मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Monday, October 10, 2016

प्रशासकीय़ अनुभव भाग-१ जन्मनक्षत्रावरून नामकरण : व्यवस्था-निर्मितीचे उत्तम उदाहरण :


प्रशासकीय़ अनुभव भाग-
जन्मनक्षत्रावरून नामकरण : व्यवस्था-निर्मितीचे उत्तम उदाहरण.

मी सुमारे चाळीस वर्षे शासनात काम केले. एखादी नवीन योजना, नवा नियम, नवीन व्यवस्था करण्यासाठी शासनात वापरले जाणारे तंत्र आत्मसात केले. ते म्हणजे एखादा GR ( जी आर म्हणजेच शासकीय निर्णय) निर्गमित करणे. असा निर्णय शासकीय यंत्रणेत  सर्वत्र पाठवला जातो आणि तिथून पुढे तो व्यवस्थित राबविला जाईल असे गृहीत धरायचे असते.

पण शेकडो - हजारो वर्षांपूर्वी ही सोय नव्हती. तरीही समाजामधे एखादी व्यवस्था रूढ करण्याचे तंत्र भारतात विकसीत झाले होते. ते तसे होते म्हणूनच ज्ञानविस्तार होत होता. याची खूप उदाहरणं देता येतील. त्यातील एकाचा मी वापरही केला. त्याबद्दल थोडेसे.

भारतात एकेकाळी खगोलशास्त्राचा अभ्यास खूप प्रगत होता. ग्रह-नक्षत्रांचे नामकरण, त्यांच्या गति, त्यांचे जवळ-दूर असणे, यांचे सूक्ष्म ज्ञान तर खगोलशास्त्रज्ञांना होतेच, शिवाय त्यातून फलीत ज्योतिष ही वेगळी शाखाही निर्माण झाली होती व तिचाही सखोल अभ्यास सुरू होता. जन्मकाळाची ग्रहस्थिती कुणावरही प्रभाव  कसा  टाकू शकेल, एखाद्याच्या आयुष्याला  वेगळ वळण कस देऊ शकेल असा प्रश्न खूपशा अंधश्रध्दा निर्मूलन कार्यकर्त्यांना पडत असेल पण मला त्यांत शिरायचे नाही. अस म्हणूया की प्रत्येकाला स्वत:च्या भविष्याबद्दल कांही प्रश्न, कांही स्वप्न असतातच. त्याचा संकेत मिळाला तर हवा असतो. एवढच नाही तर त्या संकेतानुरूप कांही उपाययोजना असेल तर तीही करायला लोकांची तयारी असते. म्हणून मग त्यातील जाणकार या विद्येचा वापर लोकांच्या कल्याणासाठी करू शकतात. कधी कधी त्यांत खोटेपणा किंवा धनलालसा येऊ शकते मग ते शास्त्र किंवा तंत्र दूषित होते. व्यवस्था निर्माण करताना याचाही विचार करावा लागतो. असो.

तर कांही जाणकरांना असे दिसून आले की जन्मकाळाची ग्रहस्थिती कांही ठराविक प्रकाराने माणसाच्या जीवनावर प्रभाव टाकत असते. खास करून जन्मकाळी चंद्राची स्थिती. जन्मकाळाची कुडली मांडण्याचे एक प्रदीर्घ मोठे शास्त्र विकसित झाले. मी जितका त्याचा विचार करते तितके अधिक मला त्या काळाच्या विद्वानांच्य़ा अभ्यासाचे कौतुक व विस्मय वाटत रहाते. या शास्त्राबद्दल थोडक्यांत सांगायचे तर आधी ए्खाद्या व्यक्तीच्या जन्मवेळी पूर्वक्षितिजावर असलेल्या नक्षत्राची नोंद घ्यायची, व त्याला लग्न स्थान, तनुस्थान किंवा पहिले घर असे म्हणायचे. मग त्या अनुक्रमाने कुंडलीतील इतर राशींची जागा निश्चित होते, त्या त्या राशीतील ग्रहांची जागाही निश्चित होते. मग आपण अजून सूक्ष्म गणिताकडे वळतो. लग्नकाळी (म्हणजे जन्मकाळी) पूर्व क्षितिजावरची रास किंवा नक्षत्र नेमक किती अंश वर आलेल आहे, (सर्वसाधारणपणे एका राशीचे ३० अंश व एका नक्षत्राचे १३ अंश असतात) ते गणित मांडून त्या आधारे दशा व अंतर्दशा मोजायच्या. तसेच ज्या त्या राशीतील ग्रह ज्या त्या राशीत किती अंशावर आहे ते देखील मोजायचे. त्यासाठी एक रेडी रेकनर असणार त्याचे नांव पंचांग अशी वर्षानुवर्ष हजारो वर्ष पंचांग तयार करण्याचे शास्त्र आपल्या पूर्वजांना अवगत आहे. शिवाय आता यातील बरीच आकडे मोड संगणकाच्या सहाय्याने होऊ लागली आहे. पण पूर्वापार अशी गणिते करू शकणाऱ्या व ते शास्त्र जपणाऱ्या पिढ्यांबद्दल अभिमान व कौतुक वाटल्याशिवाय रहात नाहुी.

अशा प्रकारे पत्रिका तयार झाल्यानंतर फलज्योतिषाचा जाणकार असेल तो भविष्य वर्तवणार. म्हणजे ढोबळ मानाने आयुर्मर्यादास्वास्थ्यधन संपत्ती, मानसन्मान, देशाटन, पारिवारिक सुख, पुत्र पौत्र, धन-धान्य, राजसन्मान इत्यादीबाबत कोणत्या वयांत कांय होईल त्याचा अंदाज बांधून ते पत्रिकेत लिहून ठेवणार. कारण साधारणपणे याच बाबींची उत्सुकता व जिज्ञासा माणसाला जास्त असते.
अशा प्रकारे पंचांग पाहून जन्मकुडली मांडणारे पूर्वी गांवोगांव असत. याचाच अर्थ असा की पंचांग तयार करण्याची व ती गांवोगांवी पोचवण्याची किंवा निदान विद्वानांकडे पोचवण्याची व्यवस्था सर्व भारतात होती.सध्या भारतीय पंचांगानुसार विक्रम संवतातील .... वे वर्ष चालू आहे. त्याही आधी युधिष्ठिर संवत होता व त्याही आधी रामजन्मावेळच्या ग्रहस्थितीचा उल्लेख वाल्मिकी रामायणांत सापडतो. याचाच अर्थ असा की पंचांगांचे शास्त्र त्याही पेक्षा कित्येक आधी पासून अवगत होते. असो, या लेखाचा तो मुद्दा नाही.

या लेखासाठी मला महत्वाचा  हा मुद्दा मांडावासा वाटतो की प्रत्येक व्यक्तीला गांवोगांव फिरण्याची वेळ तर येणार असते, पण प्रतेक वेळी स्वत:ची कुण्डली जवळ ठेवणे शक्य नसते. तरीही देशाटनात कधी तरी भविष्य जाणून घ्यायची गरज असेल, स्वास्थ्यासंबंधी उपाय करायचे असतील तर काय करायचे ?

यासाठी एक अभिनव व्यवस्था अंमलात आणली गेली. जन्माच्या वेळी त्या त्या बालकाच्या पत्रिकेत चंद्र ज्या नक्षत्रात असेल, त्यानुसार त्याच्या नांवासाठी काही वर्णाक्षरें मुक्रर करण्यात आली. प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असे २७ नक्षत्रांचे १०८ चरण. त्या चरणाप्रमाणे त्याचे नांवाचे आद्याक्षर ठरवले जाई. अशी व्यक्ती आयुष्यात कधीही कुठेही गेली आणि तिथल्या फल ज्योतिषाचार्याकडे गेली, तरी केवळ त्या व्यक्तीच्या नांवावरून त्यांच्या जन्मनक्षत्राबद्दल कळत असे व त्यावरून तिथला ज्योतिषी योग्य तो सल्ला देऊ शकत असे.

अशी ही जन्मवेळाप्रमाणे नांवाचे आद्याक्षर ठरवण्याची प्रथा कुण्या ऐकेकाळी उदयाला आली आणि सर्वदूर पसरली. कधीकधी कांही जणांना प्रश्न पडतो की निव्वळ नांवाच्या आधारे एखाद्याचे भविष्य कसे सांगता येईल ? त्याच्या मागचे शास्त्र हे असे आहे. खास करून मी असे पाहीले की स्वास्थ्यासंबंधी बरेच ठोकताळे जन्मनक्षत्रावरून व पर्यायाने नांवावरून बांधता येतात, व त्याचीच तात्कालिक गरज जास्तीत जास्त असते. तिथे ही व्यवस्था बरीच उपयोगी ठरते.
माझे वडील उत्कृष्ट फलज्योतिष सांगत असल्याने असे सर्व विचार व निरीक्षण मनांत कुठेतरी कित्येक वर्षे नोदवले जात होते 
मग एका गोष्टीची गंमत वाटत रहाते. भारतीय वानांवरून इथले ज्योतिषी किंवा पंडित भविष्य सांगतात म्हणून पश्चिमि देशांतही नावावरून भविष्य सांगितले जाते. त्याच्यामागे वैज्ञाविकता कशी काय असेल ? असो. तर २००६ मधे माझी नेमणूक पशुसंवर्द्धन खात्याचे प्रधान सचिव या पदावर झाली. महाराष्ट्रांत पुणे, औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी पशुसंवर्द्धन खात्याच्या प्रयोगशाळा आहेत जिथे वळू पाळले जातात व त्यांचे वीर्य गोळा करून, गोठवून, स्ट्रॉज मधे भरले जाते. या स्ट्रॉ गांवोगावी गायींचे कृत्रिम गर्भाधारण करण्यासाठी वापरल्या जातात. या स्ट्रॉ साठी नंबर कोडिंग असते ज्यावरून कोणत्या बैलाचे, कोणत्या वर्षी काढलेले सीमेन (वीर्य) आहे ते कळू शकते. यामधे सगोत्री गर्भधारणा होऊ नये याची बरीच काळजी घ्यावी लागते. सगोत्र म्हणजे ज्या बैलाच्या स्ट्रॉने एखादी कालवड जन्माला आली असेल त्या बैलाची स्ट्रॉ पुढे त्या कालवडीला वापरायची नसते

पण स्ट्रॉ वरील नंबर कोडिंग वाचून देखील एखाद्या पशुसंवर्द्धन केंद्रावरचा अधिकारी कधी कधी गोंधळून जाऊ शकतो. त्याला त्या त्या बैलाची नेमकी ओळख पटणार नाही अशी स्थिती उत्पन्न होऊ शकते. याबाबत आम्ही वरिष्ठ अधिकारी चर्चा करत असताना मला वरील जन्मनक्षत्रावरून नावाची पद्धत आठवली. मी अशी सूचना केली की प्रत्येक केंद्रावरील वळूंना नावे द्यायची. ते करतांना पुणे केंद्रासाठी कांही वर्णाक्षरे रिझर्व्ह केलीऔरंगाबादसाठी कांही व नागपूर केंद्रासाठी कांही. आता स्ट्रॉवर नंबर कोडिंग सोबत जर बैलाच्या नांवाचे आद्याक्षरही असेल तर खूप जणांना त्यावरून पटकन कळू शकते की ही स्ट्रॉ कोणत्या केंद्राच्या वळूचे वीर्य घेऊन निर्माण केली आहे. त्या त्या केंद्रावर नाइट्रोजन कॅन्स मधे स्ट्रॉ भरणारे कर्मचारी असोत, अगर संबंधित पशुसंवर्द्धन दवाखान्यांत ते कॅन्स उतरवून घेणारे कर्मचारी असोत, किवा प्रत्यक्ष कृत्रिम गर्भाधानासाठी स्ट्रॉ वापरणारे एलडीओ असोत, बैलांना नांव दिल्याने व त्यातही केंद्रागणिक नांवांची आद्याक्षरे रिझर्व्ह केल्याने बैलाची ओळख पटणे सोपे झाले व क्वालिटी कण्ट्रोल ची शक्यता सुधारली.

ही पद्धत सुरू केल्यावर  वळू केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मला सांगितले की बैलांना नावाने हाक मारायला सुरुवात केल्यापासून बैलही त्यांच्या नावांना प्रतिसाद देऊ लागले व त्यांना हँण्डल करणे सोपे झाले आहे.  . 

मात्र आता पुन्हा भारत सरकारच्या  सूचनेवरून अशा बैलांचे आधारकार्ड-सदृश रजिस्ट्रेशन आणि नंबर आधारित बार- कोड ही प्रथा सुरू झाली आहे. यामुळे देशभरातील सर्व कृत्रिम गर्भाधानाची एकत्र नोंद ठेवली जाणार आहे. पण दुसरीकडे पूर्वापार होत होत्या त्या क्वालिटी कण्ट्रोलच्या इतर नोंदी व निष्कर्ष हे बाद झाले असतील तर क्वालिटी कण्ट्रोल कसा ठेवणार ?  असे हे एकांगी यांत्रिकीकरण. असो. पण एखाद्याचे नांव असणे आणि त्यातून भावनिक संबंध निर्माण होणे ही भारतीय संस्कृती आपण मोडीत काढू नये असे वाटते.  

या सर्व प्रवासावरून हे ही लक्षात आले की व्यवस्था तयार करणे, ती टिकवणे व हजारो वर्ष तिचा फायदा करून घेणे यासाठी किती मोठी दूरदृष्टि व समाजप्रबोधन लागत असणार.

याही पुढे जाऊन असे सांगता येईल की भारतात मंत्रशास्त्राचाही बराच अभ्यास व विचार झालेला होता. नक्षत्र व राशींचे स्वामी असणारे ग्रह, त्यानुसार त्यांच्या मंत्रांना लागणारी मुळाक्षरे, यांचाही विचार या प्रणालीत झाला असेल तर मला नवल वाटणार नाही. असो, तोही वेगळा विषय आहे ज्यावर त्यातील जाणकारानेच भाष्य करायला हवे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------

1 comment:

  1. Casino Slots - DrmCD
    The slot 부천 출장샵 game offers a large selection of unique games, 경기도 출장샵 unique themes, exciting themes, and the chance 논산 출장샵 to win big. 상주 출장샵 The casino also offers a unique theme and the 광양 출장샵 chance to

    ReplyDelete