1Oct 2009
थोडा मागोवा - पुरुषी मनोवृत्तीचा
रथाची दोन चाकं
स्त्री आणि पुरुष, पुरुष आणि स्त्री! जगन्नाथाच्या रथाची दोन चाकं! शिवं आणि शक्ति! एका बिना दुसरा टिकू शकत नाही आणि वाढू शकत नाही! म्हणून ब्रह्माण्ड निर्माण करणाऱ्याला पृथ्वी या ग्रहावर दोघांचे महत्व सारखेच, पण हा झाला एक दृष्टिकोण! दुसरीकडे भारतीय जनगणनेचे आकडे दाखवतात की दहा- दहा वर्षांनी होणा-या दर जनगणनेत एक हजार पुरुषांमागील स्त्रियांची संख्या कमी कमी होत चालली आहे. राष्ट्रीय संख्या ९१७ वर आहे तरी पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजराथ आणि महाराष्ट्रातील कांही संपन्न म्हटल्या जाणा-या जिल्ह्यांत हा आकडा ८५० पेक्षा कमी आहे. स्त्रीभ्रूण हत्यांचे प्रमाण वाढत आहे. आणि हे कुठे जाऊन थांबेल ते कुणालाही कळेनासे झाले आहे. अशा प्रकारे सैध्दान्तिक आणि व्यावहारिक पातळीवरील चित्र अगदी परस्परविरोधी आहे.
मग वैयत्तिक पातळीवर मला दिसलेले चित्र कसे होते? मला आठवत तेंव्हापासून मला इतर मुलीमुलांपेक्षा वेगळे वातावरण मिळाल्याचे जाणवते. माझा जन्म खेडगांव-धरणगांवातला. आजोबांची लाकडाची वखार होती, पण ते हाडाचे शिक्षक व मोठ्या कुटुंब कबिल्यातील सर्वांत सक्षम व्यक्तिमत्व होते. वडील त्या काळात डॉक्टरेट झालेले होते. आई मॅट्रिक झालेली, त्यावेळी आजूबाजूला दूरदूरपर्यंत कोणी बाई चवथी पाचवीच्या पुढे शिकलेली नव्हती. पुढे तर तिने एमए पर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले.
आजोबांकडे आत्याचे मुलगे शिक्षणासाठी आलेले. शेजारी चुलत काकांकडे दोन मुली व पाठोपाठ तीन मुलगे, वडील नोकरी निमित्त बाहेरगांवी व मला तोंडी गणितात उत्तम गति असल्याने मी आजोबांची लाडकी. दोन्ही चुलत बहिणींबरोबर मुलींचे खेळ खेळून झाल्यावर मी मुलांबरोबर पतंग, विटीदांडु, भोवरा, कांचेच्या गोट्या खेळायला जात असे- त्यात चुलत बहिणी येत नसत. त्यामुळे माझ्या डोक्यांत एक समीकरण बसले
की आपल्याला गणित आले तर मुलगी -मुलगी हा भेद संपतो.
पुढे तीन वर्ष आम्हीं जबलपूरला राहिलो तेंव्हा घरातले मोठे मूल या नात्याने माझ्यावर जी जबाबदारी आली व जी घरातली सर्वांनी विश्वासाने माझ्यावर टाकली, त्यामुळेही माझ्या भावविश्वातून मुलगी- मुलगा हा भेद संपू लागला. जबलपूर हे मोठे व आधुनिकतेचे प्रतीक असलेले शहर होते. आजोबा, वडील, शाळेतील मास्तर, या सर्वांनी मला एका जबाबदार व्यक्तीला द्यावा तसा सन्मान दिला आणि त्याच श्रेय माझ्या मते माझ्या गणितात हुषार असण्याला होते - कारण त्यामुळेच मी मठ्ठ नाही व जबाबदारी पेलू शकते असे त्यांना वाटले असावे. याच बरोबर आईने कधीही- मुलीच्या जातीने हे करु नये, ते शिकलेच पाहिजे (विशेषतः स्वयंपाक) असा कधीच आग्रह धरला नाही.
मी नऊ वर्षाची असतांना आम्हीं बिहारच्या दरभंगा या शहरांत आलो. हे फक्त आकाराने शहर होते- विस्तीर्ण- टाररोड, मोठा बाजार, वगैरे. पण विचाराने खूपच भागासलेले होते. स्त्रियांनी घरातच रहावे, तेही घूंघट काढून, मुलींची शाळा वेगळी, त्यात त्यांना फक्त स्कूलबस मधूनच शाळेत जाण्याची सक्ती. शाळेत बहुतेक सर्व शिक्षिका. मात्र गणित व भूगोल हे दोन कठिण विषय शिकवायला पुरुष शिक्षक. जणू कांही शारिरिक शक्ति प्रमाणेच मानसिक शक्तीमधेही बायका कमी असा सर्वांचा ग्रह झालेला असावा. त्यामुळे ज्या विषयांना ऍनालिटिकल क्षमता लागते तिथे बायकांचे चालत नाही अशी पुरुषी मानसिकता असते अस त्यावेळी नकळतच जाणवले. भूगोल म्हणजे अमकी माती, अमकी जलवायु, म्हणून अमुक पिकं, म्हणून अशी संस्कृती असा सर्व कारणमीमांसात्मक प्रकार. तो शिकवणारे जबलपूरचे शिक्षक खूप रंजकतेने शिकवीत तर दरभंग्याचे शिक्षक अतिशय रटाळपणे- शिवाय मुलींना कांय कळणार (कपाळ!) असा त्यांचा विचार असावा. गणिताचे शिक्षक मात्र आमचे हेडमास्तर स्वतः होते आणि त्यांच्या परीने मुलींना गणित यावं हा प्रयत्न करीत. इतरही मुली जेंव्हा गणित म्हणजे किती कटकट अस म्हणत तेंव्हा मला आश्चर्य वाटायचे. धरणगांवला मी पाहिले होते की गणिताच्या नांवाने माझी इतर भावंडं आजोबांपासून पळ काढत असत. त्यामुळे मुलांना गणित येणारच आणि मुलींना येणारच नाही अस मला पटत नसे. पण त्यातली मेख कळली ती एका मजेदार प्रसंगाने.
दरभंग्याचा आमचा मुहल्ला म्हणजे ५०-६० रो हाऊसेसचा एक पुंजका होता. त्यातील बहुतेक मंडळी दरभंगा महाराजाच्या संस्थानात नोकरीला होती. आमच्या शेजारी एका आजोबांकडे मुहल्ल्यातील बहुतेक मुलीमुलांची शिकवणी होती. गणितासाठी त्यांनी मुलांची बॅच वेगळी व मुलींची वेगळी केली होती. मी त्यांची शिकवणी लावली नसल्याने ते माझ्याशी जरा फटकून वागत. एक दिवस मी त्यांना विचारलं- तुमच्याकडे शिकायला येणारा कोणताही मुलगा माझ्याइतका गणितात तरबेज नाही. तरी पण तुम्हीं येणा-या मुलींना कमी कां
शिकवता? त्यांना नीट शिकवलत तर त्यांना पण माझ्याइतक चांगल गणित करता येईल. ते म्हणाले हो, पण एवढे गणित येऊन त्याच कांय लोणच घालणार? त्यांना कां इंजिनियर व्हायचय की पुल बांधायचेत? शेवटी स्वयंपाकच करायचा आहे ना? मी म्हटल माझ्या आईला गणितही उत्तम येतं आणि स्वयंपाकही उत्तम येतो. ते म्हणाले- तू कांय करशील कोण जाणे. तुला तर डॉक्टरसाहेबांनी सायकल पण घेऊन दिली आहे आणि ती तू इथला रिवज नसतानाही शाळेत जायला वापरतेस. पण बिहारच्या मुली अजून इतक्या पुढारलेल्या नाहीत!
बिहारच्या मुली पुढारलेल्या नाहीत हे सांगतांना त्यांना अभिमान नक्कीच नव्हता. पण हे बदलण्यासाठी त्यांच्याकडे येणा-या मुलींपासूनच ते सुरुवात करु शकतात हे त्यांना माहीत नव्हते किंवा आचरणांत आणता येत नव्हते. मुलांनी मात्र गणितात प्रगति करावी, येत नसेल तर शिकून घ्याव, मोठेपणी इंजिनियर व्हावं अशी त्यांची मानसिकता दिसली.
आठवीत गेल्यावर मी वडिलांच्या व हेडमास्तरांच्या निर्णया प्रमाणे सायन्स स्ट्रीम निवडली. ते विषय शिकण्याची आमच्या गर्ल्स हायस्कूल मधे सोय नव्हती. विशेषतः प्रयोगशाळेत काम केल्याशिवाय मी पासच होऊ शकले नसते. म्हणून त्या दोघांनी अशी सोय ठरवली की शेजारच्या राज हायस्कूल या मुलांच्या शाळेत जाऊन मी प्रयोग करावे. त्या शाळेत जाऊन प्रयोग करतांना सुरवातीला मी भांबावले होते- त्या मुलांच्या शाळेत जाणारी एकटी मुलगी- तीही रिवाजाविरुद्ध जाऊन सायकल चालवणारी. पुस्तके नाहीत - theory चा अभ्यासही अजून सुरू केलेला नाही. मात्र तिथल्या फिजिक्स व केमिस्ट्रीच्या मास्तरांनी खूप मदत केली. अधून मधून त्या शाळेचे हेडमास्तर येऊन बघून जात. त्यांचा विषय इंग्लिश. त्यांना प्रयोग कळत नसत. पण माझा अभ्यास नीट होत आहे ना याची काळजी होती.
तिथल्या रिवाजाप्रमाणे त्या शाळेत चार वर्ष प्रयोगशाळेत जाऊनही मी एकाही मुलाशी बोलले नव्हते. बारावीला मी कॉलेजात आले तो पाहिले की कॉलेजची दुसरी भव्य इमारत बांधून तयार होती व आर्टस् आणि कॉमर्सचे विषय तिकडे पाठवून हे आता फक्त सायन्स कॉलेज उरले होते. बी एस्सी पर्यंत सर्व वर्ग मिळून फक्त सहा मुली आणि सगळ्या बायोलॉजी विषयाच्या. गणिताकडे कुणी नाही.त्यामुळे आमच्या दीडशे विद्यार्थ्यांच्या तुकडीत पुन्हा मी एकटीच मुलगी. आणि या कॉलेजात एकही लेडी प्राध्यापिका औषधाला देखील नाही.
केमिस्ट्री प्रयोगशाळेचा एक बयस्कर लॅब असिस्टंट होता- एक दिवस त्याने किस्सा सांगितला- “काल दोन गटांत बरीच बाचाबाची झाली- तुझ्यावरून.” मी विचारल- मी कांय केलय्. तो म्हणाला- परवा तू त्या अग्रवाल मुलाशी भांडलीस ना, तुझ्या टेबलवरचा बर्नर उचलला म्हणून! त्याने व त्याच्या शाळकरी मित्रांनी तुझी छेड काढायच ठरवल. तशी राज हायस्कूल मधून आलेल्या मुलांनी विरोध केला- म्हटले खबरदार, ती आमच्या शाळेची मुलगी आहे- म्हणजे आमच्या ग्रुपची. या घटनेनंतर एकदा आर्टस् कॉलेजमधे डिबेट काम्पिटिशन मधे पहिला नंबर पटकावला तेंव्हा असाच राज हायस्कूलच्या मुलांनी उठून जल्लोश केला होता- म्हणजे मला आपोआपच राज हायस्कूल ग्रुप मधे माझ्या नकळत दाखला मिळालेला होता. पुढे मी “सीनियर” झाले तसतसे मुलांबरोबर बोलचाल- प्रयोगात पार्टनरशिप , नोट्सची देवाण घेवाण इत्यादी सुरू झाले. एका मुलाने मला टेबल टेनिस शिकवून आम्ही मिक्स्ड डबल्स मधे कप देखील पटकावला.
मात्र कॉलेजच्या तिस-या वर्षी लक्षांत आले की बहुतेक सर्व हुषार मुलं भुर्रकन् उडून गेली आहेत- इंजिनियरिंग किंवा मेडिकलसाठी. दरभंगा मेडिकल कॉलेज हे त्याकाळी देशांतल्या टॉप मधे होते- पण मी बायलॉजी, मेडिकल सायन्स या ग्रुप मधे नव्हते. गणित, फिजिक्स, केमिस्ट्री या ग्रुपने इंजिनियरिंग कडे जावे, तर दरभंग्याला ते नव्हते. कित्येक शिक्षकांनी हळहळ व्यक्त केली की अरेरे, मुलगी आहेस म्हणून इंजिनियरिंगला जाऊ शकत नाहीस! पण यांत सुधारणा का नाही? याला कुणी उत्तर देत नव्हते. मग मी फिजिक्स ऑनर्स कडे वळले.
अशा कॉलेजच्या निष्कंटक वातावरणांत एक प्रोफेसर मात्र लगट करायचा प्रयत्न करु लागला. तो फिजिक्स डिपार्टमेंटला आला होता. “तुझा ड्रेस किती छान (मी फक्त पांढरा सलवार कुर्ता घालत असे.)” अस म्हणायचा आणि तुझी difficulty मला कां विचारत नाहीस असा म्हणायचा. मी त्याला टाळून पुढे जात असे. पण माझ्या धाकट्या बहिणीने पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला, तसे त्याने तिला विचारले- तू अमकी- तमकीची बहीण ना? ती धाडकन् उत्तरली- “हो, आणि खबरदार मला इतर कांही विचारून त्रास दिला तर!” तो मला म्हणाला- “परिक्षेत तुम्हा दोघा बहिणींना बघून घेईन”- मग मात्र मी लगेच हेड ऑफ डिपार्टमेंटकडे तक्रार केली आणि त्याला तंबी मिळून तो सरळ झाला. फायनल परीक्षेनंतर दुस-या प्राध्यापकाने माझ्या वडीलांना सांगितले- डॉक्टरसाहेब, तुम्हीं कधी साध चहाच आमंत्रण पण दिल नाही म्हणून मी तर तुमच्या मुलीला फेलच करणार होतो- पण पास
मार्क दिले आहेत- त्यांच्या पेपरला मला फक्त चाळीस मिळून माझे डिस्टिंक्शन ६ मार्कांनी चुकले. तेंव्हा माझ्या लक्षांत आले की “अधिकार आहे ना, म्हणून तो गाजवायचा” असा तो विचार होता आणि तो खूप अंशी मला पुरुषी मनोवृत्तीचा परिचायक वाटतो- आहे म्हणून गाजवा अशी वर्तणूक सहसा स्त्री अधिका-यांची पहायला मिळाली नाही.
माझे वडील एकटे भाऊ व त्यांना पाठच्या तीन बहिणी होत्या. आजोबांनी स्वकष्टार्जित घर मृत्युपत्राअन्वये माझ्या भावाच्या नांवावर केले. आम्हां दोघा बहिणींचा विचार का केला नाही असा प्रश्न १९५६ साली कुणाच्याच मनांत येण शक्य नव्हत. मात्र चाळीस वर्षानंतर ते घर विकतांना भावाने आलेल्या पैशांचे सहा वाटे केले आणि आम्हा तिघा भावंडांच्या सहाही मुलीमुलांना सारखे वाटून टाकले- हा आमच्या घरातील समान वागणुकीच्या संस्काराचा परिणाम.
या एवढ्या विवेचनानंतर आता थोडेसे पुरुषी मनोवृत्तीबद्दल बोलायला पाहिजे. पुरुषी मनोवृत्ती कशाला म्हणावे? पुरुषी व बायकी मनोवृत्तीबाबत बरेच लोकांची परिभाषा अशी असते-
पुरुषी मनोवृत्ती- (बायकांनी केलेली परिभाषा )- पुरुषांचे जे जे वागणे चूक व त्रासदायक वाटते त्या सर्वाची गोळाबेरीज म्हणजे पुरुषी मनोवृत्ती.
बायकी मनोवृत्ती (पुरुषांनी केलेली परिभाषा) - बायकांच्या ज्या ज्या गुणा- अवगुणांची टर उडवता येईल त्या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे बायकी मनोवृत्ती.
मी मात्र पुरुषी मनोवृत्तीची व्याख्या थोडी वेगळी करते. समाज जीवनातील अमुक अमुक क्षेत्र बायकांना बंद आहेत, किंवा बंद करावीत याचा आग्रह धरणे म्हणजे पुरुषी मनोवृत्ती अशी माझी व्याख्या आहे. त्या व्याख्येतून बघायचे म्हटले तर लहानपणी आजोबा, वडील, भाऊ यांच्या वागण्यांत व तरुणपणी सासरे आणि नवरा यांच्याही वागणुकीत तशी मनोवृत्ती मला कधीच दिसली नाही. तुझ्या मनाला ज्या कामाच्या पवित्रतेची खात्री पटते ते खुशाल कर- “मनःपूतं समाचरेत्” अशी शिकवण घरात असल्यामुळे कुठलंही क्षेत्र वर्जित नव्हतच. हां, आर्थिक चणचणींमुळे कधी मुरड घालावी लागली असेल तेवढीच.
मात्र नोकरीत आल्यावर ही मनोवृत्ती खूपदा जाणवली- “बाई आहेस ना, म्हणून” असे ऐकावे लागे आणि ते सुध्दा IAS सारख्या उच्च पदस्थ नोकरीतल्या सिनियर्स कडून ऐकावे लागे तेंव्हा राग येणे स्वाभाविकच होते. त्यामुळे करियर प्रमोशनचे किती प्रसंग आणि संधी गमावली त्याची मोठी यादीच होईल.
नोकरीत चारच वर्ष पूर्ण झाली. ज्यूनियर- मोस्ट स्केल म्हणजे असिस्टंट कलेक्टर. त्या मधून प्रमोशन मिळायला येऊन ठाकले. बॅचमधील इतर दहा पुरुष अधिकारी चर्चा करु लागले- “मला जिल्हा परिषद सीईओ म्हणून इथे जायचय आणि तिथे जायचय्.” मी आणि शर्वरी गोखले - आमची बोलती बंद. कारण आमच प्रमोशन करुन मंत्रालयांतच पाठवल जाणार होतं- “बायका आहेत ना! त्यांची काळजी वाहून आपणच त्यांना मंत्रालयातील “सेफ” पोस्टिंग दिले पाहिजे? हा विचार. मागास म्हटलेल्या बिहारमधे मला इंजिनियरिंगला जाता येत नाही म्हणून वर्गातल्या मुलांना व शिक्षकांना हळहळ वाटली होती. इथे तर माझे स्टेटस इतक्या पटीने वाढले असूनही कुठल्याही बॅचमेट अथवा सिनियरला आमची संधी काढून घेणे आक्षेपार्ह वाटले नव्हते. इतकेच नाही तर कांही महिन्यानंतर मंत्रालयातील ७-८ स्त्री IAS अधिका-यांनी या विषयावर सिनियर्सचे मत आजमावले तेंव्हा आमच्या मागे आमची टिंगलच केली गेली. नाही म्हणायला चीफ सेक्रेटरी कसबेकर यांनी आम्हाला सीईओ नेमण्याची तयारी दाखवली, पण लगेच आव्हानात्मक पवित्रा घेऊन आमच्या समोर एका अशा जिल्हा परिषदेचे नांव फेकले जी सीईओ सारख्या वरिष्ठ अधिका-यांना त्रास देऊन बदली करून घेण्याला भाग पाडणारी म्हणून बदनाम होती. आम्हीं खूप शांत डोक्याने हे आव्हान न्यायसंगत नाही असे पटवून दिल्यानंतरच त्यांनी आव्हान मागे घेत शर्वरी गोखले या पहिल्या महिला सीईओची ऑर्डर रत्नागिरीसाठी काढली.
यावरुन मला असेही जाणवले की पूर्वापार रूढींना बदलण्यासाठी कुणीतरी शांतपणे डोळ्यांत अंजन घालावे लागते. तसे घातल्यावर श्री कसबेकरांनी तो बदल स्वीकारला, मात्र टवाळकी करणा-या सीनीयर्स कडे तशी सुधारक वृत्ती नव्हती.
मग खूप खूप वर्षांनी पुनः एकदा महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नेमणूक होण्याची संधी आली तेंव्हा पुनः आम्ही त्याच ७-८ स्त्री अधिकारी रांगेत होतो आणि पुन्हा एकदा आम्हाला नाकारण्यामागच महत्वाच कारण “बायका” हेच होत. नाही म्हणायला अलीकडे महसूल, गृह अशा महत्वाच्या खात्यांवर स्त्रियांची नेमणूक होऊ लागली आहे. पण गेल्या तीस वर्षात शासनाच्या प्रायोरिटीज बदलून आता इंडस्ट्री, इरिगेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, अर्बन डेव्हलपमेंट, कॉमर्स, डिफेन्स ही प्रायोरिटी सेक्टर्स झाली आहेत जिथे स्त्री IAS अधिका-यांना अजूनही नकार दिला जातो. केंद्र शासनात कॅबिनेट सेक्रेटरी, गृहसचिव, वित्तसचिव व अगदी अलीकडील अपवाद खोडला तर परराष्ट्र खात्याकडे साचिवपदी महिलांची नेमणूक नाही. ही सर्व पुरुषी मनोवृत्तीचीच उदाहरण आहेत. थोडे अधिकारी मात्र या भेदभावाच्या पलीकडे आहेत. ते तसे आढळले म्हणून आमचे काम सुसह्य झाले असे मी म्हणू शकते.
मात्र खेडोपाडी, आणि मध्यम वर्गीयांत बाहेरच्या अधिकारी स्त्रीला विरोध होत नाही. त्यांच्या गांवातलीच स्त्री असेल तर होतो. गांवची स्त्री सरपंच झाली की सर्व गावक-यांच्या डोळ्यांत खुपेल.
स्त्रियांना हे क्षेत्र देऊ नका, ते देउ नका हे ठरवत असतांना कुठेतरी आपले वर्चस्व संपेल अशी सूक्ष्म अढीही मनांत असेल . त्याचबरोबर अगदी खोल खोल कुठेतरी दडून बसलेली भावना असते- ती म्हणजे स्त्रीला वस्तु समजण्याची, व ते ही बलात्काराची वस्तू समजण्याची भावना. या शारिरिक मदांधतेच्या पातळीवरून बाजूला गेलेला व बुध्दिकौशल्यांत स्त्रीची एक चैलेंजिंग पार्टनर म्हणून कदर करू शकणारा पुरुष विरळाच असतो. याचेच प्रतिविम्ब मग हुंडा मागणे, हुंडा-बळी, स्त्रीभ्रूण हत्या , या सारख्या गुन्ह्यांतून दिसते. अगदी लोकसेवेच्या IAS व IPS training साठी निवडलेल्या अधिका-यांपैकी पन्नास टक्के पुरूष अधिकारी बिनदिक्कतपणे “आता आम्हीं दोन-तीन कोटी रूपये हुंडा घेऊ शकतो- हा IAS होण्याचा पहिला फायदा” अस सांगतात. आणि समाजही हे खपवून घेतो. हेच अधिकारी हुंडाबळीच्या केसला काय न्याय देणार? मला एकदा दिल्लीत धक्कादायक अनुभव आला- जिल्हा सत्र न्यायाधीश, कलेक्टर, व जिल्हा पोलिस प्रमुख अशा मिक्स्ड ग्रुपच्या ट्रेनिंग क्लास वर माझे लेक्चर होते. स्त्रियांवरील अत्याचार व गुन्हे हा विषय होता. त्यातील बहुतेक सर्वांनी स्त्रीभ्रूण हत्या हाच मार्ग योग्य, आणि त्यामुळे आपण स्त्रियांवरील पुढील आयुष्यातील होणारे अत्याचार थांबवतो असे सांगितले. फक्त हे करून किती पुण्य लाभते एवढ सांगण हेच त्यांनी बाकी ठेवल होत.
बलात्काराबाबतच्या पुरुषी मनोवृत्तीच चित्र एका इंग्लिश म्हणीतून स्पष्ट दिसतं- if you can’t avoid rape, enjoy it- ही ती म्हण. पण पुरुषांना कोणी सांगत नाही, की जर कोणी- साध तुमच्या तोंडावर थुंकल तर ते तुम्हाला एन्जॉय करता यायला हव, कोणी लाथेने दुकलल, तर फारच एन्जॉय करायला हव वगैरे. एरवी खूप सौजन्यशील असलेली पुरुष मंडळी देखील या म्हणीवर सहमती दाखवतात. मग एक अशी मानसिक प्रवृती उदयाला येते की “खरं तर बायकांना त्यांच्यावर अत्याचार झालेलेच आवडतात- त्यांचे किनई, नाही म्हणजे होच असते.” हा विषय मग टवाळकीसाठी बरा मिळतो.
आम्हीं एकदा आमच्या कार्यालयांत ऍडव्हर्टाइझिंग एजन्सीजचे पॅनेल करण्यासाठी प्रेझेंटेशन घेत होते. पहिल्याच कंपनीच्या प्रेझेंटेशन मधे एक माणूस बायकोवर व्हसकन् ओरडतो- आणि पुढच्याच फ्रेममधे बायको आपली चूक सुधारते तेंव्हा तो प्रेमाने जवळ घेतो- मग दोघं एका सुरांत ती जाहिरात गाऊन वगैरे दाखवतात.
मी सर्व प्रेझेंटेशन कॅन्सल केली- “ज्यांनी कुणी स्त्रियांचा अपमान करणारी, झाडं तोडणारी आणि पशुपक्ष्यांची हानी करणारी दृश्य स्क्रिप्ट मधे घातली असतील त्यांनी आपणहून निघून जावे.” मगच इतर प्रेझेंटेशन पाहिली जातील, असे मी जाहीर केले. नंतर कित्येकांनी मला सांगितल की माझा मुद्दा त्यांना पटला, पण मी जाणीव करून देईपर्यंत यात काही गैर आहे अस त्यांना वाटलच नव्हत. जस त्यांना वाटल नाही तसच माझ्या नोकरीतील कित्येक सिनियर्सना वाटलच नव्हत हे ही माझ्या लक्षांत येत.
या विरुध्द नोकरीतील खालच्या अधिका-यांची वागणूक बहुधा आदराचीच मिळाली. जस लहानपणी वाटे की गणितातल्या हुषारी मुळे मला इतर समवयस्क मुलींपेक्षा चांगली वागणूक मिळते तसच नोकरीतही वाटत आलेल आहे की माझी कामासाठी कष्ट उपसायची तयारी व कामाची हातोटी यामुळे मला वेगळा आदर मिळतो, ज्यात पुरुषी मनोवृत्तीचा अंश नसतो.
सिनीयर्सच्या मनोवृ्त्तीचे उदाहरण रूपन देवल बजाजच्या केस मधे दिसून आले. मलाही “शार्प टंग” व इंग्लिशवर प्रभुत्व असलेले सीनीयर अधिकारी भेटले जे निव्वळ “शार्प टंग” आहे म्हणून कुणालाही दुखावण्यास मागे पुढे पहात नसत आणि स्त्री अधिकारी असेल तर “शार्प टंग” चा वापर करून तिच्या स्त्री असण्याची टिंगल करत. कदाचित त्यांचा मराठी भाषेत वचपा काढणे योग्य ठरले असते. पण पुरुष अधिकारी देखील त्यांना वचकून असत किंवा त्यांच्या हास्यविनोदांत सहभागी होऊन समझौता करून घेत. या उलट एक प्रसंग मला आठवतो. औरंगाबादला आम्हीं कांही अधिकारी कमिशनरांकडे खाजगी पार्टीसाठी जमलो होतो. बरेच जण जोडण्याने आले होते. मी अगदी नवीन (दोन दिवसांपूर्वीच रूजू झालेली.) बाकीचा त्यांचा ग्रुप नेहमीचाच होता.साध्या जोक्स वरून पार्टी नॉन व्हेज जोक्स कडे वळली. अगदी थोड्या काळातच
कमिशनरांच्या लक्षांत आला की मी गप्प आहे. त्यांनी लगेच तो ट्रेंड बंद करण्यास सांगितले व दुस-या दिवशी अतिशय मोकळेपणाने मला सॉरी म्हणून टाकले. असे संवेदनशीलतेचे प्रसंगही मी खूप अनुभवले.
मला ली हार्पर या लेखिकेच्या गाजलेल्या “टू किल ए मॉकिंग बर्ड” कादंबरीतील प्रसंग आठवतो. अमेरिकन सिव्हिल वॉर पूर्वी काळ्यांची गुलामगिरी संपवावी की न संपवावी हा वाद चालू असलेल्या काळातील ही कादंबरी. त्यांत एक गोरी पण कच्च्या चरित्राची मुलगी एका नीग्रो मुलावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवते आणि कादंबरीतील पेशाने वकील असलेला नायक त्या नीग्रो मुलाचे वकीलपत्र घेतो. त्या मुलीचे वाईट चरित्र माहीत असूनही हा वकील ज्या हळूवार व समजूतदार पध्दतीने तिची उलटतपासणी घेतो, तेही तिच्या वाइट चरित्राचा उल्लेख न करता, ते वर्णन वाचून मी थक्क झाले होते. व आपल्या कायद्यामधे बलात्कारित मुलीचे पूर्वचरित्र संशयास्पद ठरविण्याची मुभा असलेल्या सेक्शनविरुध्द मी चिडून उठले होते. सुदैवाने २००६ मधे (स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतर) आता सुप्रीम कोर्टाने सांगितल्यावर ते सेक्शन काढून टाकले आहे. मात्र पुरुषी मनोवृत्तीचे बदलण्यासाठी व सामाजिक समतोल आणि स्त्री-पुरुष-एकतानता जपण्यासाठी आपल्याला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.
मला चंद्रा अय्यंगार यांनी एक किस्सा सांगितला- त्या व त्यांचे सीनीयर अधिकारी दुपारचा चहा पीत असतांना एक स्त्री स्टेनो आत येऊन तिने सोबतचे पुरुष स्टेनो छेड काढतात अशी तक्रार केली त्यावर त्या सीनीयर अधिका-याचे उद्गार होते- "oh, but this is a professional hazard." चंद्राबाई त्याच्याशी जवळ जवळ भांडल्या तेंव्हा कुठे त्याने कारवाई सुरू केली- पुढे विशाखा जजमेंट मधील सुप्रीम कोर्टाच्या निकालाने चंद्रा यांच्या मतावर शिक्कामोर्तब केले.
अगदी अलीकडे मीरा बोरवणकर यांना पुण्याला पोलिस कमिशनर नेमतांना- “पण त्या किती तरी ज्यूनीयर नाहीत का?” असा मुद्दा निघाला. सर्व जण सोयिस्कर विसरले की त्यांच्या आधीचे पोलिस कमिश्नर सिंग नियुक्त झाले तेंव्हा याच वयाचे होते.
तर अशी ही पुरुषी मनोवृत्ति ।
--------------------------------------------------------------------------------------------------
Tuesday, November 4, 2014
Subscribe to:
Posts (Atom)