लेखमालेतील लेख क्र 2
औरंगाबाद मधे स्वागत
लीना मेहेंदळे 9869039054
leena.mehendale@gmail.com
देशाच्या प्रशासन व्यवस्थेतील उच्चपदांवर नेमणुकीसाठी यूपीएससीतर्फे परीक्षा घेतल्या जातात व त्या मधून जे उमेदवार उत्तीर्ण होतात त्यांना एकत्रितपणे मसुरीच्या लाल बहादुर शास्त्री नॅशनल अकादमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन येथे ट्रेनिंगसाठी पाठवले जाते. तसे मी पण 1974 जुलैमध्ये ट्रेनिंग साठी तिथे दाखल झाले.
पण आज मी मसुरीतील प्रशिक्षण कसे असते किंवा कसे होते हा मुद्दा थोडासा मागे ठेवून औरंगाबाद मधील माझ्या पोस्टिंग बद्दल बोलणार आहे. सर्व IAS अधिकाऱ्यांसाठी मसुरीला नऊ महिन्याचे पहिल्या टप्प्याचे ट्रेनिंग, त्यानंतर एक वर्ष एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशिक्षण, आणि पुन्हा तीन महिने मसूरीला दुसऱ्या टप्प्याचे ट्रेनिंग अशा प्रकारे एकंदरीत दोन वर्षांचा हा प्रशिक्षण कालावधी असतो. त्याप्रमाणे मसूरी येथील नऊ महिन्याचा ट्रेनिंगचा कालावधी संपला. मला महाराष्ट्र राज्य हे काडर म्हणून अलॉट झाले होते. सबब मी दरभंगा व कलकत्ता येथे धावती भेट देऊन मुंबईला आले. इथे मुंबईच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेजमध्ये तीन आठवडे प्रशिक्षण असते जेणेकरून महाराष्ट्र काडरमध्ये येणाऱ्या सर्वांना महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र प्रशासनाची तोंड ओळख व्हावी. तेवढ्या कालावधीत सरकारला देखील ठरवायला वेळ मिळतो की कुठला अधिकारी कुठल्या जिल्ह्यात ट्रेनिंगसाठी पाठवायचा.
मुंबईच्या ट्रेनिंग काळात मी माझ्या सासुरवाडी म्हणजे गिरगावात राहत असे. यानिमित्ताने त्या सर्वांच्या सोबत तीन आठवडे घालवायला मिळाले. त्यावेळी माझा धाकटा दीर नितीन हा मॅट्रिकच्या परीक्षेला बसत होता. त्याच्या अभ्यासात माझीही थोडीफार मदत झाली. माझे जिल्हा ट्रेनिंग एक वर्षाचे असेल म्हणजेच मला जिल्ह्याच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर स्वतंत्र घर थाटावे लागेल. त्यासाठी सामानाची स्पेशल खरेदी, साड्या, ड्रेसेस, खास करून स्वयंपाकाची भांडीकुंडी, स्वयंपाक घरात लागणारे पदार्थ, मसाले इत्यादी सगळी खरेदी मी सासऱ्यांना बरोबर घेऊन पूर्ण केली कारण ते मुंबईतील जाणकार होते. मग एक दिवस हातात ऑर्डर पडली की मला औरंगाबाद येथे जायचे आहे. मुंबईहून औरंगाबादला कसे जातात, तर मुंबई सेंट्रलवरून एसटी बसेस सुटतात आणि संध्याकाळची बस घेतल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास ती औरंगाबादला पोहोचते एवढी माहिती मिळाली. औरंगाबादला गेल्यावर पुढे काय करायचे, कसे करायचे या विवंचनेत मी घरी आले. तोच सायंकाळी माझ्या सासऱ्यांच्या पत्त्यावर एक तार मिळाली. त्यामध्ये लिहिले होते - श्रीमती लीना मेहंदळे, नमस्कार. आपले पोस्टिंग औरंगाबाद येथे झालेले आहे. मी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत अधिकारी श्री बी. टी. तुळजापूरकर आहे. आपण अमुक तारखेला मुंबऊ सेंट्रलहून संध्याकाळी निघणारी बस घ्यावी. पुढील दिवशी सकाळी सात वाजता औरंगाबाद बस स्थानकावर मी आपणास घेण्यासाठी हजर राहत आहे. ही तार वाचून मला किती हायसं वाटलं असेल याची कोणीही कल्पना करू शकत नाही, कारण तसं बघितलं तर मला महाराष्ट्र हा काही फार परिचयाचा नव्हता. या तारेमुळे श्री तुळजापूरकर यांना भेटण्याआधीच त्यांच्या स्वभावाची कल्पना आली. त्यांच्या तारेत त्यांनी हेही लिहिले होते की इथे तुम्हाला राहण्यासाठी सरकारी घर मिळेल त्यामध्ये थोडेफार फर्निचर देखील असेल म्हणून आपल्याबरोबर फार सामान आणण्याची गरज नाही. जे काही कमी पडेल त्याची व्यवस्था तुम्ही इथे पोचल्यावर आपण करू शकतो. ही तर अतिशय आश्वासक माहिती होती.
माझ्या नोकरीच्या काळात पुढे देखील कित्येक वेळा श्री तुळजापूरकर यांची मला मदत झाली. ते मूळतः हैदराबाद मधील होते त्यामुळे मराठी सोबतच हिंदी, तेलगू, उर्दू, फारसी या भाषांची त्यांना चांगली जाणकारी होती. अत्यंत अदबशीर असे ते अधिकारी होते. औरंगाबादला येणाऱ्या अगदी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री पासून सर्वांची व्यवस्था ठेवण्याचे काम रिसेप्शन ऑफिसरचे असते. तरीपण माझ्यासारख्या अतिशय ज्युनिअर आणि प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यासाठी देखील त्यांनाच व्यवस्था करायची असते आणि दोन्ही बाबी ते एकाच प्रकारे कर्मठपणाने निभावून नेत असत. मला घेण्यासाठी ते खरोखरच सरकारी जीप घेऊन स्वतः आले होते.
मला देखील हिंदी आणि उर्दू भाषा उत्तम अवगत आहेत हे पाहून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी मला सांगितले की हा मराठवाडा म्हणजे सात जिल्हे पूर्वीच्या काळी हैदराबाद निजामाच्या शासनात होते. याला निजामशाहीतून मुक्त करण्यासाठी पुष्कळ आंदोलने झाली. निजामाच्या रझाकारांनी इथल्या जनतेवर अनन्वित अत्याचार केले. पण इथले स्थानिक मुसलमान तुम्हाला सज्जन आणि नेकदिल सापडतील. तुम्हाला त्यांची बोली येते याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. अशाप्रकारे रस्त्यात गप्पा होत होत आम्ही सरकारी सुभेदारी गेस्ट हाऊसवर पोचलो. तिथे एका व्हीआयपी खोलीत माझं सामान ठेवण्यात आलं. जोपर्यंत घर अलॉट होत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहायचं आहे, तेव्हा आता तुम्ही ऑफिस साठी तयार व्हा. नाश्त्यासाठी कलेक्टर साहेबांनी त्यांच्या घरी घेऊन यायला सांगितलेलं आहे आणि तिथूनच तुम्ही ऑफिसला देखील जाणार आहात. मी अतिशय प्रभावित होते. ही अतिथ्यशीलता कदाचित औरंगाबादच्या हवेतच आहे की काय असं मला वाटू लागलं. थोड्याच वेळाने सुभेदारी गेस्ट हाऊसच्या कम्पाऊंड वॉलला लागून असलेल्या श्री भागवत - कलेक्टर यांच्या घरी मला सोडून श्री तुळजापूरकर त्यांच्या कामासाठी निघून गेले. एखाद्या कलेक्टराच्यासोबत माझी ही पहिली भेट होती आणि कलेक्टर म्हणजे नेमकं काय असतं हेही मला तेव्हा फारसं माहीत नव्हतं. श्री भागवत हे माझ्यापेक्षा तेरा वर्षांनी सीनियर होते. ते, त्यांची दोन मुलं आणि मी असे आम्ही ब्रेकफास्ट टेबल वर होतो. ते म्हणाले - जोपर्यंत घर अलॉट होत नाही तोपर्यंत तुझा नाश्ता लंच डिनर सगळे इथेच असेल. मी जरी टूरला बाहेर गेलो असलो तरी संकोच न करता इथेच येऊन जेवण खाण करायचं. सध्या मिसेस आणि मोठा मुलगा तिच्या माहेरी गेले आहेत, पंधरा दिवसांनी येतील. तू गेस्ट हाऊस मध्ये जेवण केलेलं तिला आवडणार नाही कारण IAS फ्रॅटर्निटी म्हणून पण काही असते की नाही.
ब्रेकफास्ट साठी आंबे पण होते. श्री भागवतांनी सांगितले - मी आंबे अतिशय आवडीने खातो औरंगाबाद येथे निजामाचा शाहबाग नावाचा आंब्याचा बगीचा आहे तिथे वीस पंचवीस तऱ्हेचे आंबे आहेत तू पण जाऊन बघून ये. मी त्यांना म्हटले की मी देखील आंब्याची अतिशय शौकीन आणि हरतऱ्हेचे आंबे खाणाऱ्यांपैकी एक आहे. कालांतराने मी त्या आंबाबागेतही जाऊन आले. त्या आंब्यांचे स्वाद खरोखर एखाद्या महाराजाला साजेसे असेच होते. औरंगाबादचे आंबे आणि माझे एक वेगळे कनेक्शन नंतर जुळले पण ती कथा पुढे कधीतरी.
नाश्ता, गप्पा यानंतर मी कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन जॉइनिंग रिपोर्ट दिला. त्याचवेळी तिथे माझ्यापेक्षा तीन वर्षांनी सीनियर असलेल्या श्रीमती चारुशीला सोहनी आल्या. त्या कमिशनर कार्यालयात सप्लाय डिपार्टमेंटच्या प्रमुख होत्या. त्या काळात इमर्जन्सी चालू होती आणि रेशनिंग व्यवस्था ही एका अर्थाने अगदी चरम अवस्थेत होती. दूध, केरोसीन, साखर, रेशन, गॅस, असं सगळं रेशन कार्डावरच मिळत असे. सोहनी मला घेऊन कमिशनर ऑफिसला आल्या व तातडीने मला गॅस-दूध-रेशन-केरोसीन यासाठी कार्ड बनवून दिले. मग कमिशनर श्रीद्वारकानाथ कपूर यांच्याकडे नेऊन माझी ओळख करून दिली. त्यांना म्हणाल्या -- सर ते अमुक अमुक घर सध्या रिकामेच आहे. तुम्ही परवानगी दिलीत तर आपण आता यांच्या नावाची अलॉटमेंट ऑर्डर काढू आणि पुढच्या अलॉटमेंट कमिटीच्या मीटिंगमधे पोस्ट-फॅक्टो सँक्शन घेऊन टाकू.
अशा प्रकारे घराचा प्रश्नही निकालात निघाला. मलाही माझा पहिला धडा शिकता आला की जिथे कुठे मी सीनियर ऑफिसर असेन त्या ठिकाणी माझ्या जुनियर ऑफिसर्सची जबाबदारी घेऊन मी त्यांना कशाप्रकारे सुविधा दिल्या पाहिजेत. हे तंत्र मीही माझ्या पुढील पोस्टिंगमधे सांभाळले.
आलेल्या प्रशिक्षणार्थीला प्रत्येक सरकारी विभागाच्या कामाशी परिचय करून देणे, तसेच प्राकृतिक विपत्ती व्हीआयपी व्हिजिट अशा मोठ्या प्रसंगांना देखील कसे हँडल करावे या ट्रेनिंगची जबाबदारी कलेक्टर वर असते त्यामुळे बरेचदा कलेक्टरांच्या बरोबर त्यांच्या टूर मध्ये मी देखील जात असे. याप्रसंगी सरकारी योजना, सरकारी नीती, त्यातलं चांगलं वाईट इत्यादी मुद्द्यांवर चर्चा होत असे आणि जिल्ह्याचा भूगोलही अनायास परिचित होत असे.
पहिल्या दिवशी माझे जॉइनिंग रिपोर्ट, कमिशनर ऑफीस चा फेरफटका, तिथल्या व कलेक्टर ऑफिस मधील सगळ्या कार्यालयांची ओळख इत्यादी सर्व पूर्ण झाले. रात्री डिनरनंतर दिवसभराच्या थकव्यामुळे नवी जागा वगैरे काही मनांत न येता लगेचच झोप लागली
दुसऱ्या दिवशी पहाटेची गोष्ट. अजून सर्वत्र अंधारलेलेच होतं. तांबड फुटलेलं नव्हतं. पण सर्व बाजूंनी एक अतिशय परिचित असा सुगंध आणि कोकिळांचे कुहू कुहू हे सुरू झाले होते. मी झटकन उठून बसले. मनात म्हटले - हा सुगंध तर आपल्याला परिचित आहे, पण नेमका कशाचा सुगंध आहे हे आता आठवत नाही. कुठले फूल असेल बरे असे म्हणत मी बाहेर आले आणि बघितलं तर कंपाउंड मध्ये पाच-सहा कडुलिंबाची झाडं शांतपणे डोलत होती. त्यांना छोटी छोटी पांढरी फुले लागलेली होती आणि त्यांचा सुगंध सर्वत्र पसरलेला होता. कडुलिंब तर माझा अति परिचयाचा. बालपणी धरणगावी सुमारे सात वर्षापर्यंत मी कडुलिंबाच्या झाडाखाली कॉटवर झोपत असे. वसंत ऋतुची चाहूल याच्याच फुलांमुळे लागत असे. बिहारला गेल्यापासून आमच्या आसपास ही झाडे नव्हती आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत धरणगावला आम्ही येत असू त्यावेळेला कडूलिंबांच्या फुलांचा सिझन संपलेला असे. म्हणूनच हा सुगंध मला आज इतक्या वर्षानंतर भेटत होता की सुरुवातीला ओळखताही आला नाही. पण इथून पुढे एखादा महीना तरी प्रत्येक पहाटे माझी या सुगंधाची भेट होणार होती.
पुष्पगंध कुणाला आवडत नाही. पण असे काही वृक्ष आहेत ज्यांच्या सुगंध मला अतिशय मोहित करतो. खूप लांबून तो सुगंध येत असला तरी मला ओळखता येते की हा वृक्ष आपल्या जवळपास कुठेतरी आहे. त्यामध्ये कडुलिंब, आंबा, फणस, शिरीष, बुचाचे झाड, बहावा अशा बऱ्याच वृक्षांचा समावेश आहे. असो.
श्री भागवतांकडून मला खूप काही शिकायला मिळालं जे मी विसरू शकत नाही. ते एक अतिशय सज्जन आणि संवेदनशील असे व्यक्तित्व होते. त्यांच्याकडे बघून असं वाटत असे की यांना कपट म्हणजे काय ते माहीत नाही. एक दिवस मी, श्री भागवत आणि चारुशीला असे कुठलातरी सिनेमा बघायला एकत्र गेलो होतो. त्यावेळी अगदी लाईनीत उभे राहून तिकीट काढून आम्ही सिनेमा पाहिला. ते म्हणत - कधी कधी हा कलेक्टरचा पोशाख उतरवून सामान्य नागरिकासारखं गोष्टी करण्यातही मजा असते. अधनंमधनं असं करावं. आम्ही लाईनीत उभे असतानाच एक छोटा मुलगा तिथे येऊन एक चवन्नी तो दे दो, एक चवन्नी दे दो असं मागत आला. मी त्याला जरा रागावून विचारलं भिका मागतोस शाळेत का जात नाहीस. त्याबरोबर तो कुठेतरी पळून गेला. मी बघितलं की श्री भागवत यांनी खिशात हात घालून काही पैसे काढलेले होते पण माझ्या बोलण्याचा मान ठेवण्यासाठी त्यांनी ते पैसे खिशात परत टाकले. मला म्हणाले तू ग्रामीण भाग राहिलेली आहेस पण शहराची गरीबी अजून पाहिलेली नाहीस. गावात कितीही गरीब असेल तरी त्याला रात्री पोटासाठी काही ना काही नक्की मिळून जातं. शहरातील गरिबी ही फार क्रूर असते. त्याचा अंदाज नाही म्हणूनच या मुलाला तू असा शाळेत जाण्याचा उपदेश केलास. हे त्यांचे शब्द मी कायम लक्षात ठेवलेले आहेत.
एक दिवस मी दुसऱ्या कुठल्यातरी कार्यालयात असताना श्री भागवतांचे पीए यांचा फोन आला की आज शहरातील उद्योगपतींनी रात्रीचे डिनर ठेवलेले आहे. तुम्ही साडेसात वाजेपर्यंत कलेक्टर यांच्या घरी या. मिसेस भागवत डिनरला जाणार नाहीत पण तुम्ही ट्रेनी असल्याने तुम्हाला जायचे आहे. असे आम्ही दोघे डिनरच्या ठिकाणी एका फाइव्ह-स्टार हॉटेलमध्ये पोहोचलो. तिथे जमा झालेल्या उद्योगपतींनी आमचे स्वागत केले. श्री भागवतांनी माझा परिचय करून दिला - या आपल्या जिल्ह्यातील नवीन प्रशिक्षणार्थी आहेत. तेवढ्यात आमच्यासाठी फ्रुट ज्यूस वगैरे आले. पुढील पाच मिनिटातच माझ्या लक्षात आले की जवळपास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एका वेगळ्या प्रकारचे टेन्शन होते आणि ते आपापसात गुपचूप काहीतरी बोलत होते. तोवर अचानक श्री भागवत उठून उभे राहिले आणि म्हणाले मित्रांनो, मी आपणा सगळ्यांची आणि मिसेस मेहेंदळे यांची देखील क्षमा मागतो. मी दिवसभर दौऱ्यावर होतो. मी जे रुटीन निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे माझ्या पीएने यांना माझ्याबरोबर डिनरला येण्यासाठी सांगितले, कारण अशा पार्टी अटेंड करणे हा देखील प्रशिक्षणाचा एक हिस्सा आहे. पण मला किंवा माझ्या पीएला हे लक्षात राहिले नाही की आजची स्टॅग पार्टी ठरलेली होती. आता या महिला आहेत आणि ड्रिंक्स घेत नाहीत त्यामुळे मी आपणा सर्वांना असे सुचवतो की आजच्या पार्टीत ड्रिंक सर्व्ह केले जाणार नाही. सगळ्यांनी ह्याला अनुमोदन दिले आणि ही चूकभूल विसरून सगळ्यांनी डिनरचा आनंद घेतला. यावरून मला श्री भागवतांच्या संवेदनशीलतेची कल्पना आली. नोकरीत ती फार थोड्या अधिकाऱ्याकडे पहायला मिळाली. श्री भागवत जिल्ह्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष म्हणून प्रसिद्ध होते म्हणूनच इतक्या निर्भेळ मनाने त्यांनी हा विचार मांडला आणि सर्वांनी स्वीकारला.
असाच एक प्रसंग मला अजून आठवतो. एकदा त्यांना जिल्हा वक्फ बोर्ड मध्ये अध्यक्ष या नात्याने इन्स्पेक्शन साठी जायचे होते. त्याकाळी जिल्हाधिकारी हेच वक्फ बोर्डाचे पदसिद्ध अध्यक्ष असत. त्या ऐवजी मुख्यमंत्री किंवा त्यांनी सुचवलेले मंत्री अध्यक्ष राहतील ही पद्धती पुढे अंतुले मुख्यमंत्री असताना आणली. तर या व्हिजिटमध्ये मी व अजून दोन-तीन अधिकारी देखील गेलो होतो. एका खोलीत आमचे इन्स्पेक्शन पूर्ण झाले तो एक वृद्ध मौलाना समोर आले आणि मला म्हणाले - आता आपण इबादतगाह मध्ये जाणार आहोत. चहा पाण्याची व्यवस्था तिथेच केलेली आहे. तसे तर आमच्या इबादतगाहेत महिलांना प्रवेश नाही. पण तुम्ही इथे महिला म्हणून नाही तर हकीम म्हणून आलेले आहात. कोणाला ठाऊक उद्या कदाचित तुम्ही आमचे जिल्ह्याला कलेक्टर म्हणून आलात तर तुम्ही आमच्या बोर्डाच्या अध्यक्ष पण असाल. म्हणूनच आम्ही कुठलीही रोकटोक न ठेवता तुम्हाला तिथे घेऊन जात आहोत. या प्रसंगाने मला श्री तुळजापूरकरांनी दिलेल्या माहितीची प्रचीति आली.
मला नेहमीच असं वाटतं की कुठल्याही संस्थेत, समाजात आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात ज्यावेळेला वरिष्ठ पदावर बसलेल्या व्यक्ती आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तींना योग्य मार्गदर्शन आणि मदत ही स्वतःची जबाबदारी मानतात, तशी भावना ठेऊन त्याप्रमाणे वागतात तोपर्यंत ती संस्था, तो समाज किंवा ते राष्ट्र यामध्ये चांगल्या परंपरा निर्माण होत राहतात. ही मानवी नाती सांभाळली गेली तरच चांगल्या रीतीने काम शिकणाऱ्यांची संख्या देखील वाढते, तरच राष्ट्रनिर्माणाला गति मिळते. अन्यथा नाही.
-----------------------------------------------oooooooooooooooo------------------------------------------------
No comments:
Post a Comment