स्पर्धा परीक्षांचे दिवस
स्पर्धा परीक्षा हा शब्द आता नवीन राहिलेला नाही. महाराष्ट्रात कित्येक शहरातून स्पर्धा परीक्षा तयारीची केंद्र सुरू झाले आहेत आणि त्या केंद्रांमधून उत्तम यश मिळवून सरकारी नोकरीत येणा-यांबद्दल आपण आता नियमित वाचतो.
मी स्पर्धा परीक्षा दिली ते वर्ष होते 1972- म्हणजे आजपासून 44 वर्ष मागचा काळ. त्या काळांत स्पर्धा परीक्षा हा शब्द पुणे- मुंबई कडील नावाजलेल्या शाळा-कॉलेजांना देखील अपरिचित होता. मग ग्रामीण भागाची बातच सोडा. मी फॉर्म भरायला घेतला त्या सुमारास माझ्या ओळखीतील व नुकतेच स्नातक किंवा स्नातकोत्तर परीक्षा पास झालेल्या कित्येकांना मी विचारले होते की तुम्हीं पण फॉर्म भरत आहात कां ! त्यावर त्या सर्वांचे उत्तर होते - हे कांय असते ?
फक्त एकाने सांगितले की तो बँकेची परीक्षा देणार आहे. बहुतेकांनी मला विचारले की या परीक्षेची माहिती तुला कुठे मिळाली, किंवा ही परीक्षा कांय असते. या उलट महाराष्ट्राचे आजचे चित्र आहे. आज ग्रामीण भागातही आठवी-नववीपासून विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची माहिती घेताना दिसतात, भलेही फॉर्म भरण्यासाठी 20 वर्षे वयाची अट असो.
माझे बालपण व कॉलेज शिक्षण बिहार मधील दरभंगा या जिल्ह्याच्या ठिकाणी झाले. हा जिल्हा म्हणजे बिहार बंगाल आणि नेपाळच्या सीमेवरचा जिल्हा. आधीच महाराष्ट्राच्या तुलनेत बिहारला मागास मानले जाते त्यातही दक्षिण बिहारच्या तुलनेत उत्तर बिहार अधिक मागास मानला जाई. कारण कांय तर उद्योग क्षेत्र अप्रगत असणे. शेतीवर भर असणे, आणि झपाटून शहरीकरण होत नसणे. शिवाय बिहारमधील स्त्री शिक्षणही बरेच मागे पडलेले होते. पण प्रत्यक्ष दरभंगा शहरांत मात्र जे दरभंगा मेडिकल कॉलेज होते त्याची गणना देशातील 20 उत्तम पैकी होत असे. दरभंगा महाराजा हा देशांतील दुसरा श्रीमंत महाराजा होता आणि त्याने देणग्या देऊन स्त्री- शिक्षण पुढे आणण्याचा थोडा प्रयत्न केला होता. शिवाय दरभंगा येथे वायुसेनेचा मोठा एयर बेस होता. जवळच पूसा या गावात कृषिखात्याचे मोठे बियाणे संशोधन केंद्र होते.
अशा दरभंग्यात महाराष्ट्रीय कुटुंब आमचे एकमेव. सोबतीला मैसूरचे विद्वान डॉ शर्मा. ते व माझे वडील दोघेही मित्र व मिथिला संस्कृत रिसर्च इन्स्टिटयुट दरभंगा येथे प्राध्यापक. त्यामुळे डॉक्टर, वायुसेना वैज्ञानिक, बँकिंग आणि सरकारी अधिकारी यांच्यातील वरिष्ठ हुद्यांवर येणारे महाराष्ट्रीय किंवा दक्षिण भारतीय मंडळी नित्य नियमाने आमच्याकडे येत. ते आम्हा मुलांचे कौतुक करीत व आम्हीही मोठ्या पदावर पोचावे अशी सदिच्छा व्यक्त करीत. मी कॉलेजात असतांना असेच एक अधिकारी श्री अडिगे, आयएएस हे सेटलमेंट अधिकारी म्हणून आले आणि त्यांनी वडिलांच्या मागे लकडाच लावला की मी लोकसेवा संघ आयोग म्हणजे यूपीएससीच्या परीक्षेला बसावे. दरवेळी आमच्या घरी आले की ते हा विषय काढीत आणि श्रीमती अडिगे त्यांना म्हणत - अहो, पण ती अजून अंडर-एज आहे, तिचे कॉलेज तर संपू द्या.
मी एमएस्सी साठी पटणा युनिर्व्हसिटित दाखल झाले आणि त्यामुळे वडिलांचे पटणा येथे येणे जाणे वाढले. अशा वेळी संस्कृत सहाध्यायी म्हणून त्यांची एखादी फेरी श्री सोहोनी यांच्याकडे असायची. श्री सोहोनी बिहारमधील या- त्या विभागात सेक्रेटरी असायचे. पुढे पटणा विश्वविद्यालयातील एकूण अनागोंदी थांबवण्यासाठी त्यांचीच व्हीसी म्हणूनही नेमणूक झाली होती.
तर असे हे श्री सोहोनींचे अधिकारपद आणि तुलनेने ज्यूनियर असलेल्या श्री अडिगेंचा उत्साह व त्यांनी दिलेल्या माहितीतून आम्हाला कळले की त्यांच्यासारखेच सत्ताधारी सरकारी अधिकारी व्हायचे असेल तर लोसेसं आयोगाची स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. अन्यथा इतर डॉक्टर्स, इंजिनियर्स, वैज्ञानिक, प्राध्यापक, हे देखील सरकारी अधिकारी असतात. माझे वडील ही होतेच. पण ते सत्ता किंवा शासन राबणाऱ्यांपैकी नसतात. किंवा अस म्हणूया की सत्ता राबवण्यामधे त्यांच्या वाटा तुलनेने कमी असतो.
मी एमएस्सी साठी पटणा विश्वविद्यालयाच्या गर्ल्स होस्टेलला राहू लागले. इथे फस्ट इयर पासून पी एच डी पर्यंतच्या विद्यार्थिनी होत्या आणि त्यांच्या चर्चेत स्पर्धा परीक्षा हा विषय असायचाच. खूप अभ्यास करावा लागतो. पण तुम्ही हुषार आहात तर करा ना तयारी अस ज्यूनियर मुलीच मला शिकवत असत. मग एकदा मुद्दाम पोस्टात जाऊन रू. तीन या रकमेची पोस्टल ऑर्डर यूपीएससी दिल्ली यांचेकडे पाठवली. दहा दिवसांनी एक भलमोठ पाकीट आल जे पाहूनच धडकी भरावी. पण सुदैवाने मी व शौकत थानवी अशा दोघींची पाकिटं एकदम आली होती व आम्ही मिळूनच फोडली. त्यात प्रत्येक विषयाचे वर्णन होते की त्या- त्या विषयातील प्रश्नांना अपेक्षित अभ्याक्रम काय असेल. माझे बीएस्सी चे विषय भौतिकी, रसायन, गणित – त्यातील रसायन व गणिताचा अभ्यासक्रम वाचत गेल्यावर खूप कठिण आणि अपरिचित वाटू लागला. शेवटी ते कागद बाजूला ठेवले.
मग एकदा सुट्टीत दरभंग्याला गेले असतांना पुन्हा अडिगेंची भेट झाली. त्यांनी कानमंत्र दिला- फक्त भौतिकी हा विषय निवड इतर दोन हे कलाशाखेतील निवड- त्यांचा अभ्यास सोपा जातो पण माझ्या दृष्टीने ते तर अजूनही मोठे दिव्य ठरले असते. शिवाय सगळी परीक्षा इंग्रजीतूनच.
आताच्या स्पर्धा परीक्षांपेक्षा त्या काळातील परीक्षांचे स्ट्रक्चर वेगळे होते. प्रिलिम आणि मेन या ऐवजी लोअर पेपर्स आणि हायर पेपर्स अशी विभागाणी असून संपूर्ण परीक्षा एकाच वेळी होत असे. मात्र लोअर पेपर्स मधे क्वालिफाईग मार्क न आल्यास हायर पेपर्स मधे तपासले जात नसत. लोअर पेपर्स मधे जनरल नॉलेज, इंग्लिश निबंध आणि इंग्लिश क्म्पोझिशन या सोबत कोणतेही तीन विषय असे सहा पेपर्स असत तर हायरसाठी दोन विषय. इंग्लिश क्म्पोझिशन मधे गांधियन फिलॉसफी आणि प्रेसी राइटिंग शिवाय नकोकाम्प्रीहेंशन वगैरे असत. त्याकाळी प्रत्यक्ष यूपीएस्सीचे पेपर्स पहायला मिळत नसत पण बरीचशी गाइड्स आणि मासिक निघत व त्यामधे असे सॅम्पल प्रश्न पहायला मिळत. होस्टेल वर पाच-सात मुलींकडील असे सॅम्पल्स पाहूनही छे नकोच ते असे वाटले. पण मला आदर्श मावणाऱ्या कांही ज्युनियर मुलींनी मात्र मी परीक्षा देणार असे गृहीत धरून मी कशी कशी तयारी करणार याची चर्चा माझ्याबरोबर सुरू ठेवली होती.
त्यांनीच एक दिवस बातमी आणली की पटणा विश्वविद्यालयातील कांही प्रोफेसर्सनीं एकत्र येऊन रोज सायंकाळी 4 ते 7 मोफत कोचिंगचे वर्ग सुरू करीत आहेत. त्या दिवशी मात्र आम्हीं सर्व मुली एक घोळका करून त्या ओपनिंग क्लासला गेलो.
वर्ग सुरू झाला. स्पर्धा परीक्षा म्हणजे कांय असते वगैरे सुरूवात न होता सरळ एका गुगली ने सुरूवात झाली ‘’समजा तुम्हीं उत्तर ध्रुवावर आहात आणि तुम्हीं डावीकडे तोंड करून निघालात तर तुम्हीं कोठे पोचाल‘’ ?
याचे उत्तर कोणालाच येत नाहीसे बघून ते प्रमुख शिक्षक बोलले- ‘’याचसाठी हे क्लासेस सुरू करीत आहोत. आता पुढील तीन दिवसांत आम्ही अर्धा अर्धा तास या प्रमाणे प्रत्येक विषयाचे व्याख्यान ठेऊ,, त्याला सर्वींनी हजर रहा मग तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणतां विषय किंवा कोणते शिक्षक भावले. त्या प्रमाणे परीक्षेसाठी विषयांची निवड करा. आणि हो, जनरल नॉलेजच्या पेपरसाठी सर्वच विषयांचे थोडे तरी ज्ञान असावेच लागते. आता पळा प्रॉपर क्लासला’’.
मग सर्वांनी एकच गलका केला कि त्या प्रश्नाचे उत्तर सांगा, मग जाऊ.
मला त्या दिवशी पहिल्यांदा कळल की आपल्या कल्पना, संकल्पना किती चुकीच्या असू शकतात. आपण लहानपणी शिकतो - पूर्वेकडे तोंड केले तर डाव्या हाताला उत्तर दिशा. म्हणजेच उत्तरेकडे तोंड केल्यावर उजवीकडे पूर्व दिशा पण हे संदर्भ चूक आहेत. उत्तर ध्रुवावरून चालत निघाल तर कुठेही तोंड करून निघा, उत्तर ही तुमच्या उजव्या किंवा डाव्या हाताला नसून तुमच्या मागे असते, म्हणजेच तुम्हीं दक्षिण ध्रुवावर पोचणार असता हे त्याचे उत्तर. सबब दिशांच्या संदर्भासाठी सूर्य नव्हे तर ध्रुवतारा हा मनात ठेवायचा असतो. असो.
ग्रुपने अभ्यास करा हा गुरूमंत्रही तिथेच मिळाला. पण बिहारचे वातावरण माझ्यासाठी पोषक नव्हते. मी मुलांच्या ग्रुपमध्ये जाण्याचा विचारच केला नाही. गर्ल्स होस्टेलवरील मुलींचे सरळ- सरळ दोन गट पडत असत. कॉन्व्हेंट मधील फाडफाड इंग्लिश बोलणाऱ्या मुली वेगळ्या आणि शाळेत हिंदी माध्यम असलेल्या आम्हीं मुली वेगळ्या.
आम्ही वेगवेगळ्या विषयांचे वर्गात बसू लागलो. पहिल्याच झटक्याला मी कॉण्ट्रक्ट अॅक्ट या विषयाच्या प्रेमात पडले. शिवाय यूरोपीय इतिहास शिकवणारे प्राध्यापकही चांगले होते. तिसरा मी माझा फिजिक्स हाच विषय निवडला, पण त्याचे क्लासेस होणार नव्हते. खर तर फिजिक्स, मॅथ्स, बॉटनी, झूलॉजी, जिऑलॉजी आणि रसायनशास्त्र या सहाही विषयांचे कोचिंग क्लासेस होणार नव्हते. कारण ज्यांनी एमएसस्सीला हे विषय घेतले असतील त्यांनाच ते झेपणार होते. आमच्या विभागातील प्राध्यापकांना आम्ही कधीही विचारू शकणार होतो.
एवढया सर्व आरंभिक तयारीनंतर मी 1972 जुलैमधील परीक्षेसाठी फॉर्म भरला. आम्हाला इंग्लिश शिकवणारे प्राध्यापक बरेच अनुभवी आणि अधून मधून यूपीएस्सीचे पेपर सेटर ही होते. परीक्षेच्या तयारीचे इंग्लिश आणि डिग्रीच्या अभ्यासाचे इंग्लिश यात खूप फरक असतो हे त्यांनी समजावले. अगदी पटण्यातील बीए इंग्लिशची टॉपर असलेली आमच्याच होस्टेलची मुलगी देखील त्यांच्या क्लासला हजर असायची. इंग्लिश निबंध या विषयासाठी त्यांनी तीन वर्तमानपत्रातील एडिटोरियल्स आठवडाभर वाचा आणि त्यापैकी एका विषयावर तुमच्या भाषेत निबंध लिहा असे सूत्र सांगितले. निबंधाची सुरवात 500 शब्दांपासून ते 10,000 (दहा हजार) शब्द एवढे लांबलचक निबंध लिहायला लावले. त्यांच्याकडून निबंधाची वही परत मिळेल त्यात किती लाल शाईच्या फुल्या असतील या कल्पनेनेच सर्वांना घाबरायला व्हायचे. एक दिवस त्यांनी मला वेगळे थांबवून उपदेश केला- तुझी निबंधाची मांडणी, परिच्छेदांचा क्रम, त्यातील कल्पना उत्तम असतात. व्याकरणाच्या चुका अजिबात नसतात. पण स्पेलिंग आणि निबंधाचा शेवट हे वीक प्वाईंटस् आहेत. डिक्शनरी वाचायची सवय ठेव. समान-उच्चारी शब्दांचेच स्पेलिंग चुकते. उदाहरणार्थ Loose आणि lose, किंवा Later आणि Latter.
माझा निबंधाचा शेवट unimpressive असतो हे सांगण्याआधी त्यांनी माझ्याकडून दोन निबंध हिंदीत लिहून घेतले होते. यावरून त्यांचा हाडाचे शिक्षक हा पिण्ड मला जाणवला. रिपीटीशन झाले तरी चालेल पण शेवटच्या दोन परिच्छेदात तुमच्या विचारांचा सारांश आणि निष्कर्ष मांडता आला पाहिजे.
1972 च्या परीक्षेत आमच्या होस्टेल पैकी कुणीच क्वालिफाय झाले नाही. पण लोअर पेपर्सचे मार्क हाती पडले तेंव्हा पहिले कि निबंधात बरे मार्क होते.
पुढील वर्षासाठी पुन्हा फॉर्म भरूया असा शौकतने लकडा लावला, त्याला माझ्या शिवाय कोणीच होकार दिला नाही. मग आम्ही दोघींनी पुनः फॉर्म भरून 1973 च्या परीक्षेची तयारी सुरू केली.
एव्हाना माझे एमएस्सी संपून मी मायक्रोवेव्ह ट्रान्समिशन इन ग्लासेस या विषयावर रिसर्चसाठी रजिस्ट्रेशन केले होते. स्कॉलरशिपही होती, त्यामुळे युनिवर्सिटीची परवानगी असेल तरच यूपीएस्सीचा फॉर्म भरता येतो. मला व माझ्याच एमेस्सी बॅचमधील रिसर्चसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या अन्य एका मुलाला आमच्या विभाग-प्रमुख व विश्वविद्यालयाने परवानगी दिली होती. हा नियम अजूनही लागू आहे आहे आणि आयआयटी सारख्या कित्येक युनिव्हर्सिट्या अशी परवानगी नाकारतात. आमच्या होस्टेलची एक मुलगी दिल्लीच्या ICHR मधे स्कॉलरशिप मिळवून पीएचडीसाठी गेली होती. तिला परवानगी नाकारल्यावर तिने यूपीएस्सीचा फॉर्म भरतांना रिसर्चच्या रजिस्ट्रेशनची बाब लपवून फॉर्म भरला. क्वालिफायही झाली लेखी परीक्षेत. पण यूपीएस्सीच्या छाननीत ही बाब उघड झाल्यावर तिला कायम डी-बार करण्यात आले. खोटेपणाने येणारे अधिकारी आपल्याला नकोत हे युपीएस्सीच्या सिलेक्शन मधले एक तत्व असते. असो.
याच सुमारास माझे वडील रिटायर झाल्यामुळे घरच्या परिस्थितीचा अंदाज येऊन मी मगध महिला कॉलेजमधे लेक्चरर व त्यांच्याच होस्टेलला असिस्टंट रेक्टर अशा दोन नोकऱ्या स्वीकारल्या. कॉलेजमधे फिजिक्स शिकवण्यामुळे निश्चितच फायदा झाला. होस्टेलच्या मुलींनाही मी इंग्लिश, ग्रामर, फिजिक्स आणि यूरोपीय इतिहास शिकवायला सुरू केली. आमच्या रेक्टर देखील इंग्लिशच्या प्राध्यापक होत्या. माझ्या तयारीसाठी मी त्यांची मदत घेत असे. शिवाय माझ्या जुन्या होस्टेलवर जाऊन शौकत बरोबर उजळणी देखील करीत असे. आता आमच्या बरोबर संस्कृत हा विषय घेतलेली एक मुलगी पण तयारी करत होती. ती मला खूपदा म्हणायची- विषय बदल – संस्कृत घे. पण मी मात्र इतक्या तयारीनंतर विषय बदलायचा नाही हे ठरवून टाकले.
त्या काळी मोबाइल नव्हतेच पण माझ्या फोनची चंगळ पण नसायची. मात्र होस्टेलला गेले की मला सीनीयर व फिजिक्स आणि बॉटनीत पीएचडी करणाऱ्या दोघी, झूलॉजीत पीएचडीला गेलेली माझी जुनीच रूममेट आणि खेळ संवंगडी असलेल्या तमाम ज्युनिअर मुली माझ्या यूपीएस्सी अभ्यासाची चौकशी करायच्या. त्यामुळे या वर्षी मागील चुका करायच्या नाहीत हे ठरवून त्या प्रमाणे अभ्यास केला.
मी व शौकत दोघीही इतिहासाच्या पहिल्या प्रश्नावर अडखळत होतो. या प्रश्नांत यूरोपचा एक कोरा बाउंड्री मॅप दिला जायचा व त्यावर वेगवेगळ्या देशांच्या १७५० ते १९५० या कालावधीतील घटना आखायला सांगत. शौकत भूगोलाची विद्यार्थीनी असून अडखळत होती. आम्ही बाजारातून प्रॅक्टीससाठी खूप बाउंड्री मॅप आणले होते पण त्यावर आखणी जमत नसे.
एकदा असेच मॅप व इतिहासाचे पुस्तक उचलून मी दरभंग्याला आले आणि आईला ही समस्या सांगितली. आईचा भूगोल विषय खूप चांगला हे माहीत होते. तिने चक्क हातात पेन्सिल घेतली. यूरोपचा कोरा नकाशा म्हणजे फक्त नैसर्गिक सीमा दाखवणारा- मधे संपूर्ण कोरा– असा नकाशा घेतला आणि तिच्या आठवणीप्रमाणे अंदाजाने त्यावर अक्षांश आणि रेखांशांच्या रेघ काढल्या. त्या काढतांना समुद्राचे जे नॅचरल कण्टूर्स होते व त्यांचे वेगवेगळे आकार बाउंड्रीवर होते त्यांतील खुणांचा आधार घेतला. असा एक खणांचा नकाशा तयार झाला. मला म्हणाली हे घे, या खणांच्या आधाराने ऐतिहासिक काळच्या त्या त्या देशांच्या वा घटनांच्या सीमारेषा काढ. कारण १८वे, १९वे आणि २०वे शतक या तीन शतकांमधे यूरोपीय देशांच्या सीमा वारंवार बदलल्या, दर नव्या युद्धानंतर त्या देशांचे नकाशे बदलत. नेपोलियनचे साम्राज्य वाढले व नष्ट झाले, जर्मनी व इटलीचे युनिफिकेशन झाले, क्रिमियन वॉर झाली वगैरे वगैरे. पण भूगोलातील अक्षांश आणि रेखांशांच्या रेषा तिथेच राहिल्या. त्या बदलल्या नाहीत. त्यांच्याच रेफन्सने इतिहासाचे नकाशे काढायचे हा मंत्र घेऊन मी परतले. मग मी व शौकतने खूप उत्साहाने या प्रश्नाचा पिच्छा पुरवला. आधीच्या दहा वर्षांतील सर्व प्रश्नपत्रिकांमधील सर्व मॅप्स काढून पाहिले. केटेल्बी लिखित युरोपीय इतिहासाच्या पुस्तकाची एवढी मदत झाली की अजूनही ते पुस्तक माझ्या संग्रहात आहे व ते मी अधून- मधून वाचते. आणि काण्ट्रॅक्ट एक्ट तर इतका पक्का झाला की पुढे नोकरीत गरज लागे तेंव्हा व एलएलबीचा अभ्यास करताना तो आपल्याला पूर्णपणे येतो हे जाणवत राहीले.
असो. या रीतिने माझा अभ्यास पार पडला आणि १९७३ मेन परीक्षेत माझी निवड ङाली. नंतर सुमारे २ वर्षांनी शौकतही पोस्टल सर्विसमधे आली.
निवडीनंतर माझ्या इंग्रजी प्राध्यापकांनी मला बजावले-- तुझे इंग्रजी छान आहे पण बोलताना ते ओढून ताणून आणल्यासारखे वाटते. सवय वाढवायला हवी -- पेपर मोठ्याने वाचायची प्रॅक्टिस कर. अजून हातात ४ महिने आहेत.
मग श्री अडिगेपासून सर्वांनी सल्ला दिला की इण्टरव्ह्यूच्या तयारीसाठी दिल्लीतील एखादी कोचिंग सेंटर गाठून तिथे नियमित ट्रेनिंग घे. त्या काळी राव स्टडी सर्कल हे नंबर एक कोचिंग सेंटर होते. त्यांचा एक कोचिंग वर्ग तीन महिन्यांचा व दुसरा पंधरा दिवसांचा होता. मला मोठा कोर्स शक्य नव्हता. कॉलेजची नोकरी, पीएचडीचा प्रोग्रेस अणि दिल्लीतील तीन महिन्यांचा खर्च या सर्वच बाबी आड येत होत्या. शेवटी पंधरा दिवसांचा कोर्स करायचे ठरवले. त्याआधी इंग्लिश बोलायच्या प्रॅक्टीससाठी मगध महिलामधील फिजिक्सच्या विद्यार्थीनी आणि मुलींच्या होस्टेलला आल्यानंतर तिथल्या मुलींना गिनी पिग करुन माझी प्रॅक्टीस चालू केली. रेक्टर बाईंची ही मदत झाली.
माझी तोंडी परीक्षा एप्रिल मध्ये असेल असे पत्र यूपीएस्सी कडून आले होते. मग १५ मार्चच्या सुमारास मी राव स्टडी सर्कलला प्रवेश घेतला आणि मला सुखद आश्चर्य वाटले की तिथेही कन्व्हेंटी इंग्लिश बोलणारे व तसे न बोलणारे या प्रमाणे दोन गट होते. पण आम्ही हिंदीवाले कुणीच कमी पडत नव्हतो. किंबहुना आमचीच तयारी जास्त चांगली होती. अर्थात त्या काळी दीड लाखातून सुमारे आठ-दहा हजार विद्यार्थीच क्वलिफाय होत. त्यामुळे इण्टरव्ह्यूपर्यंत येणारे विद्यार्थी निश्चितच चांगल्या तयारीचे असायचे. तरी त्यांतून सिलेक्शन होणार फक्त हजार बाराशेंचे त्यामुळे दडपण तर होतेच.
या इण्टरव्ह्यूच्या तयारीत माझा धाकटा भाऊ आणि आणि दिल्लीला ज्यांच्या घरी आम्ही उतरलो ते स्वत: रोजच्या रोज वर्तमानपत्रातील प्रश्न विचारुन लेटेस्ट करेंट अफेअर्स बाबत माझी तयारी करुन घेत होते. त्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा वाढता प्रभाव होता. त्याबद्दल बरेच छापून येई,, ते वाचले गेले. इण्टरव्ह्यूमध्ये मला नेमके त्यावरच विचारत राहीले. सन ऑफ द सॉईल म्हणजे काय, ते योग्य आहे का, ते संविधानाला धरुन आहे का, तुम्ही सपोर्ट करणार का? इत्यादि. मला बिहार व महाराष्ट्र दोन्हींकडील चांगली जाणीव असण्याचा उपयोग झाला. मी उत्तरले -- हो, क्लास थ्री पोस्टवर ७०- ८० टक्के सन ऑफ दी सॉइलला संधी द्यावी. वरिष्ठ पदांवर भारत सारा एक ही कल्पना रुजली पाहिजे. माझ्या पीएचडी विषयाचे बरेच प्रश्न विचारले गेले. शेवटचा प्रश्न होता– भारतातील टेनिसचे ख्यातनाम प्लेअर्स कोण? भावाने वर्तमानपत्रातील स्पोर्टसच्या पानावरूनही बरेच प्रश्न विचारुन तयारी करुन घेतली होती. धाडकन उत्तर सांगितले - विजय आनन्द.
इण्टरव्ह्यू संपला. बाहेर आले. भावाला सांगितले टेनिस प्लेअर्सची नावे विचारली होती, बरे झाले तू ती तयारी करुन घेतली होतीस. त्याने विचारले- तू काय नावे सांगितलीस? मी म्हटले विजय आनन्द. त्याने कपाळावर हात मारुन घेतला- अग बयो, विजय आनन्द हा सध्या गाजत असलेल्या गाइड चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. टेनिस प्लेअर्सची नावे विजय अमृतराज अणि आनंद अमृतराज अशी आहेत.
-असोत. मी मात्र, IAS मध्ये निवडून आले.
------------------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment