मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Monday, March 29, 2021

एक कर्तबगार सनदी अधिकारी (लीना मेहेंदळे) -- लेखक ???

 

एक कर्तबगार सनदी अधिकारी (लीना मेहेंदळे)

आपल्या राज्याला सनदी अधिक-यांची एक उज्जवल परंपरा लाभलेली आहे. . गो बर्वे पिंपुटकर अशी काही नावे आहेत ज्यांनी आपल्या कुशल प्रशासकीय क्षमतेचा, निष्कलंक चारित्र्याचा, प्रखर बुद्धिमत्तेचा,सहका-यांना स्वतःसोबत नेण्याच्या वृत्तीचा अमीट ठसा महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनावर उमटवला आहे. या यादित अशाच एक थोर व्यक्तींचा समावेश अपरिहार्य आहे, ज्यांचे नाव आहे लीना मेहंदळे, महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त प्रधान सचिव म्हणून ज्यांनी काम केले आहे, गोवा राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपद ज्यांनी विभूषित केले. त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे केला आणार आहे. विविध क्षेत्रातील थोरामोठ्यांच्या भेटी घेऊन त्यांची महती वाचकांना सांगणे, हे एक व्रत आहे असे मी मानतो.

शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी। असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय लीनाताईच्या व्यक्तीमत्तातून जाणवतो. त्यांचे तीर्थरूप डॉ. बलराम सदाशिव अग्निहोत्री व मातोश्री सौ. लीना अग्निहोत्री यांच्या पोटी 31 जानेवारी 1950 ला लीनाताईचा जन्म झाला वडील तत्वज्ञान व संस्कृत भाषेचे विज्ञान प्राध्यापक होते. आई देखील त्याकाळची उच्चविद्याविभूषित होती. त्यामुळे घरातील वातावरण उच्चशिक्षणासाठी पोषक होते. त्यामुळे घरातील वातावरण उच्चशिक्षणासाठी पोषक होते. लीनाताईच्या आजोबांनी व आईने त्यांचा बालपणापासून गणिताचा अभ्यास करून घेतला होता. खानदेशातील धरणागाव येथे हा अग्निहोत्री परिवार राहत असे. ताईचे वडील, 1957 साली ताई सात वर्षाच्या असताना, नोकरिनिमित्त धरणगावाहून जबलपूरला गेले. धरणगावच्या तुलनेत तुलनेत जबलपुर हे खूपच मोठे शहर आहे. त्यामुळे लहानपणीच ताईंना दूरचा रेल्वे प्रवास, मोठ्या शहरात रहाण्याचा अनुभव मिळाला. दोन वर्षात ताईच्या वडिलांनी जबलपुरची नोकरी सोडून बिहार राज्यातील दरभंगा या गावी एका शासकीय संशोधन संस्थेत नोकरी स्वीकारली. त्यामुळे ताईंना जबलपूरहून दरभंग्याला जावे लागे. दरभंगा हे गाव दरभंगा हे गाव जबलपुरपेक्षाही मोठे आहे. ताईचे शालेय शिक्षण दरभंग्यात झाले. बिहार राज्या आजही शिक्षणाच्या संदर्भात देशातील अनेक राज्यांपेक्षा मागासलेले आहे. त्या काळी मुलींचे शिक्षणाचे प्रमाण खुप कमी होते. पण मुलींची स्वतंत्र शाळा होती., ताई बालपणापासूनच बुद्धीमान, मेहनती आहेत, त्यामुळे त्या शाळेत गणित या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवित. संस्कृत भाषेत ताई नेहमीच 90 टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवत घरापासून शाळा दूर असल्यामुळे ताई सायकल वर बसून जात असत. शाळेत सायकल वर बसून येणा-या ताई या ऐकमेव विद्यार्थिनी होत्या. त्यामुळे शाळाभर त्यांची ओळख सायकल चलानेवाली लडकी, ही होती, बिहार त्या काळी किती मागासलेला होता. ,याची कल्पना एका घटनेवरून येऊ शकते. ताईनंतर 17 वर्षे त्या शाळेत एकही विद्यार्थिनी सायकलवर बसून शाळेत येत नसे. ताईंनी विज्ञान विषय अभ्यासासाठी घेतला होता., पण त्यांच्या शाळेत वैज्ञानिक प्रात्यक्षिके करण्याची सोय नव्हती, त्यामुळे ताईंना मुलांच्या शाळेत प्रात्यक्षिके करण्यासाठी जावे लागत असे.

(ताईचे सगळ्यात मोठे योगदान देवदासींचे आर्थिक पुनर्वसन करणे ही प्रथा बंद पाडणे हे आहे. सांगली जिल्हयात जत नावाचे एक गाव आहे, जेथे दरवर्षी देवदासी होण्यासाठी स्त्रियांना सोडले जाते. त्या दिवशी पोलीस बळाचा वापर करून ताईंनी ही प्रथा बंद पाडली. देवदासींची प्रथा बंद पाडणे ही क्रांतीकारी बाब होती…..!)

ताईंना दरभंगा येथे.B. Sc केले व M. Sc यासाठी त्या पाटण्याला गेल्या . तेथे वसतिगृहात राहून त्यांनी M.Sc ची पदवी 1970 साली मिळवली. Msc. झाल्यावर Ph.D साठीही त्यांनी नोंदणी केली होती, पण आई- वडिलांचा, परिवाराबद्दल सद्भाव असणा-यांचा आग्रह ताईंनी I.A.S परीक्षा द्यावी असा होता. मधल्या काळात ताईंनी पदार्थ विमान या विषयाची प्राध्यापिका म्हणून 1972- 73 या वर्षी पाटण्यात काम केले. 1988 साली त्यांनी इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून M. Sc.(Project Planing) ही पदवी मिळवली. 2007 साली त्यांनी M.BA (H.R) ही पदवी मिळवली. मुंबई विद्यापीठाची LLB ही पदवीही त्यांनी 2010 या वर्षी मिळवली.

वयाच्या 24 व्या वर्षी जुलै 1974 मध्ये त्या I.A.S.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाल्या. नोकरीची सुरूवात महाराष्ट्रात झाली. विविध विषय शिकवण्याचा त्यांचा नोकरीत .असतानाच कल होता, ताई मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये पारंगत आहेत. त्यांना बंगाली भाषा बोलता येते, संस्कृत, गुजराती, पंजाबी, नेपाळी, मैथिली, ओरिया, आसामी, भोजपुरी व आहिरारी या भाषा वाचताही येतात. थोडक्यात त्या बहुभाषा कोविंद आहेत.

मसुरी येथे वर्षभराचे प्रशिक्षण घेतल्यावर परिविक्षाधीन अधिकारी (प्रोबेशनरी ऑफिसर) म्हणून त्यांनी पुणे जिल्यात विविध प्रशासकीय कामांचा अनुभव घेतला. नंतर पुण्यालाच अस्टिटंय कलेक्टर म्हणून त्या दोन वर्षे होत्या. एक वर्ष महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाच्या डेप्युटी सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या काळात प्रौढ व अनौपचारिक शिक्षणाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. अतिरिक्त जिल्हाधिकारी अर्बन लँह सिलींग या पदावर त्यांनी दोन वर्षे काम केले.

त्यांचा मराठवाडा विभागाशी संबंध आला 1981 साली. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षभर त्यांनी काम केले नंतर सांगलीला त्यांची याच पदावर बदली झाली. तेथे त्या दोन वर्षे होत्या.

84 साली जिल्हाधिकारी या पदावर प्रथम त्या सांगलीला नेमक्या गेल्या . तेथे वर्षभर त्यांनी काम केले .सांगली हा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जिल्हा मा. शरद पवार व बँ. अंतुले या दिग्गजांना बाजूला सारून इंदिराजींनी दादांना दादांना मुख्यमंत्री केले होते. याच कालात इंदिराजींची हत्या झाली होती.मोठ्या कौशल्याने ताईंनी जिल्ह्यातील जनप्रक्षोभ शांततेच्या मार्गाने नियंत्रित केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी म्हणून सांगलीला त्यांचे वास्तव्य होतेच. कामातून त्यांनी स्वतःची प्रतिमा उजळ बनविलेली होती, लोकांचा विश्वास जिंकलेला होता. म्हणून त्यांना हा प्रसंग हाताळणे सोपे ठरले असावे. जिल्हाधिका-यांच्या कार्यालयाजवळ कॉग्रेस भुवन होते. कॉंग्रेसच्या जिल्हाध्याक्षांचा व ताईंचा चांगला परिचय होता. ताईंनी त्यांना सर्व कार्यकर्त्यांची सभा बोलाविण्यास सुचविले . या सभेत ताईंनी माननिय इंदिराजींवर खुनी हल्ला झाला आहे. डॉक्टर्स त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत, या अतिशय नाजूक घडीला आपण सर्वांनी संयम बाळगून .

इंदिराजींच्या जिवितासाठी देवाची प्रार्थना करणे आवश्यक आहे असे भावनिक आवाहन केल्यामुळे व सत्य सांगितल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत झाली . सांगली जिल्हयात तेथे तेथे दोन दिवस त्यांची सर्व व्यस्था करून त्यांना सुरक्षित ठेवले. ताई, जिल्हा पोलीस प्रमुख व जि. प चे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली येथील गुरूद्वा-यात दर्शन घेण्यासाठी गेले व गुरूद्वा-याच्याही सुरक्षेची व्यवस्था केली. अडचणीच्या प्रसंगातच माणसाच्या व्यक्तिमत्वाचा कस लागतो. ताईंनी या बिकट प्रसंगी जिल्हयात शांतता राखण्यासाठी दूरध्वनी क्षेपकाद्वारे लोकांना इंदिराजींबद्दलची सत्य परिस्थिती सांगून शांतता राखण्याचे आवाहन केले.

ताईंनी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपद तीन वर्षे सांभाळले. या महामंडळाच्या कार्यक्षेत्रात पश्चिम महाराष्ट्राचे नऊ जिल्हे येतात. या जिल्ह्यांसाठी औद्योगिक धोरण ठरविणे, मोठ्या, मध्यम, लघू आणि छोट्या उद्योगांच्या विस्तार व विकासाची काळजी घेँणे, उद्योजकता वाढीला लागण्यासाठी प्रयत्न करणे तसेच शासन अंगीकृत तीन बड्या उद्योगांच्या वाणिज्यविषयक बाबींकडे लक्ष पुरविणे या जबाबदा-या पार पाडाव्या लागत. प्रिया स्कूटर बनविणारा महाराष्ट्र स्कुटर्स हा कराखाना, एचएमटी घडयाळांचे एकत्रीकरण करणारा अभिजीत समयदर्शिका हा कारखाना व चैतानी डिस्टीलरी जी महाराष्ट्रात सर्वात मोठी डिस्टीलरी होती जी कारखान्यांना लागणा-या अल्कहोलचे उत्पादन करीत असे.

ताईंचे सगळ्यात सोठे योगदान देवदासींचे आर्थिक पुनर्वसन करणे व ही प्रथा बंद पाडणे हे आहे. सांगली जिल्हयात जत नावाचे एक गाव आहे. जेथे दरवर्षी देवदासी होण्यासाठी स्त्रियांना सोडले जाते. ज्या दिवशी स्त्रियांना सोडले जाते . त्या दिवशी पोलीस बळाचा वापर करून ताईंनी ही प्रथा बंद पाडली. देवदासींची प्रथा बंद पाडली. देवदासींची प्रथा बंद पाडणे ही क्रांतीकारी बाब होती. देवदासींच्या आर्थिक पुनर्वसनीसाठी त्यांना कुक्कुटपालन, घड्यालाची Assembly , लोकर विणकाम अशा उद्योगांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. त्यांच्या या कर्यांने त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळाली. देवदासींचे आर्तिक पुनर्वसन व ही प्रथा बंद पाडण्याच्या बाबतीत समाजाला चालना देण्यात त्यांना यश आले. देवदासींच्या मुलांना ताईबदद्ल नितांत आदर आहे.

वर्षभरासाठी ताई पुण्यातील यशदा, या राज्य शासनाच्या संस्थेच्या प्रथम अतिरिक्त संचालक व नंतर संचालक होत्या. शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था व पंचायत समित्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी यांचे ग्रांमीण विकासाच्या संदर्भात प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्याचे दायित्व ताईवर होते.

चार वर्षे ताई नॅशनल इन्सिटट्युट ऑफ नॅचरोपॅथीचा भारत सरकारच्या संस्थेच्या संचालक होत्या. देशभर निसर्गोपचार करणा-यांसाठी ताईंनी अनेक लेख लिहिले.

नाशिकच्या विभागीय आयुक्त म्हणून काम करताना त्यांना नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूपदही भूषवावे लागले. दोन वर्षे लीनाताईंनी महाराष्ट्र राज्याचे सेटलमेंट कमिशनर म्हणून काम केले आहे.

एक वर्ष महाराष्ट्र स्टेट फार्मिग कॉर्पोशन पुण्याच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून मेहेंदळे मॅडमनी काम केले. या फर्मिंग कॉर्पोरेशनच्या ताब्यात 70, 000 एकर जमीन आहे. जवळपास 35,000 एकरावर उसाचे उत्पादन घेतले जाते. संपूर्ण आशिया खंडात सर्वाधिक उसाचे उत्पन्न ही संस्था धेते. अशा संस्थेचे व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळणे हे मोठे जिकारीचे काम असणार, उत्पादन, विक्री, भविष्यकालीन योजना बनविणे, संस्थेचे प्रशासन करणे अशा विविध जबाबदा-या त्यांना पार पाडाव्या लागल्या असतील.

नॅशनल कमिशन फॉर वुमेनच या दिल्लीस्थित संस्थेच्या संयुक्त सचिव म्हणूनही मॅडमनी काम केले. स्त्रियांवर होणारे विविध स्वरूपाचे अन्याय, त्यांची हत्या हा आपल्या देशातील एक मोठा प्रश्न आहे. महिलांचे आर्थिक, सामाजिक व राजकीय सबलीकरण होणे, ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने विविध समस्यांना सखोल अभ्यास करून शासनाला धोरणे ठरविण्यात मदत करणे, महिला कैद्यांना सुयोग्य वागवणूक मिळते ना याबद्दल दक्ष असणे अशी कामे ही संस्था करते.

यानंतर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयात सचिव पदावर मॅडमची नियुक्ती झाली. त्यांना P.C.R. A . या संस्थेच्या कार्यकारी संचालक म्हणूनही काम करावे लागे. या काळात मॅडमनी एनर्जी कन्झरव्हेशनच्या प्रचारासाठी दूरदर्शन मालिका निर्माण केल्या. दूरदर्शनवर मालिका निर्माण केल्या. दुरदर्शनवर 962 भागांत ज्या प्रसारित झाल्या. खेल खेल में बदलों दुनिया व आसामी भाषेतील मालिकेचे बुंद बुंद की बात असे या मालिकांचे शीर्षक होते. एनर्जी वाचविण्यासाठी प्रचार करण्यासाठी दूरदुर्शन हे एक उत्तम माध्यम आहे. त्या काळात आजच्याइतके चॅनेल्सचे पीक बहरले नव्हते. दुरदर्शन हे एक उत्तम माध्यम आहे. त्या काळात आजच्याइतके चॅनेल्सचे पीक बहरले नव्हते. दूरदर्शन खेड्यापाड्यात, घरोघर बघितले जात असे. शासकीय कल्पक असला की, तो उपलब्ध साधन सामुग्रीचा फार परिणामकारक उपयोग करून घेतो. विविध भारतीवर चार पात्रांच्या संवादाद्वारे एनर्जी बचतीचा विचार घरोघर पोहोचविण्याची मॅडमनी व्यवस्था केली. इतकेच नव्हे तर चांदोबा मासिकाने 12 भाषांत उर्जा बचतीसाठी विशेषांक काढला. 75,000 अंक 12 भाषांत मिळून प्रसिद्ध झाले होते. असे विविध उपक्रम मॅहम पोस्टरवर काम करताना राबवत .

यानंतर मॅडम पशुसंवर्धन विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नेमल्या गेल्या . त्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिवपदही त्यांनी विभूषित केले. कॅट या स्थेच्या बंगोलर व मुंबई येथील कार्यालयात सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.

त्यांच्या नोकरीतील प्रगतीचा हा चढता आलेख त्यांच्या कार्यक्षमतेचा, बुद्धिमत्तेचा द्योतक आहे. विविध पदांवर काम करताना स्वतःच्या कौशल्याचा वापर करून माणसे पदाची गरिमा जशी वाढवितात त्याचप्रमाणे विविध पदांवर काम केल्यामुळे त्या व्यक्तींची अनुभवसमृदीही वाढते.

सेवानिवृत्तीनंतर ताई सुखासीन जीवन आळसात घालवत नाहीत. भांडारकर प्राच्यविद्या संशोघन केंद्रांत गेले काही महिने दर आढवडयात दर बुधवारी महाभारतावर व्याख्यान देतात. पर्यावरण, प्रशासकीय सुधारणा, स्त्रियांचे प्रश्न यासंबंधी होणा-या परिषदा ,व्याख्यान सत्रे, परिसंवाद यात त्या व्यस्त असतात. सामान्यतः शासकीय अधिका-यांचे जीवन साचेबद्ध असते. याउलट ताईंचे जीवन शरद ऋतूत वाहणा-या एखाद्या महानदीसारखे गतिशील, पारदर्शी व सभोवलतालचा परिसर, समृद्ध करणारे आहे त्या, शरीराने उंचपु-या, धिप्पाड नाहीत पण अतिशय करारी, दृढनिश्चयी, कामात पारंगत असाव्यात. कुठेही स्वतःचे
मोठेपण मिरविणे नाही, इतरांना तुच्छ लेखणे नाही असे मुरलेल्या प्रगल्भतेचे त्यांचे वागणे आहे. झापड लावून विचार करण्याची त्यांची पद्धत नाही. भेटायला येणा-याला तणावमुक्त करून मोकळे करण्याची कला त्यांना साध्य झाली आहे.

उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक जसा कमावला. आहे तशाच त्या उत्तम लेखिकाही आहेत. त्यांची मराठी भाषेत11 व हिंदी भाषेत 14 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा हिंदी भाषेत अनुवाद केला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितांचे भाषांतर करणे ये-या गबाळ्याला जमणे शक्य नाही. त्यांची 19 पुस्तके अनुवादाचीच आहेत. एका मराठी नाटका व एका कादंबरीचाही त्यांनी अनुवाद केला आहे. द लास्ट पास ही इंग्रजी भाषेतील कादंबरी त्यांनी मराठीत अनुवादित केली हे. लहान मुलांसाठी देखील त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. पक्षीनिरीक्षण, निसर्गोपचार, प्रशासकीय सुधाररा हे त्यांचे आवडते विषय आहेत. संगीचाचीही त्यांना आवड आहे. त्या बासरीही छान वाजवितात. तुसडेपणा त्यांच्या स्वभावात अजिबात नाही. सामान्यतम माणसाशी देखील त्या सुसंवाद साधतात. मग त्यांच्या संदर्भात ज्ञानेश्वरीतील एक ओवी आठवते.

थोपणपन्हासांडिजे।

व्युत्पत्ती आघवी विसरिजे।

जै जगा धाकुटे होईजे।

तेजवळीक माझी।।

परमेश्वराचे मनोगत सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी लिहिली आहे.

मॅडमचे लहान भाऊ देखील I.A.S ऑफिसर होते. I.I.T पवई येथून आभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी I.A.S केले. भाऊ बहीण तसेच एकाच घरातील दोन मुले I.A.S असणे ही बाब दुर्मिळच असावी. ताईच्या लहान बहिणीला डॉक्टरच व्हायचे होते, अन्यथा ती पण I.A.S होऊ शकली आसती.

प्रशासकीय जबाबदा-या ही बाब अतिशय ताणाची बाब असते. प्रचंड ताणाला तोंड देण्याचे प्रसंग त्यांच्या नोकरीत अनेक आले असतील. त्यातले मोजके दोन येथे उद्धृत करतो आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून काम करताना, पुण्य़ातल्या एका सतप्रवृत्तीच्या मातब्बर उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणावरून त्यांना फेटाळावा लागला होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांची नाराजी त्यांना पत्कारावी लागली. कलेक्टर, कमिशननर यांची बोलणी खावी लागली,पण हा अप्रिय निर्णय घेताना त्या कचरल्या नव्हत्या. तणावात रात्र काढली पण दुस-या दिवसापासून नेहमीप्रमाणे कामकाज केले

भावनिक तणावाच्या प्रसंगालाही त्यांना एकदा तोंड द्यावे लागले. झेंडावंदनाची पहिल्यांदा सलामी देताना त्या भावनिक झाल्या होत्या . हा कार्यक्रम बघायला येण्याची त्यांच्या आईची इच्छा होती, पण ताई मात्र मातोश्रींना सोबत नेण्यास तयार नव्हत्या . कारण झेंडावंदन प्रसंगी सलामी घेण्याचा त्यांचा पहिलाच प्रसंग होता म्हणून त्या भावविवश झाल्या होत्या, पण जिल्हा पोलीस प्रमुखांनीच ताईच्या मातोश्रींची इच्छा पूर्ण केली.

इतक्या मोठ्या पदावर काम केलेली, इतकी कीर्ती मिळविलेली व्यक्ती इतकी साधी, सरळ, निर्गवी, हसतमुख, असू शकते. हे बघणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. ताई, तुकाराम मुंढे असे कणखर, निस्पृह अधिकारी देशाला लाभले व राजकीय पुढा-यांनी त्यांना मुक्तपणे काम करू दिले तर देशाचे भवितव्य उजळायला वेळ लागणार नाही.

नांदेडच्या तरूण- तरूणींसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील दिग्गजांचे आदर्श मांडणे, हा माझ्या कायम आवडीचा विषय आहे. हा लेख या तळमळीचाच एक भाग आहे. नुकताच जागतिक महिला दिन होऊन गेला, एका कार्यक्षम महिलेला या लेखाद्वारे मी अभिवादनही करतो आहे.....!








Sunday, February 7, 2021

संतुष्ट जगण्यामरण्याचा सल्ला देणारे माझे आजोबा

 

संतुष्ट जगण्यामरण्याचा सल्ला देणारे माझे आजोबा 

 Vyaspeeth Nashik 2012 

(On प्रशासनाकडे वळून बघतांना -- तिथे सुद्धा हाच लेख आहे.)

माझे बालपणांतील पहिले दशक धरणगांव आणि जबलपुरला गेले. ते खाऊन पिऊन सुखी दिवस होते, पण शान-शौकत, चैन आदि न परवडणारे होते. आजोबा म्हणजे नाना वृद्धत्वाकडे झुकलेले, सबब स्वतः सुरू केलेले लाकूड-वखारीचे दुकान वाटणीत धाकट्या भावाला देऊन टाकले होते. माझ्या धाकट्या आत्याला घटस्फोट घ्यावा लागला असल्याने ती व तिच्या मुलीची जबाबदारी व काळजी दोन्हीं त्यांच्यावर आणि अनुषंगाने आई-दादांवर होती. त्यांत दादा पीएचडी म्हणजे अति उच्च-शिक्षित असूनही त्यांना साधी शिक्षकाची पर्मनंट नोकरी मिळत नव्हती. धरणगांवलाच मोठी शाळा, हायस्कूल इत्यादि असल्याने जवळपासच्या खेड्यांत असलेली चुलत-आते भावंडं नानांकडेच रहायला येत. आणि लग्नावेळी मॅट्रिक असलेल्या आईने पुढे शिकावे अशी आई-दादा आणि नाना सर्वांचीच इच्छा होती. पण  बाहेरगांवचे रेग्युलर कॉलेज परवडणारे नव्हते. नागपूरच्या एसएनडीटी युनिव्हर्सिटीतून प्रायव्हेट परीक्षा देण्यासाठी सुद्धा आईला एक-दोन महीने तिथल्या होस्टेलमधे राहून अभ्यास करावा लागत होता तेंव्हा मी मोठेपणाने खळखळ न करता नानांजवळ रहात असे. 

मग दादांना जबलपुरला कॉलेजात  प्राध्यापकाची नोकरी मिळून आम्ही जबलपुरला आलो तेंव्हाना नानांची प्रकृति खालावली होती. त्यांना क्षयाची बाधा झाली होती पण त्याकाळी क्षयाला औषध नव्हते. त्यांतल्या त्यांत आत्याला नर्सिंग कोर्सला प्रवेश मिळून तीन वर्षांनंतर का होइना, पण तिला नोकरी मिळून करियर व अर्थार्जनाला सुरुवात होईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र यासाठी ती तीन वर्षे माझ्या आतेबहिणीची जबाबदारी आईने घेणे भाग होते त्यामुळे ती पण आमच्याबरोबर जबलपुरला आली. 

या सर्वाचा परिणाम असा झाला की मी कधीच कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करत नसे असे आई सांगते. याउलट मी जेंव्हा आयुष्यांतील त्या काळाकडे पहाते  तेंव्हा मला त्या काळांत हव्या त्या सर्व गोष्टी आपणहून मिळत होत्या आणि हट्ट करावा लागल्याची वेळच आली नाही असे मला वाटते. मला काय हवे असे? तर वर्गात पहिला नंबर (निदान वरचा) असावा, वाचायला खूप खूप गोष्टींची पुस्तकं असावीत, खेळतांना कुणी बस-पुरे म्हणू नये. या तीन्ही वस्तू मला मिळत होत्या. खूप भारी खेळणी, ड्रेस, दागदागिने यांची हौस नव्हती. नाना-दादांना कुठलेही व्यसन नव्हते. आई चहा घ्यायची, पण मुलांना मात्र चहाची सवय नको असा तिचाही खाक्या होता. 

आईला अधून-मधून सिनेमा बघायला आवडत असे. धरणगांवी असतांना तिला पुढे करून माझ्या दोन्हीं धाकट्या चुलत आत्या आणि चुलत बहिणी नानांकडून सिनेमाला जायची परवानगी मिळवायच्या. त्यांचे गणित कच्चे म्हणून नाना वैतागत असत आणि आई सिनेमाला गेली म्हणून मला घेऊन गणित शिकवत बसत. त्यामुळे मला स्वतःचे खूप कौतुक वाटायचे की कसं गणितापुढे मला अन्य मनोरंजनाची गरज भासत नाही. अगदी आजही मला खात्री वाटते की टीव्हीच्या कित्येक सिरीयल्सपेक्षा अधिक टीआरपी देणारी सीरीयल आपण रंजकतेने शिकवलेल्या अभ्यासातून निर्माण करू शकतो. नुसती खात्रीच नाही तर ती सीरियल कशी असेल, त्यांतल्या अभ्यासांत "कहानीमें ट्विस्ट" कसे असतील, जादूच्या खेळाइतकेच थक्क करू शकणारे गणिताचे खेळ त्यांत कसे टाकायचे इत्यादी विषयी माझे थोडे-थोडे लेखन, विचार आणि प्रयोगही चालू असतात. कधीतरी त्यावरही सविस्तर लिहायचे आहे.  

जबलपुरला खेळलेला एक खेळ छान लक्षांत राहून त्याचा आनंद इथे नमूद करवासा वाटतो. हा खेळ शिक्षकांनी आम्हा विद्यांर्थ्यांसाठी आयोजित केला होता. एका टेबलावर खूप निरनिराळ्या सुमारे पन्नास वस्तू मांडून ठेवत. आम्हाला डोळे झाकून तिथपर्यंत नेत-  दहापर्यंत आकडे मोजून तेवढा वेळच त्या वस्तू पाहू दिल्या जात आणि मग दुसरीकडे बसून पुढील अर्ध्या तासांत आम्ही आठवतील तेवढ्या गोष्टींचा यादी लिहून काढायची. यामुळे स्मरणशक्ति वाढायला तसेच फोकस करायला मदत होते. तसेच मला डोंबारी खेळांचे भयंकर आकर्षण होते. मला तसे खेळ शिकता आले नाही म्हणून आजही वैषम्य वाटते आणि इतके खेळगुण अंगांत असणा-या या कलावंतांना भारत सरकारच्या खेल-नीति मधे कोणतीही जागा नसल्याचा रागही येतो.    

आपण श्रीमंत नाही याची जाणीव व्हायला एक प्रसंग घडला. आम्हीं जबलपुरला आलेलो होतो. आता आईला सिनेमा बघायला घरच्यांची सोबत नव्हती.  पण शेजारच्या मैत्रिणींबरोबर विशेषतः बेहेरे-काकू आणि कमलापुरे-काकू यांच्या बरोबर ती जात असे. असाच एकदा त्यांचा कार्यक्रम ठरला पण नेमकं तेंव्हाच आमच्या शाळेच्या कुठल्याशा फंक्शनमधे स्टेजवरच्या कामांत माझी निवड झाली त्यासाठी नवा ड्रेस लागणार होता. रात्री सर्व निजानिज झाल्यावर आई-दादांचं थोडसं बोलण झालं की खर्चाची तोंडमिळवणी कशी करायची आणि मग आईने स्वतःचा सिनेमाचा बेत रद्द केला. मला अचानक जाग येऊन मी हे ऐकत होते, पण मी ऐकलं हे त्यांना जाणवू नये म्हणून मला गप्प बसणं भाग होतं. मला शाळेला नवा ड्रेस लागतो म्हणून आईला स्वतःच्या छोट्याशा करमणुकीला सुद्धा सोडावं लागलं ही बाब मनांत घर करून राहिली. 

सभाधीटपणा देखील मुलांना शाळेच्या वयांतच शिकवला पाहिजे. तो माझ्यांत नाही हे ही मला एका प्रसंगाने कळलं. शाळेत पंधरा ऑगस्टचा झेंडावंदनाचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर विविध विषयांवर बोलण्यासाठी काही मुली-मुलांची निवड झाली होती. मला लोकमान्य टिळक हा विषय होता कारण एक ऑगस्टला त्यांची पुण्यतिथी असते. मी पण छानपैकी निबंध लिहून पाठ करून ठेवला. कार्यक्रमांत पहिल्या दोघांनंतर मला बोलायचे होते. पण इतका ताण आला, की मला एक अक्षर आठवेना. ज्या बाईंना आधी निबंध दाखवून झाला होता त्यांनी एक-दोन मुद्द्यांची आठवण करून दिली. मुख्याध्यापकांनी मधूनच सुरुवात कर अशीही परवानगी दिली पण माझ्या तोंडून अक्षरही फुटेना. पाच मिनिटे मला वेळ देऊन शेवटी मला बसायला सांगितले. मला कुणी रागावले नाही उलट "असं होतं कधीकधी पुढच्या वेळी पुन्हा प्रयत्न कर" अस मुख्याध्यापक म्हणाले. पण माझं हे स्टेजला घाबरणं पुढेही खूप काळ चालूच राहिलं. 

आमच्या घरांत वाचनाची चंगळ होती. दादांच्या संस्कृत-तत्वज्ञानाच्या डिग्रीमुळे महाभारत, रामायण, पुराणं, उपनिषदं, असे ग्रंथ भरलेले होते व त्यांतील सर्व गोष्टी आणि घटना आम्हीं वारंवार वाचून काढत असू.  मग मी महाभारतातल्या भीमाचा रोल स्वतःकडे घेऊन माझ्यांत किती ताकत आहे ते अजमावत असे. त्यासाठी धाकट्या भावाला पाठंगुळीशी घेऊन, बहीण आणि आत्याच्या मुलीला दोन उजव्या-डाव्या कडेवर घेऊन घरभर फिरत असे. मात्र धावपळीच्या खेळासाठी जेवढी चपळाई हवी त्यामधे मी कमी पडत असे. तिसरीत पहिली आल्याचे बक्षिस म्हणून अरेबियन नाइट्स हे पुस्तक मिळाले होते आणि चौथीनंतर माझ्यासाठी "चांदोबा" मासिकाची वर्गणी लावली होती. धाकट्या भावंडांचा अभ्यास घेण्याचे कामही मी घेतले. 

मी पाचवीत असतांना देशामधे मोजमापाची जुनी पद्धत जाऊन नवीन दशमान पद्धत लागू झाली आणि शेराऐवजी किलोग्राम तर मैलाऐवजी किलोमीटर हे मोजमाप आले. मात्र त्यांतील किलो या शब्दाचा अर्थ कुणीही नेमका समजाऊन न सांगितल्याने या दोन मापांमधे आम्हा विद्यार्थ्यांचा खूप गोंधळ होई. त्यांतच पूर्वीचे आणे-पैसे जाऊन त्यांच्या जागी सरळ शंभर पैशांचा एक रुपया असे गणित आले. मग जुन्या पैशाला पैसा आणि नव्या पैशाला खडकू ( लहान होता म्हणून) अशी बोली नांवे पडली. पाचवीच्या परीक्षेत अमुक आण्यांचे किती पैसे अशी गणितं येणार होती आणि ते शिकवण्याच्या काळांत माझी शाळा बुडालेली होती. परीक्षेच्या दोन मिनिटं आधी एका मैत्रिणिने फॉर्म्यूला सांगितला की दोन आण्यांच्या पुढे जेवढे आणे विचारतील त्यांना सहाने गुणून एक मिळवायचा. हा नियम सरसकट लावल्यामुळे माझी दोन गणितं चुकून दोन मार्क बुडाले त्याची रुखरुख मनाला खूप दिवस लागली होती. 

अशा प्रकारे माझ्यातील गुण-अवगुणांची जाणीव मला होऊ लागली होती. हिंदी भाषेवर प्रभुत्व येऊ लागले होते. त्याचबरोबर घरातील जबाबदारीची जाणीवही होऊ लागली होती. 

मग एक दिवस दादांना त्यांच्या शर्मा नामक सहाध्यायांचे पत्र आले. बिहार सरकारच्या अधिपत्याखालील "मिथिला संस्कृत रिसर्च इन्स्टिट्यूट दरभंगा" येथे प्रोफेसरांची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले होते, त्यासाठी अर्ज पाठवण्याचा सल्ला होता. आधीच आम्ही महाराष्ट्रापासून दूर आलेलो. मग इतक्या लांबच्या गांवी नोकरी घ्यावी का? नाना म्हणाले हो,  तेंव्हा दादांनी आठवण करून दिली की पीएचडी नंतर दादांना कोलंबिया विद्यापीठाकडून संस्कृतच्या पोस्टवर काम करण्याची ऑफर आली होती. पण एकुलता एक मुलगा परदेशी गेला की तिकडचाच होऊन राहील म्हणून नानांनी नको म्हटले होते आणि दादांनीही त्यांच्या शब्दाला मान देऊन ती ऑफर सोडली होती. पण अर्थातच आताच्या ऑफर मधे खूप फरक होता. मुळांत ही नोकरी देशांतच असणार होती. जास्त अर्ज येणार नसल्याने जवळपास पक्की होती. सरकारी नोकरी असल्याने पगार कमी वाटत असला तरी पेंशन मिळणार होते. हे सर्व मुद्दे विचारांत घेऊन नानांनी त्यांना दरभंग्याला इंटरव्ह्यूसाठी जाण्यास सांगितले. एव्हाना त्यांचा आजार बळावला होता. तरीही, तिथे काही दिवस रहावे लागले तर माझ्या आजारपणाची काळजी करू नका, काम पूर्ण करून, निकाल ऐकून मगच या असेही दादांना बजावले. 

मला ते वीस-तीस दिवस नीट आठवतात. घरांत आम्ही चार मुलं - त्यांत मी मोठी म्हणजे नऊ वर्षांची. आईला चौथ्या बाळासाठी दिवस गेलेले. नानांचं आजारपण वाढत चाललेलं. माझी व बहिणीची वार्षिक परीक्षा तोंडावर आलेली. आणि दादांचा दरभंग्याला मुक्काम किमान पंधरा दिवस तरी असणार होता. मी जवळ जवळ रोजच आई व नानांच्या औषधासाठी आमचे फॅमिली डॉक्टर मांडवीकर यांच्याकडे जात असे. ते नानांच्या आजाराला एक तांबडं, थोडसं गोडसर औषध देत. बहुधा कफाचा त्रास कमी करण्यासाठी असावे. पण एक दिवस ते घरी आले आणि दादांना बोलावून घ्या म्हणाले.  नानांना ते पटले नाही. दरभंग्याचा इंटरव्ह्यू अजून व्हायचा होता. मग नानांनी त्यांच्या मोठ्या जावयाला बोलावण्याचे ठरवले. मला आठवते की मी एकाच दिवशी दोन तारा पाठवल्या होत्या. आतोबांना पाठवलेल्या तारेचा मजकूर होता की नानांची तब्येत चांगली नाही, असाल तसे तातडीने या. आणि दादांना मजकूर होता की नाना ठीक आहेत, निर्धास्तपणे इंटरव्ह्यू देऊन निकाल आल्यावर जॉइन होऊन मगच या. एवढे सगळे निर्णय नाना शांत चित्ताने घेत होते. 

आतोबा आले त्यानंतर नानांची तब्येत झपाट्याने घसरली, किंबहुना तसे होणार म्हणूनच त्यांना बोलावले होते. दादांची निवड झाल्याची तार आली, पाठोपाठ त्यांनी नोकरीत आठवडाभर काम करून मगच सुट्टी घ्यावी  असा डायरेक्टरांचा सल्ला आहे, शिवाय घर बघावे लागणार आहे, तरी नाना कसे आहेत ते कळवा अशीही तार आली. त्यालाही नानांनी सांगितल्या बरहुकूम मीच तार पाठवली होती की सर्व कामे आटोपून मगच या. 

आणि मग नाना अशी गोष्ट बोलले जिने आजतागायत माझ्या विचारांना खूप भंडावले आहे. त्यांनी आईला सांगितले की लौकरच अमुक दिवशी हनुमान जयंती आहे - चांगला मुहूर्त आहे, त्या दिवशी मी प्राण सोडीन. मी पण हे ऐकले. मात्र महाभारतातील भीष्मकथा माहीत असल्याने मला या वाक्याचे तेंव्हा खूप आश्चर्य वाटले नाही. कोणालाही इच्छामरण असू शकते असेच मला वाटले. तोपर्यंत मी कोणाचेही मरण पाहिलेले नव्हते त्यामुळे त्याचे गांभीर्यही वाटले नाही. त्या दिवशी दादा घरी नसतील, त्यांच्या परत येण्याला अजून काही दिवस अवकाश असेल, पण त्यांना डिस्टर्ब करू नका, जावयाने मुखाग्नि देऊन चालतो असे नानांनी बजाऊन सांगितले. पुढे आईला असाही सल्ला दिला कि आता तुम्हीं बिहारमधे जात आहात तर माझं पहिलं श्राद्ध गया येथे जाऊन करा म्हणजे दरवर्षी तुम्हाला वर्षश्राद्ध करावं लागणार नाही. 

आणि तीन चार दिवसांनी जेंव्हा हनुमान जयंतीचा दिवस उजाडला तेंव्हा त्यांनी आतोबांकडून छोटीशी आंघोळ घालून घेतली, आईला थोडी खीर करायला सांगितली- नैवेद्य दाखवून खीर खाल्ली. मग कॉटवरून खाली येऊन चटई घालून झोपले. एक-दीडच्या सुमारास मुलांना खेळायला बाहेर पाठव असं आईला सांगितल्यावरून आम्ही सर्व शेजारी पोहनकरांकडे गेलो. चारच्या सुमारास आईने बोलावले- की नाना वारले आहेत, दादांना तार करून ये.

 हा प्रसंग माझ्या मनावर ठसलेला आहे. हे निव्वळ शांत मरण नव्हतं तर पूर्ण जाणीवेच्या अवस्थेतील मरण होतं असं मला वाटतं. हे त्यांनी कसं साधलं याचं आश्चर्य अजून जात नाही- उलट माझी प्रबळ इच्छा आहे की माझं मरण देखील असच असावं. पूर्ण जाणीव ठेऊन- रागद्वेष मनांत न रहाता- समाधानाने- आणि माझं मी ठरवून. पण हे कसं साध्य करतात? 

असो. तार मिळाल्यावर मिळेल ती पहिली गाडी पकडून जबलपुरला येण्यासही दादांना चार दिवस लागलेच. तोपर्यंत नानांचे विधी थांबवले नव्हते, त्यांची सूचनाच तशी होती. शेवटचे दर्शन न झाल्याने दादांना खूप हळहळ तर वाटलीच. आधी त्यांनी यासाठी आईला जबाबदार मानलं, पण आमचे घरमालक डॉ बाजपेयी, आतोबा आणि डॉ. मांडवीकरांनी त्यांची समजूत काढली. 

या प्रसंगानंतर काही दिवसातच आम्ही दरभंगा येथे दाखल झालो. यथावकाश सर्वजण गयेला जाऊन नानांच श्राद्ध केलं. नानांचं पर्व आयुष्यातून संपलं. धाकट्या भावंडांना त्यांचा सहवास फारसा लाभला नव्हता. मला मात्र त्यांनी गणित या विषयाकडे एका दार्शनिक दृष्टिने पहायला शिकवलं. त्यातला आनंद मला समजला आणि आयुष्यभर पुरतोय. हे मोठं संचितच मला वारसाहक्काने मिळालं.  मरणाच्या बाबतीतही तसं मिळालं पाहिजे अशी माझी आंतरिक ओढ कायम राहील.

-----------------------------------------------------------------------------------