मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Sunday, June 2, 2024

1. मसूरीला आयएएस ट्रेनिंगच्या दिशेने - लेखमाला मिळून साऱ्याजणी

अजून चालायचेच आहे

आयुष्य म्हणजे एक मोठा प्रवास. त्यात सुखदुःख, आशानिराशा, ऊनपाऊस असे रंग असणारच. ते जगणे आणि तरीही अलिप्ततेने पहाणे! पण अगदीच अलिप्तही नाही कारण समाज सद्गुणी झाला पाहिजे, व राष्ट्र समृद्ध झाले पाहिजे ही आस असेल तर आयुष्याला अजून एक गहिरा रंग मिळतो. अशा सर्व रंगांचे हे प्रकटन ! किती जमते ते पहायचे.


मसूरीला आयएएस ट्रेनिंगच्या दिशेने

-- लीना मेहेंदळे 9869039054


लखनऊ स्टेशन वरील ती दुपार माझ्या मनःपटलावर कायमपणे कोरली गेलेली आहे. दिनांक असावा 11 जुलै 1974. लखनऊचा भलामोठा, लांबलचक प्लॅटफॉर्म. बेसुमार गर्दी. धावत पळत जाणारे लोक - त्या गर्दीत मी पण एक होतेच.

लखनऊ दिल्ली गाडी येण्याची वेळ झालेली होती. मला हीच गाडी पकडायची होती. माझं सामान ज्या कुलीकडे होतं त्याला मी आधीच सांगून ठेवलेलं होतं की बघ बाबा, मला बायकांच्या डब्यात बसव. थोडासा प्रौढ, म्हातारपणाकडे झुकलेला असतो होता. त्याच्या डोक्यावर माझं सामान म्हणजे डोक्यावर एक होल्डॉल, दोन सुटकेसेस आणि खांद्याला एक शोल्डरबॅग. माझ्याजवळ देखील एक सुटके, एक जेवणाचं सामान ठेवलेली शोल्डरबॅग आणि एक टिपिकल, मोठीथोरली पर्स इतकं सामान होतं. इतकं समान यासाठी कि त्याच्या आधारे मला पुढील संपूर्ण एक वर्ष ट्रेनिंग साठी मसुरी काढायचं होतं. त्यामुळे साड्या, ड्रेसेस, रजाई, गरम कपडे, पुस्तक, चपला-बूट, दागिने, काही दिवस तरी पुरतील इतके फराळाचे पदार्थ, अजून काही सामान इत्यादी इत्यादी सर्व होते.

अचानक गर्दीतून कोणीतरी सांगितलं की लखनऊ- दिल्ली ट्रेन तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येते आहे. त्याबरोबर ज्यांना ती गाडी पकडायची होती अशी सगळी गर्दी धावत पळत जिने चढायला लागली. मी पण त्यांच्याबरोबर जिना चढले. आणि पलीकडील जिना उतरताना माझ्यासमोरच गाडीने प्रवेश केला, तिचा वेग कमी झाला आणि गाडी थांबली. इंजिनच्या जवळ मला एक महिलांचा डबा दिसला होता. तिकडे धावत पळत जाऊन मी आत शिरले, एक खिडकी पकडली, माझ्या हातातलं मान बाकाखाली ठेवलं. तोपर्यंत माझ्या मागून बरीच गर्दी त्या डब्यामध्ये शिरली होती. बायकांचा डबा असला तरी त्यांना पोचवण्यासाठी आलेले इतर पुरुष, कुली वगैरे. क्षणातच डबा खचाखच भरला होता. आता माझ्या लक्षात आलं की अरे, माझा कुली कुठे आहे आणि माझं सामान कुठे आहे?

मी खिडकीतून डोकं बाहेर काढून पाहायचा प्रयत्न केला. त्याकाळी खिडक्यांना आडवे गज नसत. पूर्ण खिडकी मोकळी असायची. एका परीने हे सोय होती, कारण लोक त्या खिडकीमधून सामान टाकू शकत होते किंवा बाहेर काढू शकत होते. अगदी लहान मुलं देखील त्या खिडकीवाटे आत-बाहेर करू शकत असत. अशी ती बिनगजांची खिडकी असल्यामुळे मला डोकं बरंच लांब बाहेर काढता येत होतं आणि प्लॅटफॉर्मवर लांब पर्यंत माझी नजर जाऊ शकत होती. पण कुली दिसायचं काही चिन्ह नव्हतं. गाडीला हिरव्या लालच्या ऐवजी पिवळा सिग्नल मिळाला. एखादी शिट्टी पण वाजली. गार्ड आणि टीसीच्या फेऱ्या आणि लगबग सुरू झाली. गाडी आता थोड्या वेळातच सुटणार.

मला समजेना की मी थांबू की उतरू? तस म्हटलं तर उतरण्यासाठी एवढ्या गर्दीला तुडवून मी दारापर्यंत कशी पोहोचणार होते? शिवाय माझं जे समान मी बाकांखाली सरकवलेलं होतं त्याच्या आजूबाजूला इतरां बर सामान कोंबलेलं होतं. म्हणजे हा खटाटो फारच मोठा होता. पण माझे बाकी समान नसेल तर मी गाडीत थांबून किंवा दिल्लीला जाऊन तरी काय करू अशा धाकधुकीत मी असतानाच अगदी लांबून स्टेशनच्या दुसऱ्या बाजूने तो पळत येताना मला दिसला. त्यानी जेमतेम डबा गाठला आणि एक एक करून समान खिडकीतूनच आ दिल. इतरांनी मदत केली. माझं सगळं समान आत आलं तोपर्यंत गाडी सुरू झाली होती. मी पर्समधून ठरलेले पैसे काढले आणि त्याच्या हातात दिले. त्यानेही जास्त मागितले नाहीत. हा संबंध वेळ तो मला रागवत होता - त्याच्या प्रौढ वयाचा तो फायदा घेत होता म्हणा. "बीबीजी, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या पाठी पाठी या, इकडे तिकडे जाऊ नका. तिकडे जो शेवटी महिलांचा डबा आहे तिथे मी गेलो. तुम्ही दिसला नाही पुन्हा सगळं सामान बाहेर काढलं आणि तुम्हाला शोधत आलो" वगैरे वगैरे. मी त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेत होते. माझा जीव भांड्यात पडलेला होता कारण माझं सामान मिळालेलं होतं.

गाडी प्लॅटफॉर्मवरून पुढे सरकली, तो दिसेनासे झाला तरी खूप वेळपर्यंत मी तिकडेच बघत होते. मी जणू भानावर नव्हते. हा जर माझ्यापर्यंत पोहोचू शकला नसता तर? किंवा जर त्याने माझं सामान घेऊन पळून जायचं ठरवलं असतं तर? पण माझ्या लक्षात आलं की भारतीय समाजात जो एक सचोटीचा आणि इमानदारीचा गुण भरून राहिलेला आहे त्या गुणामुळे आज माझं रक्षण झालं होतं. माझं सामान वेळेत मला मिळणं याचं महत्त्व जसं मला वाटत होतं, तसं त्या म्हाताऱ्या कुलीलाही त्याच्या संस्कारांमुळे वाटत होतं. म्हणून त्याने एवढी धावपळ करून माझं सामान माझ्यापर्यंत पोहोचवलं होतं. अशी सचोटीची मानसिकता जर समाजात नसेल तर माझ्यासारख्यांचं कसं होणार? समाजात सज्जनता आहे म्हणूनच माझ्यासारख्या थोड्याशा बिनधास्त किंवा निष्काळजी लोकांचं निभावू शकतं. हे किती मोठं सुरक्षा कवच आपल्याला लाभलेले आहे. हे आपल्याला असंच वारंवार लाभलेलं राहावं, इतरांनाही लाभलेलं राहावं, यासाठी समाजातील सचोटी, सदाचार, आणि सदभावना कायम वाढत राहिले पाहिजे. त्यात मी किती भर घालू शके हे माहीत नाही. पण जोपर्यंत ही सचोटी आणि सद्भावना समाजात टिकून आहे तोपर्यंत माझ्यासारख्या व्यक्तींच्या अशा छोट्या मोठ्या चुकांना क्षमा आहे.

अशाप्रकारे बराच काळ समाजाच्या सद्भावनेचे परिशीलन आणि विचारमंथन करून झाल्यानंतर मग मी थोडीशी भानावर आले आणि गेल्या चार-पाच महिन्यांचा एक चित्रपट माझ्या डोळ्यासमोर सरकू लागला. याची सुरुवात म्हटलं तर जानेवारी 1974 मध्ये कधीतरी झाली. त्या दिवशी माझा आयएस च्या लेखी परीक्षेचा निकाल लागून मी त्यामध्ये उत्तीर्ण आहे असे कळले होते. आता एप्रिल महिन्यापर्यंत कधीतरी मौखिक इंटरव्यू होणार आणि त्यानंतर सिलेक्शन झाल्यास जुलै मध्ये एक वर्षाच्या ट्रेनिंग साठी मसुरीला जावं लागणार एवढी माहिती होती. साधारण त्याच सुमारास माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू होऊन लग्न ठरलं देखील. मे महिन्यात लग्न करायचं ठरल्यावर मी पुन्हा एकदा पटना येथे माझ्या पीएचडीच्या कामासाठी परत गेले आणि श्री प्रकाशराव कलकत्ता येथे त्यांच्या फिलिप्स मधील नोकरीत हजर झाले.

आम्हाला कुणालाच आयएएस ची नोकरी म्हणजे नेमकं काय असतं याची फारशी कल्पना नव्हती. मात्र एखादं राज्य काडर म्हणून अलॉट केलं जातं एवढी माहिती होती. माझे भावी सासू-सासरे यांनी तू आयएएस झालीस आणि महाराष्ट्रात आलीस तर आम्हाला फार आनंद होईल असं सांगितलं होतं. लग्नानंतर खूप महिन्यांनी एकदा माझ्या सासूबाईंनी गुपित उघड केलं की लग्न ठरल्यापासून तर प्रत्यक्ष मी मसुरीला जाईपर्यंत मला या परीक्षेत यश मिळून आयएएस ची नोकरी मिळावी यासाठी माझ्या सासऱ्यांनी गुरुवारचे उपास धरले होते. तसंच इकडे माझ्या आईने देखील शनिवारचा उपास धरलेला होता. शी कित्येकांची पुण्याई म्हणूया आणि माझे जे काही झाले असतील ते प्रयत्न म्हणूया. एप्रिल महिन्यात माझा इंटरव्यू बऱ्यापैकी झाला आणि जूनच्या शेवटी कधीतरी मी यएए मध्ये उत्तीर्ण झाले आहे अशी बातमी कळली.

माझे जन्मगांव धरणगाव, जिल्हा जळगांव. तिथून माझे वडील नोकरीनिमित्त बिहारमधे गेले असल्याने माझं शिक्षण बिहारमधून झालेलं, व आयएएसची परीक्षा देखील मी पटना सेंटरमधून दिली होती. त्या काळी महाराष्ट्रातून फार कमी मंडळी या परीक्षेला बसत आणि एकूण देशातच मुलींनी आयएएस मधे येण्याचं प्रमाण खूप कमी होतं. जळगाव जिल्ह्यातून ही परीक्षा उत्तीर्ण होणारी मीच पहिली कॅंडिडेट होते. निकाल लागला तेंव्हा महाराष्ट्रात महसूल मंत्री असलेले श्री मधुकरराव चौधरी यांनी माझ्या वडिलांचा पत्ता शोधून दरभंगा येथे टेलिग्राम पाठवला होता आणि आपली खानदेशी मुलगी यएए मध्ये आली आहे याचा आनंद व्यक्त करत माझ्या वडिलांचे अभिनंदन केले होते. तो गुलाबी रंगाचा छोटासा टेलिग्रामचा कागद माझ्या वडिलांनी पुढे कित्येक वर्ष जपून ठेवलेला होता आमचं लग्न मे महिन्यामध्ये झालं तोपर्यंत निकाल लागलेला नव्हता. लग्नानंतर आम्ही दोघं कलकत्ता येथे गेलो. तिथल्या महाराष्ट्र मंडळात माझ्या ओळखीपाळखी, खरेदी इत्यादि सुरू असतानाच मी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची बातमी समजली. मग मात्र माझी धावाधाव सुरू झाली. कारण मला आई-वडिलांकडे दरभंगा येथे जाणं गरजेचं होतं. माझं बरंसं सामान तिथूनच घ्यायचं होतं. पटना येथे जाऊन युनिव्हर्सिटीतील बरेच कागदपत्रांची पूर्तता करायची, हॉस्टेलमधलं माझं सामान गुंडाळून दरभंगा येथे आणून ठेवायचं, त्यातील मसुरी साठी लागणारे सामान निवडायचं, बँक अकाउंट बंद करायचे इत्यादी कित्येक लहानसहान गोष्टी होत्या. अध्यापक व मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होत्या. मी लगबगीने कलकत्त्याहून पटना येथे आले. तिथेच मी फिजिक्समधे एमएससी पूर्ण करून पीएचडीसाठी रजिस्ट्रेशन करून प्रयोगांना सुरुवात केली होती. मायक्रोवेव्ह प्रोपोगेशन थ्रू मेटल-ब्लेंडेड ग्लासेस असा माझा विषय होता. तसेच मगध महिला कॉलेज इथे फिजिक्स विषयात लेक्चरर म्हणून काम करत होते. त्याच कॉलेजच्या लेडीज होस्टेलला मी असिस्टंट रेक्टर म्हणूनही काम पाहत होते त्यामुळे माझे निम्मे समान त्या हॉस्टेलला तर निम्मे समान पटना युनिव्हर्सिटीच्या माझ्या होस्टेलमध्ये जिथे मी 1968 पासून वास्तव्य केलेले होते. आता मला पटना युनिव्हर्सिटी मधून पीएचडी साठी केलेले रजिस्ट्रेशन रद्द करून घेऊन त्यांचे नो ऑब्जेक्शन घ्यायचे होते. एका बाबतीत त्यांचा दिलखुलासपणा व दूरदर्शीपणा म्हणावा लागेल. मला भारतातील अशा कित्येक संस्था माहित आहेत की त्यांची स्कॉलरशिप दिली जात असेल तर अशा प्रकारे मध्येच आपले पीएचडीचे काम सोडून जाताना आधी उचललेली स्कॉलरशिप ची रक्कम परत करावी लागते. पटना युनिव्हर्सिटी मध्येही इतर सर्व प्रकारच्या नोकऱ्यांसाठी हा नियम लागू होता मात्र त्यांनी विचारपूर्वक यूपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अपवाद केला होता की ती परीक्षा पास झाल्यास व पीएचडीचे काम सोडून तुम्हाला त्या नोकरीत जायचे असल्यास दिलेली स्कॉलरशिप परत न घेता तुम्हाला पीएचडीचे काम थांबवण्याची रीतसर परवानगी पटना युनिव्हर्सिटी देत असे. त्याचा फायदा फक्त मलाच असं नाही तर त्याच वर्षी माझ्याबरोबर उत्तीर्ण झालेल्या अजूनही दोन-तीन विद्यार्थ्यांना मिळाला होता. पटना युनिव्हर्सिटीच्या मते त्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आयएएस मध्ये येणं हा एक मानाचा विषय होता, आणि त्यांच्यापैकी जे विद्यार्थी बिहार काडरला येतील किंवा पुढे मागे दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या नोकरीत असतील त्याचा उपयोग युनिव्हर्सिटी ऍडमिनिस्ट्रेशनला नक्की होतो या धारणेतून पटना युनिव्हर्सिटीची तशी व्यवस्था होती. मी या घटनेचे एवढे विश्लेषण करण्यामध्ये माझा उद्देश एवढाच आहे की समाजामध्ये ज्या चांगल्या पद्धती चांगल्या व्यवस्था त्याकाळी चालू होत्या त्यांचा उपयोग माझ्या आयएस मध्ये येण्यासाठी कसा झाला हे समजावे. सामाजिक चांगुलपणाचा हा विषय माझ्या मनात कायम चालू असतो. आपल्याला याची परतफेड करणे जमलं पाहिजे, समाजासाठी आपणही काहीतरी चांगलं केलं पाहिजे. समाजाच्या चांगूपणामुळे आपण ह्या नोकरीत येऊन यश, कीर्ती इत्यादी संपादन केलेले आहे ही जाणीव आपण कधीही विसरता कामा नये असं मला वाटतं. सो. तर याप्रमाणे पटना येथील सर्व आवराआवरी करून मी दरभंगा येथे आई-वडिलांकडे आले. मग आपल्याला मसुरी वर्षभरासाठी काय काय सामान लागेल त्याची यादी, त्याची जुळवा जुळवी वगैरे गोष्टी सुरू झाल्या.

पण ज्याची खूप आतुरतेने वाट पाहत होतो ते यूपीएससीचे नियुक्तिपत्र मात्र येत नव्हतं. दरभंगा येथे पोस्टिंग असलेले दोन-तीन आयएएस अधिकारी माझ्या वडिलांकडे कायम येत जात असत. याची तीन कारणे - एकतर माझे वडील ज्योतिष शास्त्रात अतिशय निष्णात होते व भविष्य जाणण्यास उत्सुक व्यक्तिंचा त्याच्याकडे ओढा असे. ते संस्कृत व फिलोसॉफीचे विद्वान असून त्यांच्याकडे मोठा ग्रंथभांडारही होता. त्या औत्सुक्यापोटी काही अधिकारी आमच्याकडे येत. तिसरे कारण म्हणजे त्या उत्तर बिहारच्या संपूर्ण परिसरात दक्षिण भारतीय अशी आमची एकमेव फॅमिली होती आणि बरेच वर्षापासून होती. त्यामुळे त्या भागात नोकरीनिमित्त येणारे सर्वच महाराष्ट्रीयन, गुजराती, तमिळ, तेलगू कानडी, मल्याळी अशी दक्षिण भारतीय मंडळी हक्काने आमच्या घरी येत असत. दरभंगा येथे एयरफोर्सचा मोठा बेस होता व वरिष्ठ अधिकारी तिथे येत. दरभंगा मेडिकल कॉलेज हे त्याकाळी अतिशय प्रसिद्ध व प्रथियश असे मेडिकल कॉलेज होते. तिथे शिकायला येणाऱ्या मुलामुलींसाठी माझे वडीलच लोकल गार्डियन असत. अशाप्रकारे माझ्या वडिलांचा मोठा जनसंपर्क होता. त्याचा उपयोग इथे झाला. श्री अडिगे नावाचे एक वरिष्ठ अधिकारी माझ्या वडिलांना म्हणाले की यूपीएससीचे पत्र येण्याची वाट पाहू नका कारण एका ठराविक दिवशी तुम्ही मसुरीला हजर असणे आणि जॉईन होणं हे गरजेचं असतं, त्यात उशीर झाला तर पुष्कळ त्रास होऊ शकतो. त्यांच्या सूचनेवरून माझा धाकटा भाऊ तातडीने दिल्लीला आला, यूपीएससीचे ऑफिस गाठले, माझे अपॉइंटमेंट लेटरची प्रत मिळवली आणि वडिलांना तार केली की दीदीला लगेचच दिल्लीला रवाना करा - 14 जुलैला मसूरी मध्ये जॉइन होण्याची गरज आहे.

ही तार बहुधा आठ किंवा नऊ जुलैला आमच्या हातात पडली. मग तातडीने माझ्या जाण्याचा रूट ठरला. त्याकाळी रेल्वे रिझर्वेशनला फारसा त्रास होत नसे आणि रिझर्वेशन न मिळाले तरी लांबचा रेल्वे प्रवास करताना जागा मिळायची फारशी मारामारी होत नसे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी निघण्याचा प्लान ठरला. दरभंगा येथून रेल्वेने जवळचेच समस्तीपुर हे मोठे जंक्शन गाठणे. तिथून लखनऊ आणि लखनऊहून दिल्ली असा प्रवासाचा मार्ग ठरला. वडील आणि त्यांचे दोन-तीन विद्यार्थी मला पोचवण्यासाठी समस्तीपुर पर्यंत आले आणि मला लखनऊच्या गाडीत बसवून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी ती गाडी लखनऊला पोहोचणार होती आणि दुपारी बाराच्या सुमारास लखनऊ-दिल्ली गाडी घ्यायची होती. समस्तीपुर स्टेशनवरच वडिलांनी मला वर्षभरासाठी म्हणून जो काही उपदेश द्यायचा तो देऊन झाला आणि गाडी रवाना झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी लखनऊ स्टेशनवर उतरले. तिथे स्टेशनच्या प्रतीक्षालयातच आंघोळ इत्यादी उरकून घेतली. त्या काळात स्टेशन्स स्वच्छ चांगल्या कंडीशन मध्ये असत. स्टेशनवर अल्प किमतीत उत्तम पुरी भाजीचा नाश्ता मिळत असे त्यामुळे त्या दृष्टीने कुठलीही अडचण नव्हती. तसेच बिहारमधील एकंदरीत बिघडलेल्या परीक्षा वेळापत्रकांमुळे दरभंगा ते जळगाव असा लांबचा रेल्वे प्रवास एकटीने करण्याची सवयही मला मागील चार-पाच वर्षात लागलेली होती. त्यामुळे त्या दृष्टीने कोणालाही काळजी नव्हती. पण लखनऊ स्टेशनवर वरील घटना घडली ती मात्र अनपेक्षित होती हे निश्चित. अशा सर्व घटना आठवत कधीतरी मी निद्राधीन झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी दिली स्टेशनवर भाऊ होताच, आणि त्याच्या हातात माझे नियुक्तिपत्र होते. स्टेशनवरूनच आम्ही दरभंगा येथे वडिलांना, कलकत्त्याला प्रकाशकडे व मुंबईला सासऱ्यांकडे निरोप कळवला. अशा प्रकारे मसुरीला जाऊन ट्रेनिंग घेण्याचा आणि पुढे मोठे अधिकारपद येण्याचा माझा मार्ग प्रशस्त झाला.


No comments:

Post a Comment