समाज मनातील बिंब साठी
अर्पण पत्रिका
धर्म म्हणजे कांय, समाज म्हणजे कांय, लोकशाही म्हणजे कांय, प्रशासन म्हणजे कांय या बाबत माझे प्रबोधन करणा-या प्राचीन उपनिषदोंपासून सॉक्रेटिस, रुसो, टॉफलर, पंडित नेहरु, सुंदरलाल बहुगुणा, इव्हान इलिच इत्यादिकांच्या स्मृतीला अर्पण.
मनःपूर्वक (भूमिका)
मी १९७४ मधे भारतीय प्रशासन सेवेत आले याचा एक मोठा फायदा असा झाला की प्रशासन म्हणजे कांय हे अगदी जवळून पाहू शकले. आज जगभरांत मोठमोठया संस्था मॅनेजमेंट चे ट्रेनिंग देतात. देशाचे प्रशासन चालवणे म्हणजे हेच मॅनेजमेंट एका व्यवसायाच्या किंवा कार्पोरेट हाऊसच्या पातळीवरुन उचलून देशाच्या पातळीवर पोचवणे. मात्र दोघांत एक मोठा फरक असाही आहे की प्रशासन ज्यांच्या साठी चालवायचे ती जनताच लोकशाही मधे शासक देखील असते. थोडक्यांत इंडिया इन्क या अवाढव्य कार्पोरेट - हाऊसची ती फक्त क्लायंट नसून मालकही आहे. तिचे सुख दुःख, सोई - गैरसोई, याचबरोबर तिचे प्रबोधन, स्वास्थ्य, शिक्षण, रोजगार इत्यादि कित्येक गोष्टी प्रशासनात बघाव्या लागतात. अशा वेळी सर्वच प्रशासकीय निर्णय बरोबर असतात असे नाही. कधी निर्णय चूक असतात, कधी ते लागू करण्याची पद्धत चूक असते, कधी योग्य असनूही ते जनतेला पटवून देण्यांत प्रशासन कमी पडते, तर कधी त्यांतून खूप चांगले असे घडून जाते.
याप्रमाणे प्रशासनाकडे पहात असनांनाच जनतेकडेही जवळून पहायला मिळाले. जनतेच्या प्रशासनाकडून असलेल्या आशा आकांशा, तियाचे प्रश्न, ते सोडवण्या मागची भूमिका, कुठे त्रास, कुठे प्रश्न सुटल्याचा आनंद , कुधी प्रश्न सुटतच नसल्याची खंत, कधी वैयक्तिक पातळीवर केलेली धडपड इत्यादि.
१९७४ पासून हे सगळे पहात असतानाच अशा अनुभवांबाबत लिखाणालाही सुरूवात केली. लिहितांना माझी भूमिका प्रशासकीय अधिका-याची कमी आणी एका सामान्य नागरिकाची जास्त होती. कारण मला असा वाटते की या देशाची एक सुजाण नागरिक हाच माझा परिचय सगळयांत महत्वाचा आहे.
याच भूमिकेतून लिखाण करीत असतानाच एक गोष्ट वारंवार जाणवली ती म्हणजे लोकांचे गतानुगतिक भावनेने वागणे. जे चाललय् तसच चालू द्या, वेगळा विचार करु नका, वेगळे प्रयोग करु नका अशी एक शैथिल्याची भावना समाज मनामधे उतरलेली आहे. एक सशक्त जीवंत समाज हवा असेल तर त्यात गतिशीलता आणी प्रयोगशीलता दोन्हीं असले पाहीजेत. चौकटीच्या बाहेर जाण्याची मनाची तयारी असली पाहिजे. तसेच हवे तेंव्हा, सहजपणाने चौकटीत परतही येता आले पाहिजे. असे प्रयोग जिथे दिसले, ते टिपले, जिथे होऊ शकतील असे वाटते ते ही टिपले.
म्हणूनच या लेखसंग्रहाचे एकच एक असे निश्च्िात सूत्र नाही. या मधे विकासासाठी आवश्यक वेगळी विचारसरणी आणी धोरणे यांचा विचार आहे तो शिक्षण, आरोग्य, कृषि, राजभाषा यासारख्या विषयांना स्पर्शून जातो. दुष्काळ, त्यातून उद्भवलेले पाणी, पर्यावरण, व रोजगाराचे प्रश्न आहेत. स्त्र्िायांच्या समस्या, चांगले प्रशासन या सारखे विषयही हाताळले आहेत. याचा अर्थ असा नाही की त्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत - मात्र माझ्या परीने त्या प्रश्नांची उकल करण्याचा व उत्तरे शोधण्याचा आणि सुचवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसेच उत्तर शोधणे आणी उत्तर अंमलात आणणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. अंमलबजावणी साठी जनतेचा हातभार व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा गरजेचे ठरते. जिथे मला अशी अंमलबजावणी जमली , तेही लेखात मांडले आहे जेणेकरून इतरांना देखील तो उपााय करता यावा.
या लेख संग्रहातील बहुतेक लेख विविध वृत्तापत्रां मधे पूर्वीपासूनच लोकांनी वाचले आहेत व त्यांची पावतीही दिली आहे. मटा, लोकसत्ता, सकाळ, पुढारी, गांवकरी, महानगर, तरुण भारत, या दैनिकांसोबत अंतर्नाद,
सा० विवेक, वर्तमान, आम्ही स्त्र्िाया या सारखे दिवाळी अंकही या लेखांना लाभले आहेत. यातील दोन प्रदीर्घ लेख 'माझी प्रांतसाहेबी'
आणी 'जमाबंदीची शतकपूर्ती' हे तर मौजच्याच दिवाळी अंकांसाठी माझ्या कडून आग्रहपूर्वक लिहून घेतले होते.
हे लेख पुस्तकरूपाने आणण्याचे श्रेय श्रीपुंकडेच जाते. मी आतापर्यंत मराठी व हिंदीतून विविध विषयांवर सुमारे चारशे लेख लिहिले. त्या मधे पशु - पक्षी निरिक्षण, आकाशदर्शन, निसर्गोपचार,
अणु विज्ञान अशा कांही मालिका होत्या त्यांना एक एक सूत्र होते. त्यापैकी 'सोन देणारे पक्षी' हे पुस्तक प्रकाशित देखील झाले. पण आताच्या लेखसंग्रहाचे नेमके सूत्र कांय असेल हा प्रश्न माझ्या डोक्यांत होता, त्याचे उत्तर श्रीपुंनी सुचवले - विविधता हेच या लेखांचे सूत्र असू द्यावे, त्यातूनच प्रशासनाचे आणि समाजमनाचे वेगवेगळे पैलू उलगडतील असे त्यांना वाटते. हे लेख लिहिण्यांत वेळोवळी माझ्या कार्यालयातील सहका-यां बरोबर केलेली चर्चा तर कधी त्यांनी सुचवलेले उपाय कामी आले. वर्तमान पत्रांनी देखील त्यांच्याकडे पाठवलेले बहुतेक लेख 'साप' न करता आपुलकीने छापले - वाचकांनी त्यावर पत्रव्यवहारही केला - त्या सर्वांचे आभार. श्रीपु, श्रीनिवास कुळकर्णी व मौज संस्थेचे मनःपूर्वक आभार.
लीना मेहेंदले
1 ऑ. २००५