Sunday, September 2, 2012
परीक्षण -- समाजमनातील बिंब -- मिळून सा-याजणी
आपल्या वाचनालयात -- मिळून सा-याजणी जून 2012
समाजमनातील बिंब
लीना मेहेंदळे
मौज प्रकाशन,
किंमत- रु. १६०
प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांचे अनुभव हा अतिशय महत्त्वाचा ठेवा आहे. व्यवस्थेबाबत बाहेरुनच निरीक्षण कराणार्या आणि व्यवस्थेची समीक्षा करणार्या सामान्यांना असे अनुभव वेगळी दृष्टी देऊन जातात. तालुका, राज्य, केंद्र अशा विविध पातळ्यांवरील कारभारातील गुंतागुंत समजण्यासाठी असे लिखाण मोलाचे असते. लीना मेहेंदळे यांचा ‘समाजमनातील बिंब’ हा संग्रह या कसोटीवर तर पुरेपुर उतरतोच, पण मेहेंदळे यांच्या सहज-सोप्या भाषेमुळे, संवादात्मक लेखनामुळे संग्रहातील लेखन बोजड होत नाही हेही नमूद केले पाहिजे. १९७४ साली भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेल्या लीना मेहेंदळे यांचा अनुभव तर दांडगा आहेच, पण त्यांचे सूक्ष्म निरिक्षण, विश्लेषणातील ताकद आणि आवश्यक त्या दूरदृष्टीसह एखाद्या प्रश्नावरील उपाय सुचल्याची क्षमता या बाबी हा संग्रह वाचताना ठळकपणे लक्षात येतात. विविध दैनिकांतून, मासिकातून व दिवाळी अंकातून या संग्रहातील लेख पूर्वी प्रकाशित झाले आहेत. प्रशासकीय अनुभव आणि प्रशासनातील, कायद्यातील त्रुटी याचा ऊहापोह करणारे लेख या संग्रहात आपल्याला वाचता येतात. लेख वाचत असताना प्रशासकीय सेवा व त्या अनुषंगाने समाज जीवनाच्या इतरही क्षेत्रांमध्ये विलक्षण मुशाफिरी करणार्या लीना मेहेंदळे यांच्या सजग बुध्दिमत्तेला दाद द्यावीशी वाटते. कारण बुध्ध्दिमत्ता असणं आणि ती ‘सजग’ असणं, सामूहिक हितासाठी स्वतःच्या बुध्दिमत्तेचा वापर करायची तळमळ असणं या दोन वेगळ्या बाबी असू शकतात आणि याबाबतीत ‘भारताची सुजाण नागरिक हाच आपला परिचय सगळ्यात महत्त्वाचा आहे’ असं आग्रहाने सांगणार्या लीना मेहेंदळे वाचकांचं मन जिंकून घेतात.
----
उत्पल चंदावार
लोकमान्य नगर, पुणे.
Subscribe to:
Posts (Atom)