Sunday, October 6, 2024
Sunday, June 2, 2024
6 जबलपूर मधील शालेय जीवन - लेखमाला मिळून साऱ्याजणी
लेखमालेतील लेख क्र 6
words 1200
लीना मेहेंदळे 9869039054
जबलपूर मधील शालेय जीवन
माझे आजोबा, वडील व मी स्वतः धरणगावकर, म्हणजे आमचा जन्म तिथे झालेला. आजोबा पंचक्रोशीत हुशार नावाजलेले व त्यांच्या काळातील व्हर्नाक्यूलर फायनल ही मानाची परीक्षा पास होऊन काही काळ तिथल्याच शाळेत गणित शिक्षक म्हणून वावरले. त्यांच्या हृद्य आठवणी पुन्हा कधीतरी. वडिलांचे शिक्षण धरणगाव, अमळनेर, पुणे, नाशिक, लोणावळा, मुंबई असे झाले होते. संस्कृत, मराठी व तत्त्वज्ञान या विषयांत एमए आणि वेदांत फिलॉसफीवर पीएचडी. आई देवरुखची. तिचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण देवरुखला झाले. लग्नानंतर नागपूर येथील एसएनडीटी विद्यापीठातून प्रायव्हेट परीक्षा देत तिने बीएपर्यंतच्या परीक्षा पूर्ण केल्या. वडिलांना सुरुवातीला नोकरीसाठी बरेच भटकावे लागले, त्यामुळे मला शाळेत घातले नव्हते. आई व आजोबा माझा अभ्यास घेत – म्हणजे अक्षरलेखन, पाढे, तोंडी गणितं, आणि वर्तमानपत्राचे ढोबळ वाचन.
मी सात वर्षाची असताना 1957 च्या आरंभी वडिलांना जबलपूरच्या हितकारणी कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरी लागली. आम्ही सर्व म्हणजे नाना (आजोबा), आई - दादा, मी, पाठची दोन भावंडं छाया, सतीश, आणि धाकटया आतेची मुलगी मंगल असे आम्ही सर्व जबलपुरला आलो. कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. बाजपेयी त्यांच्या स्वत:च्या मोठया घरांत एकटेच रहात - तिथलाच खालचा मजला आम्ही भाडयाने घेतला. शिवाय त्यांचे जेवणही आईने बनवायचे असेही ठरले. तेंव्हा पहिल्यांदा आम्ही कच्ची रसोई, पक्की रसोई हा प्रकार पाहिला. आम्ही ब्राह्मण आणि डॉ.बाजपेयी हे ही ब्राह्मण- म्हणून तर ते आईच्या हातचा स्वैंपाक खाऊ शकत होते. पण त्याच्या मते ते अधिक उच्च ब्राह्मण होते - कांदा-लसूण न खाणारे - कान्यकुब्ज (कन्नौजी) ब्राह्मण. त्यामुळे आईला त्यांच्याकरता ``पक्की रसाई`` बनवावी लागे - म्हणजे कांय तर स्पैंपाकात कुठेही पाणी वापरायचे नाही- त्या ऐवजी दूध वापरायचे. भात शिजवायल दूध, कणीक भिजवायला पण दूध. भाजी तेलांत नाही तर तुपावर करायची. पण आई ती सर्व पथ्य सांभाळत असे. अशा प्रकारे घरांत दोन वृद्घ माणसं आणि चार मुलं पण आईने मला कधीच घरातल्या कामाला लावलं नाही, मी स्वत: करीन तेवढेच. मला पण गोष्टीची पुस्तकं आणि बाहेरचे खेळ यातून मधेच आठवण होई - मग मी कांहीतरी काम करून आपण आईला मदत केल्याचे समाधान मानत असे.
घर लागल्यानंतर लगेचच दादा मला जवळच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या मराठी शाळेत घेऊन गेले. त्या काळच्या प्रथेप्रमाणे हेडमास्तरांनी काही तोंडी प्रश्न विचारून माझी पात्रता ठरवली व तिसरीत प्रवेश देत आहोत असे सांगितले. कोणालातरी बोलावून मला तिसरीच्या वर्गात पाठवले. तो दिवस मला खूप स्पष्टपणे आठवतो. मी पाटी पेन्सिल घेऊन तिसरीच्या वर्गात आले. तिथे गणिताचा तास चालू होता. तोंडी गणितांचा. सगळयांनी पाटी जमीनीवर उलटी ठेऊन उभं रहायच - मास्तर सांगतील ते गणित तोंडी सोडवायच - बसा म्हटल की पटकन पाटीवर उत्तर लिहून पुन्हा लगेच उभं रहायच. जो उभ रहाण्याला उशीर करेल त्याला ओरडा. अशी वीस उत्तंर मी लिहिली. परीक्षा किंवा पाटीवर अनुक्रमपूर्वक उत्तर लिहिण्याची शिस्त हे सर्व मला नवीन होत. माझा अनुक्रम चुकला आणि, पन्नास पैकी फक्त सदतीस मार्क पाहून मला रडू कोसळलं. घरी कधीही माझं उत्तर चुकलेलं नव्हत आणि इथे ही नामुष्की ! तेवढयांत मास्तरांनी जाहीर केल - आजच्या परीक्षेत सर्वात जास्त मार्क आहेत सदतीस - कोणाचे मार्क आहेत, त्याने पुढे यावं! मी रडतच पुढे गेले. मास्तर म्हणाले - रडतेस कांय ? सर्वात जास्त बरोबर तुझीच उत्तरं आहेत.
मी म्हटले हो, पण माझी सगळी गणितं बरोबर आहेत, मला 50 पैकी 50 मार्क मिळायला हवेत. मास्तरांनी माझी पाटी पुन्हा तपासली आणि त्यांच्या लक्षात आलं की खरोखरीच माझी सर्व उत्तर बरोबर होती पण अशा परीक्षेची सवय नसल्याने त्यांचे अनुक्रम उलट सुलट लिहिले गेल्याने ती उत्तरे चूक वाटत होती. मास्तरांनी मला हा तपशील सांगितला व पुन्हा अशी चूक करू नकोस, आज तुझी मार्क एवढेच राहतील, पण हुशार आहेस असं बोलून दाखवल. घरी आल्यावर नानांनी हे ऐकल आणि तेंव्हापासून तोंडी गणिताऐवजी मोठी आणि पाटीवर सोडवायची गणित करून घेऊ लागले - हेतू हा की लेखी परीक्षांमधे मी मागे राहू नये.
त्या पहिल्याच दिवशी शाळा संपताना मराठीच्या बाईंनी एक शुद्धलेखनाची वही हातात दिली. तिच्या पहिल्या पानावर पहिल्या ओळीत एक वाक्य लिहिलं होतं - तेच वाक्य सबंध पानभर लिहून आणायला सांगितलं. त्याकाळी लिहायला पेन नसे. शाईची दौत आणि एका बोरुला अडकवलेली नीब मिळत असे. शाईच्या दौतीत नीब बुडवून अक्षरे लिहायची आणि नीबची शाई कोरडी झाली की पुन्हा दौतीत बुडवून लिहायचे. मला हे सगळंच नवीन होतं. त्यामुळे वहीवर शाईचे भरपूर डाग, लेखन शुद्ध पण अक्षर गचाळ असे ते वाक्य आमच्या चांगलंच स्मरणात आहे. गाडी फलट्यावर येऊन थांबली हे ते वाक्य. फलाट म्हणजे प्लॅटफॉर्म हा मराठी अनुवाद मला त्यादिवशी कळला. आमच्या घराच्या मागे अगदी जवळ मदनमहाल रेल्वे स्टेशन होते. तिकडे बोट दाखवून फलाट-फलाट म्हणत आणि फलाट शब्दावर उड्या मारत आम्ही चारी भावंडं भरपूर हसलो होतो.
अक्षर चांगल दिसाव यासाठी एक युक्ति आहे - अस म्हणून बाईंनी पहिल्या दिवशीच एक युक्ती सांगितली होती - अक्षरांच्या सर्व उभ्या रेघा काटेकोर उभ्या आणि आडव्या रेघा अगदी काटेकोर आडव्या काढायच्या - मग अक्षर आपोआप छान दिसतं. पण ही युक्ति शिकायला तशी सोपी नाही. काटेकोर उभ्या आणि आडव्या रेघा काढता येण्यासाठी हाताला ते वळण नीट बसवावं लागतं.
पुढे इतर ब-याच व्यक्तींची हस्ताक्षरं बघून कळल की ज्या व्यक्ती तिरक्या रेघा काढतात, त्यापैकी कांहींचं अक्षर छान दिसत, कारण त्यांच्या रेघा तिरक्या असल्या तरीही आपापसांत समांतर असतात. पण ज्यांच्या रेघा समांतर रहात नाहीत, त्यांच अक्षर चांगलं दिसत नाही. पण बाईंनी युक्ती सांगितल्यामुळे त्यातलं शास्त्र कळलं, एक वेगळी सौंदर्यबुद्घी आली आणी तेंव्हापासून चांगल्या हस्ताक्षराचं मला फार आकर्षण आहे.
त्याच बाईंनी आम्हाला पुस्तक कसं धरावं, कसं वाचावं, हे ही शिकवलं. मोठ्याने इतरांना वाचून दाखवायचे असेल तर वाक्य रचनेप्रमाणे कुठे किती थांबायचं, वाचता वाचता अनावश्यक भाग गाळत कस वाचायचं, पुस्तक बाजूला ठेऊन एखदी गोष्ट सांगायची असेल तेंव्हा त्या योष्टीतील किंवा धडयातील खास खास उल्लेखनीय जागा कशा न विसरता उद्घृत करायच्या वगैरे. पुढे कॉलेजात एका शिक्षकांनी रॅपिड रीडीग कस करायच, त्यासाठी पुस्तक आडव डावीकडून उजवीकडे अस न वाचता वरून खाली, आणि तरीही प्रत्येक रेघेतील महत्वाचे मुद्दे डोळ्यांनी टिपत वाचन कसं करतात ते शिकवल. या अशा बऱ्याच कौशल्याच्या बाबी आहेत - त्यांना मी युक्तीच म्हणते - त्या हल्ली शाळा कॉलेजात फारशा शिकवल्या जात नाहीत.
आजोबांनी मला गणिताची एक युक्ती शिकवली होती. साधारण पणे पाच-सात आकडयांची बेरीज करताना आपण आधी ते आकडे एकाखाली एक आणि एकम् खाली एकम् असे नीट रचून घेतो. पण आजोबांनी मला आडवे लिहिलेले आंकडे असले तरीही त्यांची न चुकता बेरीज करणयाची सवय लावली होती. शिवाय एकाच वेळी कांही आकडे बेरजेचे व काही वजा घालवायचे असतील तरी तेही तिथल्या तिथेच करायला शिकवले.
आईने पाढे शिकवातांना युक्ती केली होती. नेहमीच्या पद्धतीने पाढे पाठ करून घेतले होतेच. पण छोटया छोटया कामांच्या वेळी विचारायची - तिना आठे? पाच साते? सहा चोक? धरणगांवी विहिरीवर धुणी धुतांना तिने माझे पाढे असे पक्के करून घेतले होते..
मी पण मुलांसाठी ही युक्ती वापरली. आमच्या घरात भिंतीवर 9 खणांचे चौकोन चिकटवून ठेवले आहेत. प्रत्येक खणात 3x8, 5x7, 6x2 असे मांडून ठेवलेत. दोन ते दहाच्या पाढ्यांसाठी सात चौकोन आणि अकरा ते वीस साठी आठ चौकोन. मुलांनी रोज दोन्ही गटातील एका-एका चौकोनातील उत्तरे धडाधड सांगून दाखवली पाहिजेत.
जबलपुरच्या शाळेत लवकरच माझी गणना हुशार विद्यार्थिनी म्हणून होऊ लागली. शाळेचे मुख्याध्यापक दाणी सर, त्यांनी एक चांगली पद्धत शाळेत वापरली होती. त्याकाळी शिक्षकांची वानवा असे. पहिली व दुसरीच्या वर्गाना शिकवण्यासाठी दाणी सर चौथी व पाचवीचे हुशार विद्यार्थी पाठवत असत. दुपारची शाळा सहावी ते अकरावी या वर्गांसाठी होती. तिथे दाणी सर दहावी अकरावीच्या मुलांना सहावी व सातवीच्या वर्गांवर शिकवण्यासाठी पाठवत. अशावेळी थोडा वेळ का होईना, त्या त्या वर्गात स्वतः मागे बसत. नंतर कधीतरी बोलावून आमच्या शिकवण्यात काय सुधारणा हवी, कुठे छान केले ते सांगत असत.
मला नेहमीच सांगायला अभिमान वाटतो की अगदी चौथी इयत्तेत असल्यापासून मी शिक्षक म्हणून काम केलेले आहे. असे कितीतरी शिक्षक दाणी सरांनी घडवले आहेत. त्यांच्या या फॉर्मूल्याची मी भक्त आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेला या पद्धतीचा खूप उपयोग होऊ शकतो.
------------------------------------00000000000000000000000000----------------------------------------
5 मी आयुर्वेदाकडे कशी वळले - लेखमाला मिळून साऱ्याजणी
लेखमालेतील लेख क्र 5
words 1472
लीना मेहेंदळे 9869039054
मी आयुर्वेदाकडे कशी वळले
मी अगदी लहान असल्यापासून आमच्या घरी "चांदोबा - लहान मुलांचे मासिक" येत असे. या मासिकाने हजारो मुलांची मन घडवलेली आहेत असं मला वाटतं. एकदा या मासिकात भगवान बुद्धांची पूर्ण जीवनकथा क्रमाक्रमाने प्रकाशित झाली. त्यामध्ये जीवक या एका व्यक्तीचरित्राची ओळख होती. जीवक आपल्या गुरूंकडे आयुर्वेद शिकण्यासाठी राहत असे. तो बरेचदा गुरूंना विचारायचं - गुरुजी माझे शिक्षण पूर्ण झाले असे मला वाटते - तर तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? शेवटी एक दिवस गुरुंनी सांगितले - हे बघ, आपल्या आश्रमापासून दहा कोस परिसरातून अशी वनस्पती शोधून आण जिचे औषधी गुण तुला माहीत नसतील – तीच माझी गुरुदक्षिणा. जीवक अशा वनस्पतीच्या शोधात निघाला. आश्रमा भोवतीचे दहा कोसाचे पूर्ण क्षेत्र त्याने पिंजून काढले आणि शेवटी गुरूंकडे हात हलवत परत आला. म्हणाला - गुरुजी, तुम्हाला गुरुदक्षिणा देण्यासाठी मी समर्थ नाही. कारण मला जिचे गुण माहित नाहीत, अशी एकही वनस्पती सापडली नाही. गुरुजींनी हसून म्हटले, अरे ही तर तुझी व माझी परीक्षा होती. तुला सर्व वनस्पतींची माहिती मी देऊ शकलो आहे ना, याची मला खात्री करायची होती. आता तू जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी अगदी असाध्य रोगांवरही तू उपचार करू शकशील. पुढे भगवान बुद्धांच्या शेवटच्या काळात त्यांना जो काही आजारपणाचा त्रास होत होता त्याचे निवारण करण्यासाठी ते जीवक कडून औषध घेत असत. ही कथा वाचली, तेव्हापासून मला छंद लागला की आपल्या जवळपासच्या वनस्पतींची ओळख करून घ्यायची. म्हणजे जरी त्यांचे मेडिकल गुण कळले नाही तरी निदान त्यांची नावे तरी कळून घेतली पाहिजेत. त्या काळात आणि अजूनही मला शेकडो झाडांची व वनस्पतिंची नावं आणि ओळख मराठी व हिंदीतून माहीत आहेत. त्याकाळी भारतीय भाषा इंग्रजीसमोर एवढ्या अगतिक नव्हत्या की मुलांनी फक्त इंग्रजी भाषेतूनच ज्ञान मिळवलं पाहिजे. त्यामुळे बहुतेकांची इंग्रजी नावे मला माहीत नाहीत, पण त्याने माझे काही अडतही नाही.
हा छंद जडल्यामुळे मोठं होत जाताना मला हळूहळू वनस्पतींचे औषधीय गुणही जाणून घेता आले. पण एखाद्या वनस्पतीचा औषधी गुण माहित असणे आणि प्रत्यक्ष आजार झाल्यावर त्या वनस्पतीचा वापर करून आजार बरा करणे या दोन अतिशय भिन्न गोष्टी आहेत. तरी असा वापर करण्याकडे मी वळले त्याचे कारण इंद्रदेवबाबू झिंदाबाद. आधी त्यांचेच दोन अनुभव इथे मांडत आहे. आम्ही बिहारमध्ये गेल्यानंतर चार सहा महिन्यातच दादांना (वडिलांना) कावीळ झाली. सडकून ताप, पिवळे डोळे, भयंकर थकवा, अशा परिस्थितीत आमच्या फॅमिली डॉक्टरानी त्यांना इंद्रदेवबाबूंकडे नेले. ते आयुर्वेद व होमियोपथीची प्रॅक्टीस करत असत. पण त्यांनी देखील सुरुवातीला स्वतः उपचार न करता दादांना एका कावीळ उतरवणाऱ्या मांत्रिकाकडे नेले. मी स्वतः ही उपचार पद्धती डोळ्यांनी बघू शकले नाही परंतु पुढे दादा सांगत असत. मांत्रिक त्यांच्यासमोर मोठ्या पितळी परातीत पाणी भरून ठेवत असे आणि मंत्रोच्चारासकट त्यांच्या खांद्यावरून हातापर्यंत आणि पाठीवरून खाली तसेच तोंडावरून हात फिरवत असे आणि ते हात परातीच्या पाण्यामध्ये धूत असे. काही वेळानंतर परातीतले पाणी पिवळे पिवळे पडत असे आणि डोळ्यांचा पिवळेपणा व ताप कमी होत असे. हा प्रकार तीन दिवस केल्यानंतर मांत्रिकांनी सांगितले की आता थोडीशी कावीळ उरलेली आहे त्यासाठी आपले डॉक्टर साहेब जो इलाज सांगतील तो करा. दादांचा ताप पूर्णपणे उतरला होता. मग इंद्रदेवबाबूंचे औषध चालू झाले. त्यांनी दादांना पुढील महिनाभर कारल्याचा रस, उसाचा रस आणि लिंबाचा रस घ्यायला लावला व त्यांची कावीळ संपूर्णपणे बरी झाली. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत रोज सकाळी पेलाभर पाण्यात अर्ध लिंबू पिळून ते पाणी पिण्याचा नियम दादांना पाळला.
एकदा दादा छताला लागलेले कोळ्याचे जाळे काढत असताना त्यांच्या हाताने एक कोळी चिरडला गेला. तो त्यांनी साध्या पाण्याने धुवून टाकला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कोपरापासून तर मनगटापर्यंत संपूर्ण हातावर कोळ्याच्या जाळ्यासारखी नक्षी उमटलेली होती. त्यातल्या रेघा अगदी बारीक होत्या पण रंग लाल होता आणि थोडी आग होत होती. दुपार होता होता त्या रेघांची जाडी वाढून आगही जास्त होऊ लागली. भावाने तत्काळ इंद्रदेवबाबूंना बोलवून आणले. त्यांनी दादांच्या हाताची दशा बघितली आणि म्हणाले डॉक्टर साहेब, याचं औषध तर तुमच्या अंगणातच आहे. आमचे दादा डॉक्टरेट असल्याने सर्वजण त्यांना डॉक्टरसाहेब म्हणत. कोणते औषध? अंगणात केळीची झाडं होती. इंद्रदेवबाबूंनी एका झाडाचं एक सोपटं बाजूला केलं आणि जमिनीच्या अगदी लगत बुंध्यात थोडसं पाणी साचलेलं होतं ते चमच्याने एका वाटीत काढून घेतलं. अशीच आठ-दहा सोपटं सोलल्यानंतर वाटीभर पाणी गोळा झालं. त्याच केळीच्या मुळातील माती उकरून त्यां पाण्यांत कालवली आणि त्याचा लेप हातावर उठलेल्या जाळीवर लावून दिला. दादांना चादर लपेटून झोपायला सांगितले. झोपेनंतर यांचा ताप उतरायला हवा, तोपर्यंत मी इथेच थांबतो असं आम्हाला म्हणाले. काही मिनिटातच दादांना झोप लागली. उठले तोपर्यंत आग, लाली व ताप कमी झाले होते. हेच औषध चार दिवस चालू ठेवल्याने हात पूर्ण बरा झाला. अशा कारणाने आम्ही इंद्रदेवबाबूंकडून आयुर्वेद व होमियोपथीची पुस्तकं आणून वाचू लागलो.
होमियोपथीमधे लक्षणांचा व औषधांचा विस्तार खूप आहे. तेवढा अभ्यास कदाचित जमणार नाही, पण त्यामधे बाराक्षार नावाचा मर्यादित बारा औषधांचा एक भाग वेगळा काढून अभ्यासता येतो हे कळल्यावर तेवढा अभ्यास मात्र आम्ही सुरू ठेवला आणि बहुतेक आजारपणावर त्याचाच वापर करतो. आम्ही म्हणजे मी व धाकटा भाऊ.
नववीत असतांना गांधीजींवरील एका धड्यांत गांधींच्या निसर्गोपचाराच्या प्रयोगांबद्दल वाचले. त्यातील मातीचे उपचार, साध्या पाण्याच्या पट्टीचे उपचार हे ही मला त्यांच्या सहज-सोपेपणामुळे भावले. आईच्या आईकडून तिनेही बरीच घरगुती औषधे शिकली होती. खरचटले की झेंडूच्या पानांचा रस, जखम होऊन भरपूर रक्त वहात असेल तर हळद दाबून धरणे, पोटदुखीला ओवा, खोकल्यावर लवंग, पाय मुरगळला तर हळद-बिब्बा-तुरटी हे भारतात सर्वांना माहीत असते. आमच्या घरी त्यांचा वापरही सर्रास होत असे. मोठा आजार असेल तरच डॉक्टर. पुढे माझी धाकटी बहीण रीतसर एमबीबीएस डॉक्टर झाली तेंव्हा तर तिच्या डायग्नोस्टिक स्किल्सचाही लाभ आम्हाला आयता मिळू लागला.
दादा संस्कृत, तत्त्वज्ञान, योग, गीता व ज्योतिष या विषयांत निष्णात होते. ते स्वतः दररोज योगासने, ध्यान आणि जप करीत. आम्हालाही शिकवले होते पण आम्ही यथातथाच. तरीही त्यांच्या ज्ञानाच्या किमान शतांशाने तरी हे विषय मला कळतात. लाभांची प्रचीती तर आम्ही नेहमीच घेत असू. त्यांनी कुंडलीच्या आधारे सांगितलेले भविष्य नेहमीच खरे होताना आम्ही पाहिले. बऱ्याच वर्षानंतर मी विपश्यना ही ध्यान पद्धतीही शिकले. योगासन व ध्यानाबाबत दादा म्हणत – हे बँकेतील रिकरिंग डिपॉझिट सारखे आहे - सातत्याने करत राहिले तर एरवीपेक्षा कितीतरी अधिक व्याज – आणि काही काळानंतर तुम्ही मधे-मधे मोठी रकम काढू शकता. तसेच आसने-ध्यान इत्यादी मूळतः भविष्यकाळातील स्वास्थ्यासाठी असतात. सुरुवात केली आणि चार दिवसात फायदा दिसला अस होत नाही म्हणूनच लोक निरुत्साही होतात. पण आपण जाणीवपूर्वक सातत्य टिकवाव. दादांनी फिजिक्सचीही गोडी लावली होती. त्यात मात्र मी नैपुण्य मिळवल. एकदा मी त्यांना विचारले की फिजिक्स आणि ज्योतिष यांची सांगड कशी घालता. ते म्हणाले - दोन्ही मधे प्रयोग करत रहाणे, तर्कशुद्धता आणि एम्पीरीकल एविडन्स महत्वाचे आहेत. ते मी लक्षात ठेवले.
लग्नानंतर पाहिले की माझे सासरे होमियोपथीचे चांगले जाणकार आहेत. एक नणंद व त्यांचे यजमान रेल्वेत उच्च पदस्थ डॉक्टर. त्यांची तीनही मुलं शाळा नसली की सासूबाईंकडेच येत. त्यांच्या सर्व आजारांना औषध होमियोचे. माझ्याही गरोदरपणांत त्रास न व्हावा म्हणून त्यांची औषधे घेतलीत. त्यांच्याकडील बाराक्षारावरील एक ग्रंथराज माझ्या वाट्याला आला. मुलांच्या लहान वयात मीच बाराक्षाराची औषधे देऊ लागले. आमच्या बागेत तुळस, झेंडू, पारिजात, बेल, ब्राह्मी, गुळवेल, कोरफड, गवती चहा, पुदीना इत्यादी कायम असतात व ते आम्ही प्रतिरोधक व शामक या दोन्हींसाठी वापरतो. जिथे क्रिटिकॅलिटी नसेल तिथे प्रयोग करून पहायचा, काही अडलच तर बहिणीचे ज्ञान मदतीला आहेच हा आमचा साधा नियम. तिचे स्वतःचे मलेरियाचे दर तीन-चार महिन्यांनी होणारे इन्फेक्शन बाराक्षार औषधाने कायमपणे बरे झाले. पण मुळात ती ते घ्यायला कशी तयार झाली तोही एक किस्साच आहे. एका रात्री ती व मी अशा दोघी एकट्याच घरी असताना तिला अचानक शिवरिंग आणि चढता ताप सुरू झाले. त्या दिवसात पुण्यात जक्कल हत्याकांडातील हत्यांमुळे सायंकाळी सातनंतर सगळीकडे चिडीचूप व्हायचे. बाहेर पडायची सोय नाही आणि दुकानेही बंदच असणार. अशा वेळी आम्ही त्या बाराक्षार ग्रंथातील मलेरिया हे प्रकरण वाचून त्याप्रमाणे औषधे घेतली आणि ती लागू पडली. तीच कायम ठेवल्याने तिचा रिकरिंग मलेरियादेखील बरा झाला.
मी नोकरीनिमित्त पुण्यात आले ती आयएएस अशी भारदस्त ओळख घेऊन. त्यामुळे श्री नानल वैद्य व श्री खडीवाले वैद्य यांना चर्चेसाठी सहजपणे भेटता येत असे. त्यांच्यासोबत आयुर्वेदाची बलस्थाने, रिसर्चची कमतरता, सरकारी मान्यता व धोरणांचा अभाव, वैद्यांमधे शोधक वृत्ति आणि पारदर्शिता नसणे, आधुनिक काळानुरूप प्रयोग किंवा शोध करण्यावर सरकारी निर्बंध इत्यादी चर्चा होत असत. पुस्तके तर खूप पहायला मिळाली. माधवनिदान या जाडजूड ग्रंथावर भाष्य करणारा एक इंग्लिश भाषेतील तितकाच जाड ग्रंथ पाहिला. त्याच्या प्रस्तावनेत तो युरोपीय लेखक म्हणतो की त्याने इतर आयुर्वैद्यांच्या मदतीने माधवनिदान या ग्रंथाचा अभ्यास अठरा वर्ष केला असून त्याला यावर चार भागात लिखाण करायचे आहे व त्यापैकी हा पहिला भाग आता सिद्ध झाला आहे. माझ्या मते ही तर शुद्ध तपश्चर्याच आहे. एवढी तपश्चर्या करण्याचे सामर्थ्य आज आपला समाज हरवून बसला आहे का अशी कधी कधी निराशाही वाटते.
आयुर्वेदात अन्न तयार करताना काय व कसे करावे आणि ते कसे व कधी खावे याला खूप महत्व आहे. त्याबाबत एक छोटा किस्सा. एकदा मला मुळव्याधीचा त्रास सुरू झाला. आयुर्वेदात यावर पेरू हे औषध सांगतात. पेरु माझे आवडते फळ - त्यात हिरवा कुर्रकुर्र वाजत खायचा तर फारच मजा. पण त्याने त्रास वाढला. मग ताक हे औषध वापरले. एका पुस्तकात वर्णन होते - सामान्यपणे आपण घेतो त्या ताकात पाचपट पाणी मिसळून तेवढे पातळ ताक घ्यावे. त्याने त्रास आटोक्यात आला. पेरुचा प्रयोग फसला - त्याविषयी खडीवाले वैद्यांना विचारले. ते म्हणाले अहो, औषध म्हणून खायचा असेल तर पिवळा छान पिकलेला खायचा असतो. एरवीदेखील लक्षात ठेवा- फळे, भाज्या, धान्य, हे उत्तम पिकवून मगच खायचे असते.
यावरून आठवले. दादा सांगत- आपल्याकडे खूपसारे ज्ञान सूत्ररूपाने मांडून ठेवले आहे, ते पाठ करून ठेवता यावे म्हणून. एखादा अनुभवसंपन्न योग्य गुरू ते सूत्र फोड करून सांगतो तेंव्हा ते शिकले जाते. व तेच आचरणात आणले की सिद्ध होते. या व्याख्येनुसार मला आयुर्वेद सिद्ध होण्यास बराच काळ लागेल. पण माहिती घेत राहिल्याने निदान सुरुवात तर झालेली आहे. याचा पोस्टिंगमधे कसा फायदा झाला तो किस्सा पुढे कधीतरी.
------------------------------------00000000000000000000000000----------------------------------------
4 माझी भाषात्मक जडण घडण - लेखमाला मिळून साऱ्याजणी
लेखमालेतील लेख क्र 4
लीना मेहेंदळे 9869039054
(सुमारे 1300 शब्द)
माझी भाषात्मक जडण घडण
माझा जन्म धरणगाव या एका सी क्लास मुन्सिपलिटी असलेल्या गावात झाला, म्हणजे म्हटलं तर अगदी ग्रामीण भागही नाही, पण म्हटलं तर पुणे-मुंबई-जळगाव इतकं मोठं शहरही नाही. तिथे एक चांगली बाजारपेठ होती. विणकर समाजाचं मोठ्या संख्येने वास्तव्य असल्यामुळे लुगडी सतरंज्या इत्यादी हाताने विणलेल्या पण सौंदर्यपूर्ण कापडांचे उत्पादन तिथे होत असे. आजूबाजूच्या बऱ्याच खेडेगावातून तिथे विक्रीसाठी शेतकरी आपापला शेतमाल घेऊन येत असत. इथे आठवडा बाजार होताच शिवाय दररोजच्या बाजारासाठी सुद्धा एक विशिष्ट जागा मुक्रर केली होती. तिथे अगदी सिमेंटचे चौकोन, दुकानांचे व्यवस्थित गाळे म्हणजे एक आखीव रेखीव मार्केट यार्ड असल्यासारखीच इत्यादी रचना होती.
आमची घरातील भाषा मराठी असली तरी खेडोपाडची जी मंडळी गावात किंवा घरी येत असत त्यांची संपर्क भाषा अहिराणी कानावर पडून शिकली गेली. आजोबांची लाकडाची वखार होती त्या व्यापारा निमित्त त्यांना भारतात बरेच लांब लांब फिरावे लागत असे. त्यांना हिंदी गुजराती उत्तम प्रकारे बोलता येत असत. त्यांच्यामुळे वडिलांना देखील या भाषांची गोडी लागलेली होती. वडिलांचे शिक्षण नाशिक पुणे मुंबई असे झालेले होते. विषय होते, संस्कृत मराठी व तत्वज्ञान. त्यामुळे संस्कृत सोबतच त्यांना मराठी व इंग्लिश देखील उत्तम अवगत होत्या.
मी सात वर्षाची असताना वडिलांना जबलपूर येथील हितकारिणी कॉलेजमध्ये संस्कृत प्रोफेसरची नोकरी मिळाली व आम्ही मध्य प्रदेशात आलो. जबलपूर मध्ये मराठी व हिंदी भाषिक लोकसंख्या जवळ जवळ 50 -50 टक्के अशा होत्या. तिथे माझी शाळा मराठीच होती पण आजूबाजूच्या वातावरणांत हिंदी सहजपणे येऊ लागली. माझ्या वयाच्या नवव्या वर्षी वडिलांना मिथिला संस्कृत रिसर्च इन्स्टिट्यूट दरभंगा या उत्तर बिहार मधील व नेपाळच्या बॉर्डरवर असलेल्या मोठ्या शहरात सरकारी नोकरी मिळाली व आम्ही तिकडे रवाना झालो. इथे जनभाषा हिंदी व मैथिली. शाळेत मोठ्या प्रमाणावर बंगाली मुली देखील होत्या. त्यामुळे आम्हाला हिंदी सोबत मैथिली व बंगाली भाषा देखील शिकायला मिळाली. शाळेच्या पुस्तकांमध्ये मैथिल कवी विद्यापती, बंगाली कवी रवींद्रनाथ, अवधी भाषेचे कवी तुलसीदास, व्रजभाषेचे कवि सूरदास अशांच्या कविता असल्यामुळे व आईने कविता पाठ करायची सवय लावल्यामुळे त्या भाषा देखील व्यवस्थित समजू लागल्या.
कधीतरी आमच्या घरी पहिला ट्रान्झिस्टर विकत घेतला गेला तेंव्हा आईला नेपाळी बातम्या ऐकायची गोडी लागली आणि आमच्या कानावर नेपाळी देखील पडू लागली. वडिलांच्या इन्स्टिट्यूट मधील बरेच प्रोफेसर आपापसात बोलताना सहजगत्या व अस्खलितपणे संस्कृत भाषेचा वापर करीत असत त्यामुळे बोलचालीची संस्कृत देखील कानावर पडत राहिली. अशा प्रकारे माझ्या भाषाज्ञानाचा विस्तार होत गेला
आम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दरभंगा ते धरणगाव असा सुमारे दोन हजार किलोमीटर पेक्षा अधिक अंतराचा रेल्वेने प्रवास करून सुट्टीसाठी धरणगाव येथे येत असू. त्यावेळी चुलत भावंडांची शाळेची पुस्तके वाचून काढणे हा आवडता छंद असल्यामुळे किती एक मराठी कविता देखील तोंडपाठ असत. आणखी महत्वाची बाब अशी की रेल्वे प्रवासात बिहार मधील मोकामा हे जंक्शन सोडल्यानंतर पुढे उत्तर प्रदेश मधील प्रयाग, मुगलसराय अशी मोठी स्टेशन घेत, पुढे जबलपूर इटारसी अशी मध्य प्रदेशातील स्टेशने नंतर भुसावळ जळगाव धरणगाव असा महाराष्ट्रातील प्रवास होत असे. या सर्व मोठ्या स्टेशन्सवर जी भाषा ऐकायला मिळत असे ती मूळ हिंदीरूपीच असली तरी एकमेकींपेक्षा थोडी तरी वेगळी असायची. हळूहळू मला बोलणाऱ्याच्या भाषेवरून तो तो जिल्हा किंवा प्रांत कोणता असेल हे ओळखायची सवय लागली. अगदी नेपाळीतही काठमांडूची नेपाळी व पोखरा या पश्चिमी जिल्ह्याची वेगळी नेपाळी मला कानांना जाणवते. अशा पंचक्रोशीवार बदलत्या रूपांचा उत्तम वापर करणारे गोनीदा हे मराठीतील माझे आदर्श आहेत. असो.
आता सीन बदलून मसूरीच्या लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये येऊ या. मी आयएएसच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशिक्षणासाठी इथे आले. माझी 1974 ची बॅच. जुलैपासून सुरुवातीचे चार महिने यूपीएससी पास झालेल्या सर्व प्रकारच्या सर्विसेस मधील सर्व म्हणजे सुमारे 1200 मुलं एकत्रपणे मसुरीला ट्रेनिंग साठी बोलवली जात असत. दिवाळी सुट्टीनंतर त्यांना त्यांच्या त्यांच्या सर्विस प्रमाणे त्यांच्या स्पेशलिस्ट अकॅडमी मध्ये पाठवले जात असे. उदाहरणार्थ पोलीस सर्विस साठी हैदराबादला, इन्कम टॅक्स साठी नागपूरला, फॉरेन सर्व्हिस साठी दिल्लीला, फॉरेस्टसाठी देहरादूनला. वगैरे. पुढील सहा महिने शिल्लक राहात फक्त आयएएस प्रशिक्षणार्थी.
अकादमीचे डायरेक्टर श्री राजेश्वर प्रसाद अतिशय कर्मठ होते. एकेकाळी त्यांनी लालबहादूर शास्त्रीचे सोबत काम केलेले होते, व त्या आठवणी नेहमी सांगत. सर्व प्रशिक्षणार्थी मंडळींना भारत, व इथले उत्सव परंपरा यांची नेमकी जाणीव व्हावी, हा देखील ट्रेनिंगचा एक भाग होता. डायरेक्टर स्वतः या गोष्टीकडे जास्ती उत्साहाने लक्ष देत. मसूरीला पोचल्यानंतर लगेचच येणारा मोठा उत्सव म्हणजे 15 ऑगस्ट. या दिवशीच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक राज्यातील मंडळींनी त्यांच्या त्यांच्या भाषेतील राष्ट्रगीत म्हणावे असे ठरले आणि प्रत्येकाला कोणत्या तरी एका भाषेसाठी आपले नाव नोंदवा असे सांगण्यात आले.
मी माझ्या शिक्षकांना सांगितले मला मराठी हिंदी बंगाली तीनही भाषा उत्तम येतात आणि मला सगळीकडे गायचे संधी मिळाली पाहिजे. ते म्हणाले नाही, एकच भाषा निवड आणि मी तर म्हणेन की मराठी भाषा येणारी मुल नाहीतच त्यामुळे तू मराठी गटातच सामील हो, तयारीपण तूच करून घे. आम्ही श्री सावरकरांचे जयोस्तुते श्रीमहन्मंगले हे गाणे निवडले, पण इतर आवडती हिंदी व बंगाली राष्ट्रगीते म्हणण्याची संधि उगीचच बुडाली असे वाटत राहिले.
त्यानंतर एकदा ट्रेनिंगचा भाग म्हणून एक मॉक जनगणना घेण्यास सांगण्यात आले. त्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या भाषेचे नाव नोंदवायचे होते व त्यासाठी एकच बॉक्स होता. मला हे पुन्हा खटवलं. एखाद्या भाषेतील मुलं जास्त असतील किंवा कमी असतील त्यावरून काही बरावाईट निष्कर्ष काढू नये हे खरं. परंतु मला मात्र कुठेतरी त्या संख्याशक्तीची जाणीव झाली असं म्हणता येईल. आणि मला असं प्रश्न पडला की मला जर उत्तम मराठीसोबत बंगाली व हिंदी याही भाषा येतात तर तिन्ही भाषांचे संख्याबळ दाखवण्यासाठी माझ्या या ज्ञानाचा फायदा का नाही करून द्यायचा? यासाठी त्या त्या भाषेतील विद्यार्थ्यांची गणना होत असताना हे गणित वेगळ्या प्रकारे मांडायला हवं. तुमची भाषा कोणती याचं उत्तर मिळवताना तुम्हाला एकच भाषा येते व तुम्ही फक्त तिचाच उल्लेख करणार असं गृहीत धरलेलं होतं. त्याऐवजी तुम्हाला किती भाषा येतात आणि त्या कोणत्या असा प्रश्न विचारला असता तर माझ्या भाषाज्ञानाचा उपयोग जसा मराठी भाषेचे संख्याबळ वाढवण्यासाठी होतो तसंच हिंदी व बंगालीसाठीही झाला असता अशी कल्पना मनात येऊन गेली. आपल्याकडील खऱ्या जनगणनेतही अजून असा प्रश्न विचारला जात नाही. फक्त आता तुम्ही 3 भाषा नोंदवू शकता ज्यामधे दुसऱ्या क्रमांकावर इंग्रजीची आणि तिसरीवर झालीच तर हिंदीची नोंद होते. मग कधीतरी मी विकिपीडिया सारख्या प्लॅटफॉर्मवर डोकावते. त्यामधे जगातील तीन मोठ्या लोकसंख्येच्या भाषा दिल्या असतात. इंग्लिश बोलणाऱ्यांची संख्या 150 कोटी, चिनी-मंडारिन भाषेची लोकसंख्या 110 कोटी आणि हिंदी भाषेची लोकसंख्या फक्त 60 कोटी दाखवली जाते. तेव्हा आपण भारतीय म्हणून या स्टॅटिस्टिक्सचे पितळ उघड करू शकत नाही याची खंत जाणवते. कारण इंग्लिश बोलणाऱ्या 150 कोटी मधे भारत-पाक-बांङ्गलादेश मिळून 55 कोटी, ज्यांची घोषित राष्ट्रभाषा इंग्लिश आहे असे 4 देश मिळून 55 कोटी आणि जगातील इतर सर्व देश मिळून 40 कोटी अशी फोड आहे. याउलट भारताच्या एकूण 150 कोटीपैकी ज्यांची मातृभाषा मराठी मल्याळी बंगाली कानडी इ इ आहेत ती सगळी मंडळी बाजूला झाल्यानंतर जी उर्वरित जनता, तिची भाषा हिंदी असा हिशोब केला जातो आणि दुसऱ्या भाषेसाठी इंग्रजी हे उत्तर असल्याने त्याचा वैश्विक लाभ इंग्रजी भाषेला मिळतो. थोडक्यात ज्यांना इतर भारतीय भाषा येतात त्यांना हिंदी येत नाही असे स्टॅटिस्टिक्स आपल्याकडे ऑफिशियली गोळा केले जाते. त्यांना हिंदी येत असली तरी वैश्विक स्तरावर भाषेचा मोठेपणा नोंदवताना त्याची दखल घेतली जाणार नाही असे जे पाश्चिमात्य निकष आहेत ते तसेच स्वीकारल्यामुळे, निव्वळ हिंदीच नाही तरी सर्वच भारतीय भाषांचे नुकसान होते. याच कारणाने संस्कृतची तर दखलच घेतली जात नाही आणि सिब्बल सारखे एकेकाळचे शिक्षणमंत्री त्यांच्या काळात संस्कृतला मृत भाषा म्हणून घोषित करून मोकळे होतात. ज्या भाषेची वर्णमाला, लिपी व व्याकरण इतर भारतीय भाषांना मार्गदर्शन करते तिला मृत भाषा का होऊ द्यायची. इथे मी क ला काना का, क ला एक मात्रा के या पद्धतीच्या अर्थाने लिपी शब्द वापरला आहे, बाकी देवनागरीची कॅलिग्राफी बंगाली किंवा कन्नडपेक्षा वेगळी आहे एवढाच त्या लिप्यांमधील फरक आहे.
जगाच्या पाठीवर हिंदी बोलणारे, किमान हिंदी समजून संवाद करू शकणारे माझ्या मते शंभर कोटीच्या वर तरी आहेत. सर्वसामान्य मराठी गुजराती राजस्थानी मारवाडी या मंडळींना हिंदीतील व्यवहार फारसे कष्ट न घेता करता येण्याइतपत हिंदी नक्कीच येते. इतर भाषिकांमधेही अशी मोठी लोकसंख्या आहे. तरी देखील वैश्विक पातळीवर जो एडवांटेज इंग्लिश किंवा मंडारीन या भाषांना मिळतो तो तितक्या प्रमाणात हिंदीला मिळत नाही व त्यासाठी भारतीय म्हणून आपण आग्रही राहत नाही याची मला खंत वाटते. म्हणूनच जनगणना करताना तुमची मातृभाषा कोणती असा प्रश्न विचारण्याऐवजी तुम्हाला येणाऱ्या भारतीय भाषा कोणकोणत्या असे विचारले, त्यातील प्राविण्याची पातळी 80 टक्केपेक्षा अधिक, 40 ते 80 टक्के आणि 40% खालील अशी वर्गवारी करून जर भारतीय जनगणना केली तर त्याचा मोठा लाभ सर्वच भाषांना मिळेल. त्या शिकण्याकडे लोकांचा कल वाढेल व भारतीय भाषांची एकात्मता त्यातून पुन्हा एकदा झळाळेल. ते झाले तरच भारतीय भाषा टिकतील व वाढतील आणि न झाले तर भाषाज्ञानापाठोपाठ संस्कृतीचा लोपही झपाट्याने होईल. आपण त्या दृष्टीने प्रयत्नशील असावे, भारतीय भाषांमधील शाळा टिकवाव्या, संगणक व आर्टिफिशियल इंटेलिजन्समधे भारतीय भाषांना योग्य स्थान मिळवून द्यावे असा मोठा कर्तव्यपथ आपल्यासमोर वाट पहात आहे.
-----------------------------------0000000000000000------------------------