैद्य व श्री खडीवाले वैद्य यांना चर्चेसाठी सहजपणे भेटता येत असे. त्यांच्यासोबत आयुर्वेदाची बलस्थाने, रिसर्चची कमतरता, सरकारी मान्यता व धोरणांचा अभाव, वैद्यांमधे शोधक वृत्ति आणि पारदर्शिता नसणे, आधुनिक काळानुरूप प्रयोग किंवा शोध करण्यावर सरकारी निर्बंध इत्यादी चर्चा होत असत. पुस्तके तर खूप पहायला मिळाली. माधवनिदान या जाडजूड ग्रंथावर भाष्य करणारा एक इंग्लिश भाषेतील तितकाच जाड ग्रंथ पाहिला. त्याच्या प्रस्तावनेत तो युरोपीय लेखक म्हणतो की त्याने इतर आयुर्वैद्यांच्या मदतीने माधवनिदान या ग्रंथाचा अभ्यास अठरा वर्ष केला असून त्याला यावर चार भागात लिखाण करायचे आहे व त्यापैकी हा पहिला भाग आता सिद्ध झाला आहे. माझ्या मते ही तर शुद्ध तपश्चर्याच आहे. एवढी तपश्चर्या करण्याचे सामर्थ्य आज आपला समाज हरवून बसला आहे का अशी कधी कधी निराशाही वाटते.
आयुर्वेदात अन्न तयार करताना काय व कसे करावे आणि ते कसे व कधी खावे याला खूप महत्व आहे. त्याबाबत एक छोटा किस्सा. एकदा मला मुळव्याधीचा त्रास सुरू झाला. आयुर्वेदात यावर पेरू हे औषध सांगतात. पेरु माझे आवडते फळ - त्यात हिरवा कुर्रकुर्र वाजत खायचा तर फारच मजा. पण त्याने त्रास वाढला. मग ताक हे औषध वापरले. एका पुस्तकात वर्णन होते - सामान्यपणे आपण घेतो त्या ताकात पाचपट पाणी मिसळून तेवढे पातळ ताक घ्यावे. त्याने त्रास आटोक्यात आला. पेरुचा प्रयोग फसला - त्याविषयी खडीवाले वैद्यांना विचारले. ते म्हणाले अहो, औषध म्हणून खायचा असेल तर पिवळा छान पिकलेला खायचा असतो. एरवीदेखील लक्षात ठेवा- फळे, भाज्या, धान्य, हे उत्तम पिकवून मगच खायचे असते.
यावरून आठवले. दादा सांगत- आपल्याकडे खूपसारे ज्ञान सूत्ररूपाने मांडून ठेवले आहे, ते पाठ करून ठेवता यावे म्हणून. एखादा अनुभवसंपन्न योग्य गुरू ते सूत्र फोड करून सांगतो तेंव्हा ते शिकले जाते. व तेच आचरणात आणले की सिद्ध होते. या व्याख्येनुसार मला आयुर्वेद सिद्ध होण्यास बराच काळ लागेल. पण माहिती घेत राहिल्याने निदान सुरुवात तर झालेली आहे. याचा पोस्टिंगमधे कसा फायदा झाला तो किस्सा पुढे कधीतरी.
------------------------------------00000000000000000000000000----------------------------------------
No comments:
Post a Comment